आपली संस्कृती आपला वारसा ह्या लेख मालिकेच्या पहिल्याच भागात आपण पाहिलं होतं की वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे परंपरेने चालत आलेली एखादी गोष्ट, परंपरा, वस्तू किंवा वास्तू. हा वारसा भविष्यात आपण आपल्या भावी पिढीला सुपूर्त करणार असतो. पण हा वारसा आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये देताना, आपण किंवा आपल्या पूर्वजांनी इतके वर्ष हा वारसा का जपला? ह्या वारश्याचे काय महत्व आहे? हे लहान मुलांना सांगायला हवे. लहान मुले, त्यात त्यांना वारसा म्हणजे काय कळणार? मोठ्ठे झाले की करतीलच सगळं, असा विचार करणं हे त्या मुलांनाही त्यांच्या संस्कृतीपासून दूर लोटण्यासारखं आहे. जवळजवळ 6 वर्ष मी आणि माझे पती महेश, आम्ही दोघेही बालकला ह्या संस्थेमुळे 4 ते 15 वयोगटाच्या अनेक मुलांच्या संपर्कात आलो. त्यामुळे बालकलाच्या निमित्ताने ह्या लहान मुलांच्या भावविश्वाचा वेध आम्हाला जवळून घेणे शक्य झालं.
सध्याच्या तंत्रज्ञान युगामुळे जग जवळ आले आहे. जगाची माहिती लहान मुलेही अगदी एका क्लिकवर मिळवू शकतात. त्यांच्या विश्वाचा परीघ ह्या इवल्याश्या वयातच रुंदावला आहे. त्यामुळे सध्याची भावी पिढी खरोखरच जागरूक आहे. गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळे आपला वारसा हा लहान मुलांना समजावा, ह्याचा प्रयत्न ह्या जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही केला. एक जागरूक कला शिक्षक आणि भारतीय विद्या अभ्यासक ह्या नात्याने इतिहास आणि कलेच्या मदतीने मुलांमधील सृजनशिलता (Creativity) आणि कल्पनाशक्ती (Imagination) वाढवण्यासाठी History through Art असा कला पाठ (Art Lesson) तयार केला. कला शिक्षण हे सर्वांसाठी असावे ह्या विचाराने बालकला ही आमची संस्था Online आणि Offline कार्यरत असते. त्यामुळे आम्ही घेतलेला हा कला पाठ Online ही आपल्या सर्वांच्या मुलांसाठी, त्यांच्या मित्र-मैत्रिणींसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. वारसा आणि त्याबद्दलची जागरूकता मुलांच्या विकासाला पूरक असते, ते कसे ते बघूया.
लहान मुलं आणि वारसा
लहान मुलं ही रोज नवीन काहीतरी शिकत असतात, आत्मसात करत असतात आणि त्या गोष्टींची पुनरावृत्ती करत असतात. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्येंत आपण आपल्या आयुष्यात अनेक नवीन गोष्टी शिकतो. ह्या दहा वर्षांमध्ये आपले व्यक्तिमत्व आकार घेत असते. बालकला मध्ये आम्ही ह्या दहा वर्षांना Golden Years म्हणतो. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासासाठी लागणारी चांगली मूल्य, विचार, ध्येय, दृष्टीकोन आपण मुलांना ह्या वयात देतो. मुलांच्या ह्या वयामध्ये पालकांची अतिशय महत्वाची भूमिका असते, पण त्या सोबतच शिक्षक, नातेवाईक, आजूबाजूला असलेल्या लोकांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. लहान मुलांना सोप्या, त्यांना समजेल अश्या शब्दांत, त्यांना आवडेल अश्या पद्धत्तीने, त्यांच्याशी गप्पा मारत, खेळत अनेक गोष्टी आपण सहज शिकवू शकतो. मुलांना त्यांच्या संस्कृतीची ओळख त्यांच्या लहानपणापासूनच करून द्यायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. आपण परदेशातील लोकांचे अनेक बाबतीत अनुकरण करतो. लहान मुलांना मुद्दाम संग्रहालयाला घेऊन जाणे, ऐतिहासिक वास्तू स्थळांना घेऊन जाणे, त्याबद्दल त्यांना माहिती देणे, मुलांना स्वतः माहिती काढण्यास प्रोत्साहित करणे ह्या अनुकरणीय गोष्टी आपणही करायला हरकत नाही.
कला आणि लहान मुलं
कला हे लहान मुलांच्या भावविश्वात डोकावायचे अतिशय प्रभावी माध्यम आहे. प्राचीन काळापासून माणूस कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत आला आहे हे आपण भिमबेटकाच्या चित्रांवरून सांगू शकतो. तसचं लहान मुलांसाठी चित्रं हे अभिव्यक्त (Express) होण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. चित्रकला त्यांचे विचार बाहेर यायला मदत करते. जेव्हा त्यांचे विचार त्यांना व्यक्त करता यायला लागतात, तेव्हाच त्यांच्या विचारांना आपण आकार देऊ शकतो. उदा. बालकला मध्ये खूप मुलं सुरुवातीला फक्त गाडी, किंवा फुल असं एकच चित्रं सतत काढत असतात. पण ती दोन चित्र सोडूनही अजून अनेक छोटी छोटी चित्र काढता येतात. प्राथमिक आकारांमधून अजून वेगळी चित्र कशी बनतात आणि त्यातून ते स्वःत ती चित्र कशी काढू शकतात हे आम्ही त्यांना शिकवतो. थोडक्यात त्यांचे विचार पेपरवर आले की त्यांना अजून कोणत्या गोष्टी हव्या आहेत हे शिक्षक म्हणून आम्हालाही समजते.
