आज सर्वत्र महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे. शिव भक्तांसाठी महाशिवरात्रीचे महत्त्व अधिकच आहे. माघ वद्य चतुर्दशीची रात्र म्हणजेच महाशिवरात्र, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. महाशिवरात्रीशी संबंधित अनेक कथांचा वेगवेगळ्या पुराणांमधून उल्लेख येतोच. त्या कथांच्या माध्यमातून शिवाच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शनही आपल्याला होत असते. या सर्व कथांपैकी, आज बोधसूत्रच्या माध्यमातून मी शिवाच्या एका अतिशय मनोरम आणि लोभस अश्या मूर्तीची माहिती आणि त्या संबंधीच्या कथा आपल्यासमोर आणणार आहे. या कथा वर्णनाच्या माध्यमातून शिवमूर्तीचे सौंदर्य आणि त्या मूर्तीची काही मिथके आपण बघणार आहोत. एखादी मूर्ती घडण्यासाठी या कथा किंवा काव्य महत्त्वाचे असतात. काव्यामधील संवेदना कितीही अलंकृत असल्या, तरी शिल्पाकारांनी मूर्ती घडवताना त्या भावना मूर्तीत उतरवलेल्या असतात हे आपल्याला ती मूर्ती बघून समजते.
पूर्वजन्मातील दक्षकन्या सती हिने, हिमावन आणि मेना यांची कन्या गिरीजा म्हणून पुन्हा जन्म घेतला. ही गिरीजा किंवा पार्वती लहानपणापासूनच शिवभक्तीत लीन होती. पुढे बाल्यावस्था संपल्यावर मात्र तिने साक्षात शिवाने तिचे पाणिग्रहण करावे असा हट्टच केला आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. अश्या अनेक कथा आपल्याला शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण यांसारख्या पुराणांमध्ये आढळतात. पण मला भावलेली कथा म्हणजे शिव पार्वतीच्या कठोर तपश्चर्येला प्रसन्न होतो. त्या दोघांचा विवाह निश्चित होतो आणि सुरुवात होते ती लग्नाच्या तयारीची, ती कथा. लग्नाच्या तयारीची कथा तशी कमीच आहे पण त्यातून संन्यासी शिव हळूहळू कसा आकर्षक चंद्रशेखर बनतो, याचे उल्लेख आपल्याला मिळतात.
देवांचा देव महादेव, ज्याला आपण सदैव अंगाला चिताभस्म लावलेला, जटांचा केशसंभार असलेला, वाघाची कातडी कमरेला गुंडाळलेला, अंगावर सर्प खेळविणारा बघितला आहे. पण चंद्रशेखर शिव म्हणजे एखाद्या राजकुमाराप्रमाणे तेजस्वी आणि आकर्षक दिसणारा अश्या स्वरूपाचा आहे. हे शिवाचे मनोहारी चंद्रशेखर स्वरूप सर्वप्रथम कुषाण राज्यांच्या नाण्यांवर बघायला मिळते. लिंगोत्भव कथेच्या शिल्पंकनामध्येही चंद्रशेखर आढळतो. चंद्रशेखर मूर्तीचे तसे तीन प्रकार सांगितले आहेत. केवल चंद्रशेखर, उमासहित चंद्रशेखर आणि उमामहेश्वर आलिंगन मूर्ती. आज आपण केवल चंद्रशेखर मूर्ती बघणार आहोत.
