पम्पा नदीच्या म्हणजेच तुंगभद्रेच्या दक्षिण काठावर वसलेले एक छोटेसे गावं म्हणजे प्राचीन पम्पाक्षेत्र. सध्या आपण या गावाला हम्पी म्हणतो. कर्नाटकातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले हम्पी, किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. इतिहास काळात विजयनगरचे साम्राज्य या क्षेत्रावर पसरलेले होते. विजयनगर साम्राज्यातील राज्यांनी त्यांचे आधिपत्य स्थापन करून या संपूर्ण नगरीची पुनर्रचना केली होती हे, सध्या इथे असणाऱ्या वास्तू अवशेषांवरून दिसते. रामायणातील वाली आणि सुग्रीव यांची किष्किंदा नगरी ही हम्पीच्या जवळच आहे. त्यामुळे रघुनंदन श्रीराम आणि रामायण काव्याशी निगडीत अनेक कथा इथल्या मंदिरांमध्ये आणि या मंदिरांवरील शिल्पांमध्ये बघायला मिळतात. आज श्रीरामनवमी, या पावन दिवसाची सुरुवात विजयनगर साम्राज्यातील एका राम मंदिराच्या, नयनरम्य स्थापत्य आणि शिल्पकलेतून करूया.
श्रीरामाचे ‘हजार-राम’ मंदिर
भगवान विष्णूचा अवतार श्रीरामचंद्र यांना समर्पित हजार-राम मंदिर म्हणजे विजयनगर स्थापत्य शैलीतील एक अप्रतिम मंदिर आहे. या मंदिरातील अभिलेखात देवरायाने या मंदिराचा निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या अभिलेखात अन्नलादेवी किंवा अम्नोलादेवी या राणीने दान दिल्याचाही उल्लेख आहे. या मंदिराचे पीठ हे कृष्णदेवराय याच्या काळात म्हणजे इ.स. 1513 मध्ये निर्माण करण्यास सुरुवात केले होते हे सांगणारा अभिलेख प्राप्त झाला आहे. म्हणजेच मंदिराचा काळ इ.स. 15 वे शतक असले तरी त्याचा निर्माण आधीच सुरु झाला होता. काही टप्यांमध्ये मंदिराची बांधणी झालेली असावि असे वाटते. ‘हजार-राम’ म्हणजेच रामाच्या हजार शिल्पांचे दर्शन इथे होते. श्रीराम सोबतच या मंदिरामध्ये भगवान विष्णू आणि त्याचे दशावतार, देवी शिल्प, आणि क्वचित शैव शिल्पही बघायला मिळतात. सध्या या मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामाची मूर्ती नाही पण राम आणि रामाशी निगडीत अनेक कथाशिल्पे या मंदिराच्या स्तंभ, मंदिराची बाह्यभिंत आणि प्राकाराच्या आतील भिंतींवर बघायला मिळतात. मंदिर वास्तू साधारण 33.5 x 61 मी. भागामध्ये बांधलेली आहे. मंदिराभोवती एक कोट किंवा ज्याला आपण प्राकार म्हणतो तो बांधलेला आहे.
या प्राकाराच्या बाह्यांगावर पाच थरांमध्ये अगदी कमी उठावाची शिल्पे बघायला मिळतात. यात सर्वांत खाली हत्ती आणि त्यावर स्वार त्यांचे माहूत आहेत. दुसऱ्या थरामध्ये घोडे आणि त्यांचे स्वार, तर तिसऱ्या थरामध्ये सैन्य दाखवले आहे सोबतच उंटाची शिल्पही दिसते. या थरामध्ये वाद्य वाजवणाऱ्या लोकांची शिल्पे आहेत. चौथ्या आणि पाचव्या थरामध्ये स्त्रिया नर्तन करताना शिल्पांकित केल्या आहेत. तसेच कृष्णलीलेतील काही प्रसंग या थरामध्ये दिसतात.
