वैभवशाली उस्मानाबाद

Home \ अतिथीसूत्र \ वैभवशाली उस्मानाबाद

देशासह जगातील इतिहास पाहता आपल्याला काही प्राचीन संस्कृती उदयास आलेल्या दिसतात. त्यात इजिप्त, रोम, भारत, युरोप इत्यादी देश प्रामुख्याने आहेत. त्यात भारतामध्ये पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन अशी विकसीत व पुढारलेली सिंधू संस्कृती नांदत होती हे उत्खननातून सप्रमाण सिद्ध झाले आहे. या संस्कृतीची ठिकाणे ही आजच्या पाकिस्तानमधील मोहोंजोदाडो व भारतातील राखीगढी, लोथल (गुजरात) इत्यादी भागात असून उर्वरित भागात हिची ग्रामीण संस्कृती बघायला मिळते.

काळाच्या पडद्याआड जेव्हा ही संस्कृती गेली, त्यावेळी भारतात वेगवेगळी गणराज्य, जनपद व महाजनपद निमार्ण झालेली दिसतात. त्यातीलच अश्मक व मुलक जनपदे ही महाराष्ट्रात होती असे दिसते. त्यानंतर इथे इ. स. पूर्व 230 ते इ. स. 230 अशी 460 वर्ष राज्य करणारा सातवाहन राजवंश राज्य करताना दिसतो. या राजघराण्याची राजधानी पैठण, तर आर्थिक राजधानी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (पूर्वीचे तगर) ही होती. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याला ज्ञात असा दोन ते सव्वादोन हजार वर्षाचा वैभवशाली असा इतिहास लाभला आहे.

अगदी रामायणात उल्लेख असलेली स्थळे ही उस्मानाबादच्या बालाघाट पर्वत रांगेत असून श्रीराम वनवासामध्ये असताना येरमाळा येथे रामाची परीक्षा घेण्यासाठी देवी पार्वतीने घेतलेले सीतेचे रूप तर श्री रामाने मातेचे जाणलेले मूळ रुप त्यावरून तू-का-आई असा केलेला उल्लेख, यावरून नंतर आपभ्रंश होऊन रूढ झालेले तुकाई नंतर पडलेले देवीचे नाव येडाई तर आता प्रचलित असलेले येडेश्वरी ; त्याचप्रमाणे परशुरामाशी ही सम्बधित असलेली देवी म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठाणे ; तर तुळजापूर येथून श्री रामाला लंकेचा मार्ग दाखवणारी व वरदान देणारी देवी म्हणजे श्री रामवरदायनी देवी ही आपल्याला महाकाव्यातील प्रसंगापर्येंत मागे घेऊन जाते. असा वैभवशाली व प्राचीन वारसा सांगणारा उस्मानाबाद जिल्हा व येथील ऐतिहासिक स्थळे, प्राचीन तीर्थक्षेत्रे, दुर्ग, मंदिरे, लेण्या, दर्गे व मशिदी नक्कीच अभ्यासकांच्या, पर्यटकांच्या, कवी, लेखक, भक्तांची मने जिंकतील व वारंवार आपल्याकडे खेचतील हे मात्र नक्की.

हवा पाणी व तुळजाभवानी याच्या ही पुढे उस्मानाबाद जिल्ह्याला प्राचीन असा वैभवशाली इतिहास लाभला आहे. हा सर्व इतिहास या बालाघाटातील दरीखोऱ्यात मंदिरांच्या, दुर्गांच्या , शिल्पांच्या , गडकोटांच्या, गढी-वाड्यांच्या, लेण्यांच्या माध्यमातून सर्वांना खुणावत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा जेंव्हा आपण इतिहासाच्यादृष्टीने विचार करतो तेंव्हा आपल्याला सातवाहन काळाच्या उदयापासून विचार करावा लागतो प्राचीन पुरातत्त्वीय अवशेष आपल्याला या काळापासून सापडतात. त्यामुळे या जिल्ह्यातील प्राचीन इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीपासूनचा आहे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. याचा प्रत्यय आपण जेंव्हा तेर या परिसरात फिरतो तेव्हा तेथील पुरातत्त्वीय अवशेषावरून सहज कळून येतो.