चंद्रशेखर शिव
चंद्रशेखर शिव म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. चतुर्भुज, समपाद स्थानक. तिसरा नेत्र धारण केलेल्या या शिवाचा चेहरा सतेज, प्रसन्न आणि शांत भावांनी युक्त असतो. उजवा हात अभय मुद्रेत तर डावा हात वरद मुद्रेत. मागच्या उजव्या हातात टंक किंवा परशु धारण केलेला आणि डाव्या हातात कृष्णमृग. जटामुकुट अलंकारांनी सुशोभित केलेला आणि त्यावर बारीक चंद्रकोर सजवलेली. त्या जटामुकूटात एक सर्प. चंद्रशेखर शिव हे अतिशय लोभस स्वरूप आहे ज्यात शिव दोन्ही पायांवर समान भार देऊन उभा आहे. ही त्याची समभंग अवस्थेतील मूर्ती त्याचा राजस भाव दर्शविते. व्याघ्रचर्मा ऐवजी पितांबर नेसलेला शिव ह्या मूर्तीत दिसतो.
मूर्तीशास्त्राच्या दृष्टीकोनातून जेव्हा आपण ह्या मूर्तीकडे बघतो त्यावेळी शिल्पशास्त्र ग्रंथ, अगमग्रंथ शिवाच्या चंद्रशेखर स्वरूपाची चर्चा करतात. बारकाईने बघितल्यास त्याच्या हस्तमुद्रा, कर्णाभूषणे, अलंकार, वस्त्र, चेहऱ्यावरील भाव आपल्याला ह्या चंद्रशेखर कथेशी एकरूप करतात.
मुद्रा आणि भाव
ही चंद्रशेखर शिव मूर्ती चार हातांची आहे. तिचा पुढचा उजवा हात अभय मुद्रेत असतो आणि पुढचा डावा हात वरद मुद्रेत. कधीकधी पुढचा डावा हात हा कटावलंबित मुद्रेत असतो. मागचे दोन्ही हात हे कर्तरीमुख मुद्रेत असतात. मागच्या उजव्या हातात परशु आणि डाव्या हातामध्ये हरीण असते. या परशूच्या पात्याचे मुख हे बाहेरच्या दिशेला असते तर मृग शिवाच्या चेहऱ्याकडे बघणारे असते.

नंदिकेश्वराच्या अभिनय-दर्पण या ग्रंथाच्या अनुवादात या कर्तरीमुख मुद्रेच्या उत्पत्तीची कथा आली आहे. जलंधर वधाच्या आधी शिव पृथ्वीच्या मध्यावर त्याच्या तर्जनीने कर्तरीमुख मुद्रेत एक वर्तुळ काढतो अशी ह्या मुद्रेची उत्पत्ती सांगितली आहे. पण मुर्तीशास्त्र ग्रंथांमध्ये ह्या मुद्रेची माहिती येते. अंगठा आणि अनामिका हे बरोबर तळहाताच्या मध्यावर आणून अंगठ्याने अनामिका धरलेली असते आणि तर्जनी आणि मध्यमा एकमेकांपासून लांब, कात्रीच्या स्वरूपात असतात.
या मुद्रेचे अनेक अर्थ होतात परंतु चंद्रशेखर मूर्तीशी जर या मुद्रेचा संबंधातील अर्थ घ्यायचा झाला तर या मुद्रेचा आणि त्या मुद्रेत धारण केलेल्या आयुधांचा एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो पण त्याची चर्चा आपण भविष्यातील लेखांमध्ये करणार आहोत.
चंद्रशेखर मूर्ती ही मुळातच सोळा वर्षीय तरुणाप्रमाणे दाखवली जाते. त्याच्या चेहऱ्यावर तरुणाईचे तेज तर असतेच, सोबत शांत, गहिरे भावही स्पष्ट दिसतात.
अलंकार आणि आभूषणे
शिवाच्या जटांची विशिष्ट केशरचना चंद्रशेखर या मूर्तीतून दिसते. काही जटा ह्या डावीकडे, काही उजवीकडे आणि काही मधून मागे गेलेल्या एकावर एक अश्या पद्धतीने व्यवस्थित बांधलेल्या असतात. हा जटामुकुट सर्पबंधाने बांधून अलंकरणांनी सुशोभित केलेला असतो. खऱ्या अर्थाने ह्या मुकुटाचे सौंदर्य खुलते ते बारीक पण तेजस्वी चंद्रकोरीने. खरंतर डोक्यावर चंद्रकोर धारण केलेला म्हणूनच ह्या मूर्तीला चंद्रशेखर शिव असे म्हणतात.