मंदिरात प्रवेश करताना पारंपारिक गोपुराची संरचना नाही, परंतु अर्धमंडपाप्रमाणे स्तंभ आणि द्वारातून आपण आत प्रवेश करतो. या प्रवेशद्वारावर अभिषेक लक्ष्मीचे शिल्प आहे. मकरमुखातून निघणाऱ्या वल्लीतून द्वारशाखा अलंकृत केल्या आहेत.
मंदिर प्रांगणात प्रवेश केल्यावर आहे ते रामाचे मंदिर. राम मंदिर हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ, मुखमंडप, दक्षिण आणि उत्तर दिशेला दोन अर्धमंडप अशी एकूण संरचना आहे. मंदिराच्या पूर्व दिशेला महामंडप किंवा जो मुखमंडप आहे तो खास विजयनगर शैलीतील स्तंभांनी सुशोभित केलेला आहे. मंदिराच्या उत्तर दिशेला देवीचे मंदिर आहे ज्याला अम्मन मंदिर म्हणतात.
अम्मन मंदिरावर लव-कुश यांची कथाशिल्पे आहेत. या मंदिरांसाठी ग्रानाईट हा दगड वापरला असून शिखरे विटांची आहेत. मुख्य मंदिराच्या शिखरावर द्राविड शैलीतील गोलाकार स्तूपी आहे. अम्मन मंदिराचे शिखर गजपृष्ठाकार आहे.
या मंदिराच्या स्तंभांवर आणि बाह्यांगावर असलेली कथाशिल्पे या मंदिराला अधिकच सौंदर्य प्रदान करतात.
कथाशिल्प
हे मंदिर बघताना, आपण जर ती एक विशिष्ट क्रमाने ते बघत गेलो तर रघुनंदन रामाची एक संपूर्ण कथाच आपल्यासमोर उभी राहते. अनेक कथा या शिल्पांमधून दिसतात. त्या सर्वच कथा आजच संकलित करणे शक्य नसले तरी भविष्यात अजून काही कथा नक्की संकलित करेन. पण आज रामनवमीच्या निमित्ताने त्यातील मला आवडलेली काही कथाशिल्प बोधसूत्रवर संकलित करीत आहे. रामायणातील अनेक कथा आपल्याला परिचित आहेतच, पण त्या कथा या शिल्पांमधून समजून घेताना, शिल्पांच्या भाषेत बघताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो. या मंदिराच्या भिंतीवर आडव्या तीन भागांमध्ये ही कथा सुरु राहते. त्यापैकी भिंतीवरील खालच्या आडव्या भागात श्रीराम आणि त्यांचे राजवाड्यातील वास्तव्य दिसते आणि राजदरबारातील कथानके दिसतात. दुसऱ्या भागामध्ये वनवासातील जीवन आणि त्यातील प्रसंग दिसतात आणि तिसऱ्या वरच्या भागामध्ये वानर कथा दिसतात. या अनेक कथाशिल्पांपैकी काही निवडक कथाशिल्पांचा आढावा घेऊ.
पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ
राजा दशरथ निपुत्रिक असल्याने व्यथित असतात. त्यांचे कुलाचार्य वसिष्ठ यांच्या आदेशानुसार राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचे योजतात. हे शिल्प प्रदक्षिणक्रमाने म्हणजे डावीकडून उजवीकडे पाहत गेले कि आपल्याला ही कथा समजेल. या शिल्पकथेतील पहिल्या डाव्या भागात ऋषीशृंग एका पिठावर बसलेले आहेत. यज्ञामध्ये ते आहूत देत आहेत. त्याच्या समोर राजा दशरथ उभा आहे. यज्ञातील प्रज्वलित ज्वालांमधून अग्निदेव अवतरीत झाले आहेत आणि ते दशरथाला खिरीचे सुवर्णपात्र देत आहेत. दुसऱ्या भागात राजा दशरथ आपल्या तीनही पत्नी कौशल्य, कैकेयी आणि सुमित्रा यांना खीर आपल्या हाताने वाटून देत आहे. तिसऱ्या भागात दशरथ आपल्या चार पुत्रांसोबत म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या समवेत बसलेले दाखवले आहे. ऋषी विश्वामित्र दशरथाकडे रक्षा मागण्यासाठी आले आहेत. विश्वामित्र ऋषीच्या आज्ञेने रामाने धनुष्याची प्रत्येंचा ताणून तडका राक्षसीवर बाण मारला आहे. रामाच्या मागे लक्ष्मणही धनुष्य बाण घेऊन उभा आहे.