भारतातील सर्वात मोठे असलेले साम्राज्य म्हणजे मौर्य वंशाचे साम्राज्य, हे देखील या भागात राज्य करीत होते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने देशाच्या वेगवेगळ्या भागात धर्मप्रसारक पाठवले होते त्यातील धर्ममहामात्र हा महाराष्ट्रात आलेला होता. विदर्भात तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात या धर्म प्रसारकांनी कसा धर्म प्रसार केला हे महावंस मधील गाथेतील पुढील पंक्तीवरून कळून येईल.

महारट्ठं इसी गनत्वा सो महधम्मरकिखतो |
महानारदकस्सपाव्हँ जातकं कथयी तहिं ||
मग्गफलं पापुणींसु चतुरासिति सहस्सका |
तेरसं तु सहस्सानि पब्बजिंसु तदन्तीके ||

अर्थ – तो महात्मा महाधर्मरक्षित महाराष्ट्रात गेला आणि तेथे त्याने महानारदस्सप जातकाची कथा सांगितली. तेव्हा चौऱ्यांशी हजार लोक बौद्ध मार्गाचे फल प्राप्त करते झाले आणि तेरा हजार लोकांना त्याने भिक्षु केले.

त्यानंतर इ. स. पुर्व 230 ते इ. स. 230 असे चारशे वर्षाच्यावर या सातवाहन वंशाने महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या भागात राज्य केले. त्यांची मुख्य राजधानी ही पैठण तेव्हाचे प्रतिष्ठान, तर आर्थिक राजधानी उस्मानाबाद जवळील तेर तेव्हाचे तगर ही होती. सातवाहनानंतर या इकडील मराठवाडा व इतर प्रदेशात अभिर, शक, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणी चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, निजामशाही, मोगल व मराठा व शेवटी हैद्राबादचा निझाम यांनी राज्य केले.

Periplus of Erythrean sea या प्राचीन पुस्तकात गुजरात येथील भरोच, तर महाराष्ट्रातील पैठण व उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावाचा उल्लेख या भागाचे प्राचीनत्त्व सिद्ध करतो. तसेच टॉलेमी ( लॅटिन नाव क्लॉडियस टॉलेमस ) हा ग्रीक भविष्यवेत्ता, भूगोलतज्ञ तेर विषयी त्याच्या प्रवासवर्णनात उल्लेख असा करतो की,

ही नगरी समुद्रकिनाऱ्यापासून आत असून अरियाके या प्रदेशात आहे. तगरची दिशा सांगताना तो पुढे लिहितो कि, तगर सिरी टॉलेमाओस (सातवाहन सम्राट पुलुमावी) या राजधानी बैथन (पैठण) च्या इशान्येस आहे. (भारतातील भूगोल बद्दल जास्त माहिती नसल्याने तेर च्या ठिकाणाबद्दल बऱ्याच अभ्यासकांची व त्याची माहिती थोडी चुकीची ठरली या मुळे बऱ्याच अभ्यासकांना तेर लवकर शोधता आले नाही मग हळूहळू तेर स्मृतीपटला वरून दूर जात राहिले.)

हस्तिदंती तगर लक्ष्मी

त्याचप्रमाणे सातवाहन काळातील तीस नगरांना लाकडी तटबंधी असलेले उल्लेख ही मिळतात. त्यातील एक तटबंदी असणारे नगर म्हणजे तेर हे होय. याचे पुरातत्त्वीय पुरावे देखील उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे रोम या साम्राज्याशी तेरचे व्यापारी सम्बद्ध होते, हे येथील मद्यकुंभ, हस्तिदंत मणी, बांगड्या, गोणपाट, खेळणी, बुट्याचे कापड, नाणी, हस्तिदंती असलेली प्रसिद्ध असलेली बाहुली तिला तगर लक्ष्मी म्हटले जाते, तर अशीच एक बाहुली इटली जवळील पोम्पे येथे मिळाली आहे. तिला तिथे भारतीय लक्ष्मी म्हटले जाते. ह्या बाहुल्या तत्कालीन आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगाने पुरावा म्हणून महत्त्वाच्या आहेत.