वारसा बाबतीतही तसेच आहे. वारसा समजून सांगताना कला खूपच महत्त्वपूर्ण भूमिका पार पडते. कलेच्या माध्यमातून तयार केलेली कलाकृती मुलांना वारश्यासोबत जोडते. ह्या लहान वयामध्ये जरी त्यांना ह्या गोष्टींचे आकलन पूर्णतः झाले नाही, तरी भावी आयुष्यात जेव्हा त्यांचा संपर्क पुन्हा इतिहास किंवा संस्कृतीशी येतो, तेव्हा त्यांना ह्या शिकलेल्या गोष्टी सहाय्यक ठरतात.
वारसा आणि इतिहास मुलांना काय देतो
जिज्ञासा (Curiosity)
लहान मुले ही मुळातच जिज्ञासू असतात. क्वचित आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची त्याची इच्छा असते. जश्या वर्तमानातल्या गोष्टींची त्यांना जिज्ञासा असते तशीच आधी घडलेल्या गोष्टींची त्यांना जाणीव करून दिली तर त्याबद्दलही जिज्ञासा त्यांना निर्माण होते. मुळात माणसालाच त्याच्या भूतकाळाची जिज्ञासा प्रचंड असते, स्वाभाविक मुलानाही ही निर्माण होऊ शकते. कारण इतिहासातील काही पुरावे मुलांच्या समोर वास्तू आणि अवशेषांच्या रूपांत आजही उभे आहेत.
उदा. History through Art ह्या पाठामध्ये मौर्य सम्राट अशोक ह्याचे स्तंभ (Capital Pillar) अशा विषय घेतला होता. त्यामुळे इतिहासातील एक राजा, त्यांने बांधलेले एका दगडातील स्तंभ, त्यावरची कला ह्या सगळ्या गोष्टीविषयी मुलांना स्वाभाविक कुतूहल निर्माण होतचं. नवीन गोष्ट मुलांच्या विचारशक्तीला कायमच आव्हान करत असते. त्यामुळे ज्यावेळी त्यांना स्वःताचा एक स्तंभशीर्ष आणि स्तंभ तयार करायची वेळ येते तेव्हा त्यांना आधी अशोक आणि त्याच्या स्तंभांची माहिती करून घ्यावी लागते.
कारण आणि परिणाम (Cause & Effect)
इतिहास रूपात असलेला हा वारसा मुलांना एखादी गोष्ट घडण्यामागची पार्श्वभूमी सांगतो. शिवाय प्रत्येक गोष्ट घडल्यानंतर त्याचे काही परिणामही मुलांना समजायला वारसा मदत करू शकतो.
उदा. मौर्य सम्राट अशोक ह्याचे स्तंभ (Capital Pillar) हे एका विशिष्ट कारणासाठी त्याने बांधले. हे इतिहास अभ्यासकांना त्यावर असलेल्या लेखांवरून समजू शकते. अशोकाचे स्तंभ हे वस्तीच्या, व्यापारी मार्गाच्या जवळ आहे, शिवाय ज्या जागी ते बांधले गेले आहेत त्या जागेलाही एक विशिष्ट महत्त्व आहे. अशोकाच्या राज्याविस्ताराची प्रचिती सर्वांना यावी आणि सोबत धर्माचा प्रसार व्हावा म्हणून ह्या स्तंभांची रचना केलेली दिसते. आणि परिणामांचा विचार इथे दोनही अर्थी करावा लागतो, एक म्हणजे कोणत्या गोष्टीचा परिणाम म्हणून त्याने हे स्तंभ उभारले आणि त्याचा पुढे भविष्यात काय परिणाम झाला. ह्या गोष्टींमुळे मुलांना कारण आणि त्याचे परिमाण समजून घेण्यसाठी मदत होते.
कल्पनाशक्ती (Visualization)
इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रचंड वाव मिळू शकतो. इतिहासातील घटना त्यांना त्या वेळी असलेली स्थितीची कल्पना करण्यसाठी भाग पडतात. कल्पनाशक्ती ही सृजनात्मक विकासासाठी महत्वाची असते. कलेद्वारे इतिहासाची ओळख ही मुलांच्या विचार क्षमतेला, त्यानंतर कल्पनाशक्ती आणि शेवटी त्यातून नवीन गोष्ट निर्माण करण्याच्या शक्तीला चालना देते.
उदा. History through Art, मौर्य सम्राट अशोक ह्याचे स्तंभ (Capital Pillar) ह्या पाठामध्ये या टप्प्यावर मुलांना स्वतः राजा/राणी असल्याची कल्पना करून स्वतःचे स्तंभ तयार करायला सांगितले. ह्यावेळी मुलांनी त्यांच्या सगळ्यात आवडत्या गोष्टींची कल्पना करून आपली चित्रं साकारली.
बालकलाच्या माध्यमातून मी आणि महेशनी कला, वारसा आणि लहान मुलं ह्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न होता. बालकला वेबसाईट वर सहभागी मुलांच्या चित्रकृती तुम्ही बघू शकता. सोबत Baalkala YouTube channel वर असलेला History through Art ह्या पाठचा Video मुलांना दाखवून त्यांच्या कडूनही अश्या पद्धतीने इतिहासाची उजळणी करून घेऊ शकता.