रामाला वनवासाची आज्ञा
राणी कैकेयीची दासी मंथरा उभी आहे. दुसऱ्या भागामध्ये आसनावर बसलेल्या कैकेयीला मंथरा समजावत आहे. रामाला वनवासाला पाठवून भरताचा राज्याभिषेक करावा यावर दोघी भाष्य करताना शिल्पांकित केल्या आहेत. तिसऱ्या भागामध्ये राजा दशरथाला कैकेयी समजावत आहे. चौथ्या भागात भरत भ्रातृ वियोगाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन हात जोडून त्यांची पूजा करीत आहे.
श्रीराम आणि सुग्रीव भेट
किष्किंदा नगरीत राहणारे वाली आणि सुग्रीव हे जुळे वानर भाऊ. परंतु सत्तेच्या लालसेत वालीने सुग्रीवाला राज्यातून हद्दपार केले आणि त्याच्या पत्नीला बंधक बनवले. या कृत्यासाठी अधर्मी वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य परत करण्याचे वचन श्रीराम सुग्रीवाला देतात. परंतु सुग्रीवाला श्रीरामाच्या शक्तीवर विश्वास बसत नाही.
स गृहीत्वा धनुर्घोरं शरमेकम् च मानदः । सालमुद्दिश्य चिक्षेप ज्यास्वनैः पूरयन्दिशः ||
– रामायण, किष्किंदा काण्ड, 12.2
सुग्रीवाच्या मनातील किंतु मिटवण्यासाठी रामाने तत्क्षणी एक बाण काढला आणि शालवृक्षाच्या दिशेने सोडला. त्या बाणाच्या वेगाच्या आवाजाने दाही दिशा दुमदुमून गेल्या. एका बाणात रामाने सात वृक्ष भेदून जमीनही भेदली होती. सुग्रीवाला रामाच्या पराक्रमाची पूर्णतः जाणीव झाली. सुग्रीव रामाला शरण जातो. सुग्रीवाला सहाय्य करण्याचे वचन राम देतात.
दुसऱ्या भागामध्ये श्रीराम त्यांच्या बाणाने वालीला मारतात. या शिल्पामध्ये वाली रामाच्या बाणाने धारातीर्थी पडलेला आहे. त्याची पत्नी तारा हिच्या मांडीवर वालीचे डोके आहे. पती वियोगाने तारा विलाप करीत आहे. ताराच्या मागे वाली आणि ताराचा पुत्र अंगद उभा आहे. तिसऱ्या कथाशिल्पामध्ये श्रीरामाने सुग्रीवाला त्याचे राज्य परत केले आहे सुग्रीव दोनही हात जोडून हाताची अंजली मुद्रा धारण करून रामापुढे उभा आहे.
अशोकवाटिकेतील सीता
रावणाने सीतेला पळवून आणल्यानंतर ती तिचे जीवन अशोक वाटिकेमध्ये व्यतीत करीत असते. श्रीराम हनुमानाला आपला दूत बनवून रावणाकडे पाठवतात तेव्हा हनुमानाला सीतेचे दर्शन होते. हनुमानाची आणि सीतेची भेट झाली आहे, हे रामाला कळावे यासाठी सीता हनुमाला तिच्या बोटातील अंगठी देते. या शिल्पात अतिशय सुंदर असा हा प्रसंग शिल्पांकित केला आहे.
असे अनेक प्रसंग या मंदिरावरील कथाशिल्पांच्या रूपात बघताना ते समजून घेताना, रामायणाचे अनेकदा पारायण निश्चितच होत असेल, त्याकाळातही आणि अगदी आजही.