त्रिविक्रम मंदिर, तेर

तेर येथून होणारा प्राचीन व्यापार हा पैठणमार्गे गुजरातला जात होता. त्यामुळे दक्षिण व पुर्व भारतातून सार्थवाहक म्हणजे व्यापारी, प्रवासी हे आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू इत्यादी प्रदेशातून या ठिकाणी येत. त्यामुळे सातवाहन काळातील इकडच्या प्रदेशातील व्यापारी मार्ग हे आज ही पाहिला मिळतात. उदा. वैराग जवळ असणाऱ्या धामणगावाजवळ जकातीचा प्राचीन रांजण याची साक्ष देत आज ही सुस्थितीमध्ये आहे. तर तेर येथील त्रिविक्रम मंदिरासारखी रचना असणारे मंदिर हे आंध्र प्रदेशातील किनारी भागात असलेल्या चेझरला याठिकाणी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही मंदिराच्या बांधकामात असणारी साम्यता म्हणजे विटांचा आकार, लांबी रुंदी इत्यादि सर्व सारखेच आहेत याचाच अर्थ या दोन ठिकाणी असणारे व्यापारी व सांस्कृतिक संबंध होय.

आज ही उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, तेर तसेच नळदुर्ग किल्ल्याच्या पुर्व तटबंदीच्या बाहेरील बोरी नदीच्या बाजूला सातवाहनकालीन वसाहती सापडल्या असून आणखी बऱ्याच ठिकाणी त्या सापडत आहेत. हे सर्व सांगायचे कारण म्हणजे, या परिसरात प्राचीन काळात वेगवेगळे राजवंश राज्य करत असून या भागातील लोकांचा इतर व्यापारी केंद्राशी व्यापारी देवाण-घेवाण होत होती. तेर येथून गुजरातमार्गे, जगभर तलमवस्त्र, गोणपाट, हस्तीदंती बांगड्या, कानातील, गळ्यातील माळा, कज्जल शलाका या व अशा अनेक वस्तू निर्यात केल्या जात व तिकडील देशातुन उच्च प्रतीची दारू इकडे मागवली जात, हे येथील उत्खननात सापडलेल्या मद्यकुंभावरून कळून येते.

उस्मानाबाद जिल्हा बालाघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला असल्याने येथील गिरीशिखरात बांधलेली मंदिरे नक्कीच बघण्यासारखी आहेत. यात भूम तालुक्यातील माणकेश्वर शिवमंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. जिल्ह्यातील प्रमुख सर्व मंदिरे ज्यात माणकेश्वर, उमरगा येथील महादेव मंदिर, जागजीचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, त्याचप्रमाणे सोनारी येथील श्री काळभैरव नाथाचे मंदिर, कुंथलगिरीचे जैन मंदिर, श्री. खंडोबा मंदिर, तेर येथील कालेश्वर मंदिर इत्यादि मंदिरांचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा त्या मंदिरांना भेट देतो, त्यावेळी येथील मंदिरांची अनोखी व वैशिष्ट्यपूर्ण शैली व त्यातून दिला गेलेला संदेश नक्कीच अद्वितीय असा आहे हे समजते. उदा. उस्मानाबाद-बीड महामार्गावरील कुंथलगिरी येथील जैन मंदिराच्या शिखरावर एकाच पाणीपत्रामध्ये वाघीण व गाय पाणी पीत असलेले दाखवलेले आहे याचाच अर्थ भिन्न प्रकृती असणारे पशु सुद्धा गुण्यागोविंदाने रहाताना दिसतात हे जैन धर्मातून अहिंसेच्या तत्त्वाला दर्शीवलेले आहे.