कर्ण अलंकारांमध्ये, एका कानात जी कर्णभूषणे असतात त्यांना रत्नकुंडल, शंखपत्र किंवा पद्मपत्र म्हणतात. दुसऱ्या कानातील कर्णभूषणांना मकरकुंडल किंवा पत्रकुंडल म्हणतात.
गळ्यात मोत्याचे मुक्ताहार असावेत, रत्नांनी युक्त रत्नाहार असावेत. या हारांना सुशोभित करणारी पदके असावीत. डाव्या खांद्यावरून येणारे यज्ञोपवित असावे. याशिवाय छन्नावीरा आणि उदरबंध असावे. दंडामध्ये केयूर आणि हातामध्ये कटक असावेत. बोटं अंगठ्यांनी अलंकृत असावीत आणि पायामध्ये नुपूर असावीत असे मूर्तीशास्त्र सांगते.
पुराणांतील चंद्रशेखर
चंद्रशेखराच्या मूर्तीचे विशेष आपण बघितले, पण या मूर्तीत हे अलंकार कसे आले आणि मग शिव जे धारण करतो तो सर्प, व्याघ्रचर्म, चिताभस्म गेले कुठे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या कथांचा आधार घ्यावा लागतो. पुराणकथा या जरी मिथक सांगत असल्या तरी त्यांच्या सहाय्याने प्रतिमेचा, शिल्पाचा किंवा मूर्तीचा रसास्वाद घेताना अधिक आनंद होतो. त्यामुळे त्यांचे संदर्भ हे कलात्मक दृष्टीने संकल्पना समजवून घेण्यास सहाय्यक असतात. शिवपुराणामधील पार्वती खंडामध्ये या चंद्रशेखर रूपाची छोटीशी कथा येते.
शिव-पार्वतीचा विवाह निश्चित होऊन दोन्हीकडे लग्नाची तयारी सुरु आहे. शिव परिवारात लग्नाची तयारी करण्यासाठी तशी व्यक्ती किंवा स्त्री नसल्याने सप्तमातृकाच त्यांच्या त्यांच्या परीने विविध गोष्टी शिवापुढे आणून ठेवतात. शिव त्याच्या स्वाभाविक वेषातच जायचे ठरवतो. पण अंगाला फासलेले चिताभस्म स्वतःहून चंदनात परावर्तीत होते. कानातील सर्प मनोहारी कुंडलांमध्ये तर हातातले सर्प केयुरांमध्ये परावर्तीत होतात. अंगावर खेळणारे साप विविध रत्न-मौतिक आभूषणे बनतात. चर्मवस्त्र पितांबर बनते. भालप्रदेशावरील तिसरा नेत्र शुभ तिलक बनतो. त्याच्या जटांचा मुकुट होतो, चंद्रमा स्वतः जटामुकुटात विराजमान होऊन अधिक तेजस्वी होतो आणि शिवाच्या चंद्रशेखर स्वरूपाचे दर्शन होते.
हे छोटेसे कथा वर्णन आपल्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटवून जाते. आता या वर्णनातील प्रसंग आणि मूर्ती एकत्रित पहिली की विसंगती वाटत नाही. तात्पर्य इतकेच की कथेचा भावार्थ लक्षात घेऊन मूर्तीचे परीक्षण करताना त्या मूर्तीची निर्मिती, त्या मूर्तीमधील तत्त्वज्ञान यांची ओळख पटायला लागते. मूर्तीतील कलेचा खरा आस्वाद घ्यायला सुरुवात होते.
Illustrations are copyrighted by Dhanalaxmi M.Tile (@sketchywish) for Bodhsutra