मुडीयट्टू
मुडीयट्टू हा केरळ मधील मंदिरात सादर होणारा धार्मिक नृत्य, नाट्य प्रकार आहे. देवी काली आणि क्रूर राजा दारूक यांच्या युद्धप्रसंगावर आधारित पौराणिक कथेशी संबंधित हा विधी आहे.
हा धार्मिक विधी हा स्थानिक समुदाय एकत्र येऊन साजरा करतात. मुडीयट्टू सदरीकारंचा मूळ हेतू शुद्धीकरण आणि नवीन उत्साह जनसामान्यात राहावा हा आहे. उन्हाळी पिकांच्या कापणी नंतर एका ठराविक दिवशी गावातील लोकं सकाळी लवकर मंदिरात जमतात. हा उत्सव देवीच्या सन्मानासाठी हे लोकं करतात.
मुडीयट्टू सादरकर्ता हा स्वतः उपास आणि प्रार्थना करून स्वतःला पवित्र करून घेतो. त्यानंतर देवी कालीची मोठ्ठी रांगोळी ही मंदिराच्या आवारात हे सादरकर्ते घालतात. त्या रांगोळीला कोलम / कलम असे म्हणतात. ही रांगोळी विविध रंगानी सुशोभित केली जाते आणि देवीला जागृत केले जाते. देवीला जागृत करण्यासाठी पारंपारिक वाद्यांसह पारंपारिक गाणी म्हटली जातात, त्यांना कलम पट्टू म्हणतात. कलम पट्टू म्हणजे डोक्यापासून पायापर्येंत वर्णन या गाण्यात असते.
मुडीयट्टू सदरकरणारा वाद्यवृंद याला केलीयट्टू म्हणतात. हे लोकं सोपान संगीत किंवा मंदिरात म्हंटले जाणारे संगीत यामध्ये कुशल असतात. दुपारी केली जाणारी उछपूजा ही रूपक ताल आणि मल्हार रागात करतात.

Intangible Heritage of India – Mudiyettu, ritual theatre and dance drama of Kerala
अनेक तासांच्या मेहनतीनंतर मुडीयट्टू सदरकर्ता परंपारिक रंगभूषा आणि वेशभूषा करून तयार होतो. मुडीयट्टू सदरकर्ता रंगभूषा आणि वेशभूषा करून तयार झाला कि त्याच्यात कालीचा प्रवेश झाला अशी मान्यता आहे. त्यामुळे आता देवी कालीच्या स्वागतासाठी संपूर्ण गावं कालीवर विड्याच्या पानांचा वर्षाव करतात. त्यांच्यावर प्रसन्न होऊन देवी काली तिच्या भक्तांवर साळीच्या दाण्यांचा वर्षाव करते. हे धन, धान्य आणि समृद्धीचे प्रतिक मानतात. नंतर काली गावातील विविध घरांत जाऊन तिचा आशीर्वाद लोकांना देते. आणि त्यानंतर कलम म्हणजे ती देवीची रांगोळी पुसून ह्या विधीची सांगता होते.
यानंतर नृत्य-नाट्य ह्यांचे सदरीकरण असते. रांगोळीच्या जवळील दिवा हा सादरीकरण करण्याच्या जागी आणला जातो आणि त्याने दिपप्रज्वलन केले जाते. वाद्यवृंद वाद्य वाजून गावातील लोकांना जमा करतात आणि सदरीकरण सुरु होते. हे सादरीकरण जिथे सादर केले जाते त्याला भगवती काऊ म्हणतात म्हणजेच कालीचे मंदिर. या सादरीकरणात काव्य आणि संवाद दोन्हींचा समावेश असतो. कुली नामक पात्र कालीच्या मदतीला येते. काली आणि कुली मिळून दारूक आणि धनवेन्द्रचा पराभव करतात. कालीच्या विजयाचे प्रतिक म्हणून मशाली घेऊन भक्त आपल्या घरी जातात.
मुडीयट्टूमध्ये तीन लक्षणे महत्वाची ठरतात
- चित्र वदिव्यू – चित्रातील पूर्णता
- शिल्प वदिव्यू – पात्र पूर्णता
- भूत वदिव्यू – धार्मिक पूर्णता
याशिवाय वेशभूषेतील काटेकोरपणा, वाचिक पुष्टी म्हणजे संवाद आणि संगीतातील काटेकोरपणा, आंगिक पुष्टी म्हणजे आंगिक अभिनय, सात्विक पुष्टी म्हणजे भावनिक अभिनयातील काटेकोरपणा, नृत्य पुष्टी म्हणजे नृत्यातील काटेकोरपणा, रंग पुष्टी म्हणजे रंगमंचावरील नाटकीय प्रदर्शनातील काटेकोरपणा हे सर्व घटक महत्त्वाचे असतात.
2010 साली या धार्मिक नृत्य-नाट्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात या परंपरेला प्रसिद्धी मिळाली आहे.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात कालबेली लोकसंगीत आणि लोकनृत्य विषयी माहिती घेऊया.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
2 Responses
[…] वारश्याच्या पुढच्या भागात केरळ मधील मुडीयट्टू म्हणजे काय ते […]
[…] मुडीयट्टू […]