माणकेश्वर शिवमंदिर

माणकेश्वर येथील शिवमंदिरच्या बाह्यभागावर 450 पेक्षा जास्त देवदेवतेची व सुरसुंदरीची शिल्पे असून यातील एक शिल्प हे चिनी प्रवासीचे आहे. इथे या शिल्पासाठी वापरलेला दगड ही पांढरट रंगाचा आहे या शिल्पावरून आपल्याला त्यावेळी भारताचा होणारा विदेशी व्यापार व वेगवेगळ्या देशातून येणारे व्यापारी यांची माहिती होते. हे उत्तर चालुक्यकालीन मंदिर असून भूमिज पद्धतीचे आहे. तर उमरगा येथे असणारे महादेव मंदिर हे मुळात विष्णू मंदिर आहे व मंदिराच्या देवकोष्टात असणाऱ्या विष्णूच्या रुपात बुद्ध देखील दाखवला आहे. याच मंदिराच्या पायावर असणारी मैथुन शिल्पे खजुराहोच्या तोडीची आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून मंदिर परिसर, होम, तीर्थे, शेजघर, तुळजापूर मध्ये असणारे मठ येथील नवदुर्गा या सर्वांना पाहून हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शाक्तपीठ आहे हे लक्षात येते. देवीचे वर्षभर वेगवेगळे उसत्व पार पाडले जातात देश विदेशातून भक्त भाविक देवीला शक्ती मागण्यासाठी येत असतात. पानिपतची प्रसिद्ध अशी जी तिसरी लढाई मराठे व अब्दालीमध्ये झाली तिच्या विजयासाठी सदाशिव भाऊ पेशवे यांनी तुळजाभवानीला नवस मागितलेला असून तो नगारा देऊन नंतर पूर्ण ही केलेला आहे. तसेच मोगल बादशहा आलमगीर औरंगझेब स्वतः एक आठवडा तुळजापुरात वास्तव्यास होता. अशा व अनेक रोमहर्षक हकीकतीने तुळजापूरचा इतिहास भरलेला आहे.

हिंगलज माता, हिंगळजवाडी

त्यानंतर तेर जवळील हिंगळजवाडी येथे श्री. हिंगलज देवीचं मंदिर असून या देवीचे मुख्य ठाणे पाकिस्तानातील बलुचीस्थान भागातील मकरान पर्वत रांगेत आज देखील सुस्थितीमध्ये आहे. तेरच्याच पुढे जागजी या गावी श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर असून येथील महालक्ष्मी ही मेंढ्यावर बसलेली आहे . येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर हे देखील प्रमुख तीर्थक्षेत्र असून देवीला नवस मागण्यासाठी दूरवरून भाविक येरमाळा येथे येतात. महाराष्ट्रातील शाक्त संप्रदायाचा सर्वात मोठा पट्टा हा उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. वाशी पासून नळदुर्ग पर्येंत असंख्य देवीची मंदिरे आपणास पहायला मिळतात.

देवगिरीच्या यादवांच्या पतनानंतर तुघलकांच्या काळात उस्मानाबाद जिल्हा खऱ्या अर्थाने इस्लामिक राजवटीखाली आला राजकीय राजवटीबरोबर धर्म ही ह्या भागात मशिदी, दर्ग्याच्या व पीर यांच्या रूपाने पसरलेला दिसतो. खुद्द उस्मानाबाद येथे हजरत ख्वाजा शमसोदिन गाजी रहे यांचा दर्गा असून याचे बांधकाम मुहंमद तुघलकच्या काळात झालेले आहे. बांधकाम झालेला शिलालेख दर्ग्यात पहायला मिळतो. दरवर्षी दर्ग्याचा उरूस भरला जातो त्यात सर्व जातिधर्मातील लोकांचा मान असतो व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या उरुसाकडे पाहिले जाते. याचप्रमाणे तुळजापूर तालुक्यातील काटी या गावी बुर्हाण निजामशहाच्या काळातील सुंदर अशी मस्जिद असून ती मेहरच्या पैशाने बांधलेली आहे. या मस्जिदीमध्ये कुराणातील आयात कोरलेल्या आहेत त्या डोळ्याने दिसत नाहीत जेंव्हा ओला कपडा यावर पुसावा तेव्हा हा मजकूर स्पष्ट दिसतो.

