शृंगार रस - उमा महेश्वर आलिंगन मूर्ती : नवरस आणि देवी शिल्पे

Home \ देवीसूत्र \ शृंगार रस – उमा महेश्वर आलिंगन मूर्ती : नवरस आणि देवी शिल्पे

पार्वती म्हणजे शाश्वत शक्ती आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम आणि शिव म्हणजे सत्य. देवीच्या विविध रूपांपैकी पार्वती हे स्वरूप सौंदर्य, माधुर्य आणि अनुराग यांची साक्ष देणारे आहे. त्यामुळेच उमा महेश्वर हे दम्पती प्राचीन भारतीय काव्य, नाट्य, नृत्य, चित्र आणि शिल्प परंपरेचा अत्यंत प्रिय विषय झाले. महाकवी कालिदासरचित कुमारसंभव हे काव्य पार्वती-परमेश्वर यांना समर्पित आहे, ज्यामध्ये या दम्पातींचा शृंगार शब्दबद्ध केला आहे.

नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस म्हणजे शृंगार रस. रससिद्धांतामध्ये सर्वात प्रथम स्थानी येतो. भावनांचा अधिपती संबोधल्यामुळे या शृंगार रसाला ‘रसराज’ किंवा ‘रसपती’ असे म्हटले आहे. चित्रसूत्र ग्रंथामध्ये शृंगार रसाचे वर्णन पुढील श्लोकात येते –

‘तत्र यत्कान्तिलावण्य’ लेखामाधुर्यसुन्दरम्|
विदग्धवेशाभरणं शृंङ्गारे तु रसे भवेत् | 43.2

शृंगार रसाची अभिव्यक्ती करताना चित्रामध्ये मानवी देहाचे म्हणजेच कान्तीचे सौंदर्य दाखवताना रेखांमध्ये नाजुकपणा, मधुरता आणि सुंदरता दर्शवावी, असे निर्देश दिले आहेत. याशिवाय व्यक्तीची वस्त्रे आणि आभूषणे उज्ज्वल असावीत, तेव्हा शृंगार रसाची भावना उत्पन्न होईल. भरतमुनींचे नाट्यशास्त्रही काही अश्याच प्रकारचे निर्देश देते.

यत्किञ्चिल्लोके शुचि मेध्यमुज्ज्वलं दर्शनीयं 

म्हणजे संसारातील जे शुभ, पवित्र आणि उज्ज्वल किंवा तेज संपन्न आणि दर्शनीय काही असेल, तर ते स्वरूप शृंगार रसप्रधान आहे. शृंगार रसाचा स्थायीभाव रती म्हणजेच प्रेम आहे. देवी शिल्पांमध्ये उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून अलौकिक आणि दिव्य शृंगार रसाचे साकार स्वरूप शिल्पकारांनी घडवले आहे.

उमा महेश्वर आलिंगन मूर्ती 

उमा महेश्वर या दम्पतीच्या आलिंगन मूर्ती भारतभर सापडतात. उमा महेश्वर आलिंगन मूर्ती या स्थानक म्हणजे उभ्या, तर कधी आसनस्थ म्हणजे बसलेल्या असतात. शिल्पकारांनी या मूर्ती घडवताना वापरलेल्या वेगवेगळ्या रचनात्मक पद्धती या शिल्पांमधून बघायला मिळतात.

स्थानक म्हणजे उभ्या शिल्पामध्ये उमा महेश्वर त्रिभंग स्थितीत उभे असतात. सुंदर वस्त्रे दम्पतिनी परिधान केलेली असतात. आभूषणे आणि अलंकार यांनी दोघांचे देह शोभिवंत असतात. पार्वतीची विलोभनीय केशसज्जा असते आणि शिवाच्या डोक्यावर सुव्यवस्थित असा जटामुकुट असतो. चंद्रशेखर शिव काही शिल्पांमध्ये दाखवतात. उमा द्विभुज असून तिचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर असतो आणि दुसऱ्या हातामध्ये नीलोत्पल किंवा पुष्प असते. क्वचित उमेच्या दुसऱ्या हातामध्ये आरसाही असतो. शिव चार हातांचा दाखवतात. रूपमंडन या ग्रंथामध्ये आलिंगन मूर्तीचे वर्णन आले आहे. त्याच्या मागच्या दोन हातांमध्ये त्रिशूळ आणि सर्प असतो तर मागच्या हातामध्ये कधी डमरू किंवा कपाल धरलेला दाखवतात. पुढच्या दोन हातांमधील उजव्या हातामध्ये कधी पुष्प असते तर कधी मातुलिंग किंवा क्वचित अक्षमाला ही दाखवतात. शिवाचा डावा हात उमेला आलिंगन देणारा असतो. काही शिल्पांमध्ये उमेच्या खांद्यावर शिवाचा हात स्थिरावलेला दाखवला आहे.

Uma-maheshwara, Madhya Pradesh, India, 9th century AD

उमा महेश्वर यांच्या आसनस्थ म्हणजे बसलेल्या शिल्पांमध्ये अतिशय सुंदर भाव शिल्पकाराने शिल्पित केले आहेत. शिव पार्वतीच्या बसलेल्या शिल्पांमध्ये कधी त्यांचे आसन भद्रपीठ असते तर कधी ते नंदीच्या पाठीवर विराजमान असतात, असे दाखवतात. शिवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली दाखवातात. या आलिंगन शिल्पांमध्ये शिव पार्वतीसोबत नंदी, गण, कार्त्तिकेय, गणेश, भृंगी, गंधर्व आणि अप्सरा यांचेही अंकन केलेले असते.

या आलिंगन मूर्तीमध्ये उमा महेश्वर एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात, त्या दोघांनाही जणू काही त्याच्या आजूबाजूला असलेल्या संसाराचा पूर्णतः विसर पडला आहे. सलज्ज पार्वतीच्या नयनांचे सुख अनुभवण्यासाठी शिव आपल्या हाताच्या बोटांनी तिची हनुवटी हलकेच वर करीत आहे, अशी शिल्पे दैवी शृंगार रसाचे दर्शन घडवतात. उमा महेश्वरांच्या चेहऱ्यावरील स्मित, आत्मिक आनंद, डोळ्यांचा कटाक्ष, हातांचा स्पर्श, देहबोली हे सर्व विभाव या शिल्पांमधून शृंगार ही भावना प्रकट करतात. जगन्माता आणि पिता यांचा हा दैवी शृंगार एका अलौकिक अनुरागाचे मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रतिक रूपात शिल्पबद्ध झाला आहे.

Uma-maheshwara,Pala, Bihar 11th century AD

अश्याच उमा महेश्वर मूर्तींच्या अद्वितीय प्रेमाचे साक्षात दर्शन आपल्याला मथुरा, नाचणा, लातूर येथील निलंगा, नांदेड येथील कंधार, घारापुरी, वेरूळ, पट्टडकल आणि उत्तरेपासून अगदी दक्षिण भारतापर्येंत आणि भारताबाहेरही सर्वत्र सापडते.   

पुढील भागात देवी शिल्पातील हास्य रसाचा परामर्श घेऊया.

Dhanalaxmi
ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

10 thoughts on “शृंगार रस – उमा महेश्वर आलिंगन मूर्ती : नवरस आणि देवी शिल्पे

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.