मंदिरे, लेण्या, मशिदी त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या गढ्या व किल्ले हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणी आहे. मूळच्या कल्याणी चाल्युक्यांच्या काळात बांधण्यात आलेला किल्ला नंतर बहमनी काळातील सुल्तानाकडे गेला व जेव्हा बहमनी सल्तनतीचे पाच तुकडे झाले त्यातील विजापूरच्या आदिलशहाने हा किल्ला बांधला. या किल्ल्यातील सर्वात आकर्षक वास्तू ही इ. स. 1613 मध्ये मीर मीर इमादिन या वास्तूविशारदाने बांधलेले धरण होय व या धरणात सुंदर असे केलेले पाणी महालाचे बांधकाम होय. त्याचप्रमाणे पाण्याच्या दाबाचा उपयोग करून टरबाईनच्या सहाय्याने पीठ दळण्याची चक्की याच धरणाच्या आत केलेली आहे. हे या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य होय. तसेच किल्ल्याला 114 च्या वर बुरुज असून प्रत्येक बुरुजाची रचना व आकार वेगळा आहे व तटबंदीची लांबी 3 किमी भरेल इतकी आहे. त्याचप्रमाणे किल्ल्यात बारदारी, उपळ्या बुरुज, ( या उपळ्या बुरुजावर एक खोली आहे त्यात दुर्मिळ असे रायनोकोमा हार्डविकी हे शेपटी असणारे वटवाघूळ पाहिला मिळते ), बारुदखाना, जामा मस्जिद, हमामखाना, दरबार हॉल, नऊ बुरुज, रंगमहाल इत्यादि वास्तू आवर्जून बघण्यासारख्या आहेत. नळदुर्ग किल्ल्याच्या बाजूला रणमंडल हा जुना किल्ला असून यातील हत्तीदरवाजा बघण्यासारखा आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण अशी शिल्पे इथे पहायला मिळतात. उदा. बाहेरील तटबंदीवर गंडभेरुंड, सहा माशांचे शिल्प, व्याल तसेच आतील बाजूला मुख्यदरवाजासमोर दन्त असून आतील दरवाजावर व्याल, हत्ती इ. शिल्पे आहेत.

नळदुर्ग जवळील अणदूर हे श्री खंडोबाचे एक जागृत देवस्थान आहे. मूळ मंदिर मैलारपूर येथे आहे पण मंदिर विटंबना झाली म्हणून येथील देव काढून बाजूलाच एका नवीन मंदिरात बसवला गेला. या देवस्थानात सव्वा दहा महिने देव अणदूर येथील मंदिरात असतो, तर पावणेदोन महिने मैलार येथील मंदिरात असतो. यावेळी इथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून इथे भाविक येतात. मैलारपूर येथील मंदिरासह अणदूर येथील देवस्थानाला पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर व राजर्षी शाहू महाराज यांनी देणग्या दिल्या आहेत. अणदूर येथील जिजामाता प्रवेशद्वाराजवळ मराठेशाही चे सरदार हिंमतबहाद्दर श्री उदाजी चव्हाण यांची समाधी आहे.

जिल्ह्यातील दुसरा भुईकोट किल्ला म्हणजे परंड्याचा किल्ला होय. हा दुहेरी तटबंदी असणारा व मुख्य असे 26 बुरुज असलेला मजबूत असा हा किल्ला प्रसिद्ध आहे तो येथील असणाऱ्या तोफ गोळे आणि तोफांमुळे. इतिहासातील प्रसिद्ध अशी जी विजयनगर व पाच शाह्यांत तालीकोट येथे झालेली जी लढाई होती त्यात निजामशहाने आणलेली प्रचंड अशी मलिक ऐ मैदान तोफ होती, ती युद्धानंतर परंडा किल्ल्यात ठेवली होती नंतर ती आदिलशहाने सरदार मुरार जगदेवास विजापूर येथे हलवण्यास सांगितली. तेव्हा या तोफेला दोनशे बैलाकरवी आणले गेले. हा कल्याणी चालुक्यांच्या ताब्यातील प्रदेश होता पूर्वी या भागाला पलियंड, प्रत्यण्डक अशी नावे होती नंतर याचे परंडा असे नाव रूढ झाले. या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा मुख्य दरवाजा दोन बुरुजामध्ये नसून प्रत्यक्ष बुरुजामध्ये केला आहे. तसेच किल्ल्यात अत्यंत सुंदर अशी नृत्य गणेशाची प्रतिमा असून काही वीरगळी, वेताळ शिल्प, पार्श्वनाथ शिल्प, तीर्थंकर मूर्ती, हनुमान, हत्ती, व्याल, नृसिंह शिल्प व मस्जिद आणि लतावेलीची सुंदर नक्षीकाम केलेली पहायला मिळते. त्याचप्रमाणे भव्य अशी मोठी बारव किल्ल्यामध्ये आहे. किल्लात श्री. शहाजी राजे व जिजामाता यांचा काही काळ मुक्काम देखील होता. परंडयाला मराठवाड्याचे द्वार देखील म्हंटले जाते. काही काळ हा किल्ला निजामशाहीची राजधानी राहिलेला आहे.

परंडयाच्या जवळच डोमगाव येथे समर्थ रामदास स्वामी चे पट शिष्य श्री. कल्याण स्वामी अर्थात अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी यांचे दोनशे पन्नास वर्षांपूर्वीचे समाधीमंदिर आहे. सज्जन गडावरून निघून कल्याण स्वामी रामदासी कार्यास त्यावेळी असणाऱ्या हमस्त्यावरील डोमगावी येथे आले व तेथून त्यांनी कार्याला सुरवात करून मोठा शिष्यवर्ग जमावला बाजूलाच असणाऱ्या सिना नदीला त्यांनी श्रमहरिणी असे नाव देऊन तिची आरती देखील रचली. समर्थ रामदासांनी संगीतलेला दासबोध ग्रंथ हा कल्याण स्वामींनी लिहिला आहे त्या ग्रंथाची आद्य प्रत आज ही डोमगाव येथे असून कल्याण स्वामींची जपमाळ ही आज मोठ्या आस्थेने जपून ठेवली आहे. अक्षर कसे असावे हे दासबोध ग्रंथ पाहून कळेल. इ. स. 1714 रोजी परंडा येथे रामकथा पुर्ण करून श्री. कल्याण स्वामींनी देह ठेवला त्यांची समाधी डोमगाव इथे बांधण्यात आली.

जैन मंदिर – सावरगाव, तुळजापूर

डोमगावाशेजारीच महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचे कुलदैवत असणारे श्री काळभैरवानाथाचे मंदिर आहे. मंदिर बघण्यासारखे असून मंदिराशेजारी गंगातीर्थ, लोहतीर्थ, दीपमाळ, भद्रकाली देवी मंदिर, नाथ संप्रदायाचा मठ, जैन मंदिर अशी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

किल्ले व मंदिरापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात मध्ययुगीन गढी-वाडे पाहण्यासारखे आहेत. यातील महत्त्वाच्या गढ्या म्हणजे तुळजापूर जवळील अपसिंगा , कामठा व उस्मानाबाद जवळील आळणी गावाची गढी स्थापत्यशास्त्राच्यादृष्टीने पाहण्यासारख्या आहेत. अपसिंगा गढीचे महाद्वार एखाद्या किल्ल्याच्या महाद्वारासारखे आहे, तर कामठा येथील गढीमधील एका बुरुजामध्ये निजाम काळातील फाशी देण्यासाठी लावलेला वध स्तंभ आज ही सुस्थितीत पहायला मिळतो. आळणीची गढी पूर्णपणे विटांची असून यातील एक नऊ पाकळ्यांचा बुरुज जो कि नळदुर्ग किल्ल्याला आहे त्या पद्धतीचा आहे . तसेच याच आळणी समोरील गडदेवदरी या गावात एक छोटे खानी किल्ला किंवा ठाणे आहे. परंतु आज त्याचा बहुतांश भाग कोसळला आहे.

खुद उस्मानाबाद शहराला ही प्राचीन , मध्ययुगीन व आधुनिक अशी इतिहासाची किनार लाभली आहे उस्मानाबाद पासून पंचेवीस किमी अंतरावर असलेल्या प्राचीन काळातील भरभराटीला आलेल्या तेरमुळे उस्मानाबाद शहरातील जुन्या भागात दोन हजार वर्षांपूर्वीची सातवाहन काळातील सोळा एकर वरील वसाहत म्हणजे तेंव्हाचे गाव असून आज ही तिथे मणी, विटा, खापरे इ. सापडतात. त्यामुळे येथील गिरीशिखरात तेरला जाणाऱ्या व्यापारी मार्गावर एकूण तीन लेण्या असून पहिली लेणी उस्मानाबादच्या शहराच्या दक्षिणेस वैराग रोड वर असून तिचे नाव चमारलेणी आहे. या लेण्या पाचव्या शतकातील आहेत व या लेण्यांची नोंद ही बॉम्बे गँझेटरमध्ये आहे. या बौद्ध लेण्या असून येथूनच एक किमी अंतरावर नागनाथ मंदिर परिसरात लाचुंदर लेणी समूह आहे. तर तिसरा मोठा लेणी समूह म्हणजे शहरापासून पश्चिमेस पाच किमी अंतरावर असलेला धाराशिव लेणी समूह होय. ही लेणी सहाव्या शतकात कोरलेली असून प्राचीन करंडक चरयु या ग्रंथात या लेण्यांचा उल्लेख आहे. ब्रिटिश भारताचे पुरातत्त्व खात्याचे महानिर्देशक जेम्स बर्जेस यांनी या लेण्यांचा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शोध लावला. या समूहात एकूण सात लेण्या असून काही बौद्ध लेण्यांचे नंतर जैन लेण्यात रूपांतर केले गेले आहे क्रमांक दोनची मुख्य लेणी असून गर्भगृहात पार्श्वनाथाची सिंहासनावरील पद्मासनातील वज्रलेप दिलेली मुर्ती असून पाठीमागे सात फणा असलेले नाग वर गंधर्व , बाजूला चमार धारक व खाली हरीण, सिंह शिल्पित केलेले आहेत. बाजूलाच पाण्याचे कुंड बघण्यासारखे आहे. हा अवर्षणाचा भाग असल्याने पाण्याची कमतरता सतत असल्याने व उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने, हे कुंड डोंगर पोखरून बनवले गेले आहे. भर उन्हाळात देखील या कुंडात पाणी असते. सातव्या क्रमांक ची लेणी ही हिंदू लेणी असून या लेणीच्या दर्शनी भागावर श्री कृष्णाच्या बाळलिला व काही महत्त्वाचे प्रसंग शिल्पित केलेले आहेत व ते प्रत्येक चौकोनात असून बाजूला मकर प्रणाल, सिंह प्रणाल कोरलेले दिसतात. या लेणी समोर उत्तर पेशवेकालीन शिवगुरु महाराज यांचे समाधी मंदिर आहे. शहरात तुघलकाच्या काळातील मोठा दर्गा असून त्यापाठीमागे धाराशिवची ग्रामदेवी श्री धारासुरमर्दिनीची मंदिर आहे. दरवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात केला जातो आणि दसऱ्या दिवशी गावातील लोक शस्त्र घेऊन देवी मंदिरात दर्शनासाठी जातात.

असा हा संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा, आपल्या कवेत प्राचीन काळापासूनचा वैभवशाली इतिहास घेऊन आज ही उभा आहे. इथल्या इतिहासाला, इथल्या पराक्रमाला, इथल्या जिद्दीला , येथील वास्तूंना व वैभवशाली वारशाला प्रतीक्षा आपल्या भेटीची आहे.

टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

ABOUT THE AUTHOR: Jayraj Khochare इतिहासाची आवड लहानपणा पासूनच होती त्यातूनच किल्ले दुर्ग भ्रमंती तसेच वेगवेगळ्या मोहिमेमध्ये सहभाग. 2016 ला सोलापूर विद्यापीठ मध्ये पुरातत्त्वशास्त्रासाठी अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यापीठामध्ये पुरातत्त्व विभागात प्रथम क्रमांक प्राप्त. इतिहास व पुरातत्त्व परिषद, उस्मानाबाद अंतर्गत अभ्यास वर्ग आयोजित करणे त्यातून लोकांना व उपस्थित यांना संबंधित जागेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास समोर आणण्याचे कार्य करीत आहेत. गेली पंधरा वर्षे इतिहास या विषयावर संशोधन, संकलन , संवर्धनच्या माध्यमातून काम करीत आहेत.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.