श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः आणि सिंहासन

Home \ अतिथीसूत्र \ श्रीशिवराजाभिषेकप्रयोगः आणि सिंहासन

राजा कालस्य कारणम्, राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञः पापं पुरोहितः, ना विष्णुः पृथिवीपतिः या आणि अनेक अशा संकल्पनांद्वारे आपणास राजाचे महत्त्व भारतीय इतिहास आणि संस्कृतीमध्ये दिसून येते. भारतीय इतिहास, संस्कृती, राजकारण, लोकाचरण यावर धर्माचा पगडा दिसून येतो. आपल्याकडील साहित्य आणि तत्त्वज्ञानावर सुध्दा धर्माचा पगडा असल्याने धर्मकेंद्री आणि नीतीतत्त्वे यांची परिभाषा स्पष्ट करणाऱ्या साहित्याची निर्मीती प्राचीन काळात झालेली आहे. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार धर्म मागे पडून जेव्हा अधर्म समाजव्यवस्थेवर प्रभावी होवू लागला, तेव्हा धर्माचे रक्षण आणि पालन यासाठी राजा आणि राजसंस्था निर्मीती करण्यात आली. ऐतरेय ब्राह्मणात राजसंस्था उदयास येतात याबद्दल अनेक मनोरंजक उल्लेख आढळतात त्यापैकीच हा एक-

देवासुरा एषु लोकेषु समयतन्त
तांस्तातोऽसुरा अजयन् ।
देवा अब्रुवन् राजतया वै नो जयन्ति राजानं करवामहा इति
– (ऐतरेय ब्राह्मण)

अर्थः- “देव आणि असूर यांचे या लोकी युध्द झाले; त्यांत असुरांनी देवांचा पराभव केला.  तेव्हा देवांनी विचार करुन ठरविले की राजाच्या (सिंहासनाच्या) बळावर असूर आमचा पराभव करितात यासाठी आपणही कोणाला तरी राजा (करुन त्याचे सिंहासनारोहण) करु या”

उपरोक्त श्लोकात नमूद केलेनुसार देवांनाही असूरांकडून होणाऱ्या पराभवाची मिमांसा करताना असे जाणवले की, राजा आणि सिंहासन या दोन गोष्टींचा असूरांच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे. नंतरच्या काळात ना विष्णुः पृथिवीपतिः या संकल्पनेत राजा हा ईश्वराचा अंश असतो हे मान्य केले आहे. परंतू वरील श्लोकात तर देवांनाच आपल्याकडेही राजसंस्थेची आवश्यकता नमूद केले आहे. राजा या पदासाठी लोकोत्तर पुरुषाची निवड, राज घरण्यातील वंशज अथवा तत्कालीन समिती अथवा सभेद्वारा निवड यापध्दती उपलब्ध होत्याच. तरीही राजाच्या नियुक्तीची प्रक्रीया म्हणजेच राज्याभिषेकास अनन्यसाधारण महत्त्व वेदकाळात होते. वेदकाळात राज्याभिषेक आणि ज्या आसनावर राजाचा अभिषेक होत असे त्याबदल माहिती आपणास ऐतरेय ब्राह्मणां मध्ये मिळून जाते. ऐतरेय ब्राह्मणांत नमूद केलेल्या विहित पध्दतीशिवाय राजाच्या राज्याभिषेकास सशास्त्र स्वरुप प्राप्त होत नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा आपला राज्याभिषेक करण्याचा मानस जेव्हा, आपल्या मंत्रिमंडळ आणि सभासदांपुढे व्यक्त केला तेव्हा, सशास्त्र राज्याभिषेक असलेल्या अडचणीची चर्चा करण्यात आली. विजयनगर आणि देवगिरीच्या यादवांचे राज्य अस्तास गेल्यानंतर बराच शतकापर्यंत कोणत्याही राजाच्या राज्याभिषेकाचा योग आलेला नव्हता. दरम्यानच्या काळात मोघल आणि सुलतानांच्याकडून पदवी स्वरुपात मिळणाऱ्या राजे पदास प्राप्त करुनच धन्यता मानणाऱ्या नेतृत्त्वांचा उदय झालेला होता. महाराष्ट्रातील पंडीत, ब्राह्मण मंडळीं राज्याभिषेक विधी-पध्दतीबद्दल अनभिज्ञ असल्याने आणि इतरही कारणाने महाराजांनी काशीतील गागाभट्टांकडून राज्याभिषेक करुन घेतला. 

गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काय विशेष प्रयत्न केले आणि महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रातील पंडीतांकडून न होता ते गागाभट्टांनीच का केले याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. तत्पुर्वी ज्या विधीमुळे राज्याभिषेकास सशास्त्र विधीचे स्वरुप प्राप्त होते अशा ऐतरेय ब्राह्मणां तील अभिषेकाचा विधी कसा असतो ते पाहू या. ऐतरेय ब्राह्मण हा ब्राह्मण ग्रंथांच्या समुहाचा एक भाग आहे जसे शतपथ, गोपथ, कठ, कपिष्ठल, तैत्तिरीय इ. ब्राह्मणे होय.  मुळातच ब्राह्मण ग्रंथांचा मुख्य विषय म्हणजे यज्ञ होय. त्यानुषंगानेच सोमयाग, राजसूय, अश्वमेध यासारखे यज्ञ ही ब्राह्मण ग्रंथात सांगितले आहेत. अश्वमेध सारखा यज्ञ करणे म्हणजे राजाने आपल्या सार्वभौमत्वाची परिक्षाच देणे होय. राजा आणि प्रजा या दोघांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी राजसूय व अश्वमेध यासारख्या यज्ञाचा उपयोग होत असे. प्रजेच्या बरोबरीने असे अनुष्ठान केले की राष्ट्र समृध्द बनते अशी त्या काळाची धारणा होती. ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेक विधीबद्दल माहिती देण्यात आली असून राजा हा सम्राट, स्वराट, विराट इ. पदवीने युक्त होण्यासाठी राजाला अभिषेक करावा असे नमूद आहे.अथर्ववेदात अभिषेक हा शब्द बऱ्याच ठिकाणी आढळून येतो आणि याच्या संस्काराचे विवरणे सुध्दा आढळतात. जिथे कृष्ण यजुर्वेदात अभिषेकास राजसूय यंज्ञाचा एक भाग म्हणून पार पाडले जाते तिथेच ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेक हा मुख्य विधी समजला गेला आहे. ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेकाचे पुनराभिषेक (अष्टम ५-११) आणि ऐंद्र महाभिषेक (अष्टम १२-२०) असे दोन प्रकार सांगितले आहेत. ऐंद्र महाभिषेक इंद्राच्या राज्याभिषेक विधीशी संबंधित असून पुनराभिषेकात राजाचा राज्याभिषेक आणि आसंदी (सिंहासन) आरोहण विधी सांगितला आहे.  

ऐतरेय ब्राह्मणांत आठव्या खंडात पुनराभिषेक विधीच्या अनुषंगाने सांगितले आहे की, “पुनराभिषेक विधी हा राजासाठी क्षत्रिय म्हणून पुर्नजन्मच (Rebirth) आहे. विधीपूर्वक केलेला अभिषेक आणि पशूबळीनंतर हा यज्ञ पुर्ण (इष्टी) झाला समजण्यात येतो.”

ऐतरेय ब्राह्मणांत अभिषेकाबद्दल नमूद केलेली ऋचा खालील प्रमाणे आहे-

तस्यैते पुरस्तादेव संभारा उपक्लृप्ता भवन्त्यौदुम्बर्यासन्दी
तस्यै प्रादेशमात्राः पादाः स्युररत्निमात्राणि शीर्षण्यानूच्यानि
मौञ्जं  विवयनं व्याघ्रचर्माऽऽस्तरणमौदुम्बरश्वमस उदम्बरशाखा
तस्मिन्नेतस्मिंश्चमसेऽष्टातयानि निषुतानि भवन्ति दधि मधु
सर्पिरातपवर्ष्या आपः शष्याणिच तोक्मानिच सुरा दूर्वा, इति।
– (ऐतरेय ब्राह्मण)

अर्थः- “अभिषेकास आरंभ करण्यापूर्वी आवश्यक ती सर्व तयारी करणे आवश्यक आहे. (उदाहरणात) औदुंबराच्या लाकडाच्या सहाय्याने आसन (सिंहासन) तयार करणे; हे आसन  साधारणतः आगंठा आणि तर्जनी यांच्या मधील वीतभर अंतर एवढे उंच असावे, अर्ध्या बाहू ऐवढे परंपरागत शिरस्त्राण, (तसेच याही वस्तू पुरविल्या पाहिजेत) गवताच्या बांधणीने बनवलेली दोर, आसनावर पसरविण्यासाठी वाघाचे चामडे, औदुंबराच्या लाकडाची पळी (यज्ञासाठी) आणि औदुंबर वृक्षाची (छोटी) फांदी.  अभिषेकामध्ये दही, मध, शुध्द तुप, निर्मल पावसाचे पाणी,  अंकुरीत गवत आणि हिरवे जव, सुरा (एक पेय) आणि दुर्वा.”

तद्यैषा दक्षिणा स्फ्यवर्तनिर्वेदेर्भवति तत्रैतां प्राचीमासन्दीं
प्रतिष्ठापयति तस्या अन्तर्वेदि द्वौ पादौ भवतो बहिर्वेदि द्वावियं
वै श्रीस्तस्या एतत्परिमितं  रुपं यदन्तर्वेद्यष भूमाऽपरिमितो यो
बहिर्वेदि तद्यदस्या  अन्तर्वेदि द्वौ पादौ भवतो बहिर्वेदि द्वा उभयोः
कामयोरुपाप्त्यै यश्चान्तर्वेदि यश्च बहिर्वेदि ॥
– (ऐतरेय ब्राह्मण)

अर्थः- “आसनाची (सिंहासनाची) मांडणी वेदीच्या दक्षिण दिशेला करुन लाकडाच्या पट्टीने वेदीशी असे जोडावे की, आसनाचा पुढील भाग हा पुर्वेकडे असेल आणि आसनाचे दोन पाय वेदीत आणि दोन पाय बाहेर राहतील.  यादरम्यान यज्ञाची भूमी ही भविष्य (म्हणजेच भाग्याच्या देवतेचे प्रतिक) असेल; वेदीमधील काही जागा तिच्यासाठी असेल आणि त्याचबरोबर बाहेरील सर्व जगही (अनंत भूमी).  जर आसनाचे दोन पाय वेदीच्या आंत आणि दोन बाहेर असतील, तर वेदीच्या आतील इच्छित लाभांच्या (यज्ञांच्या उद्देशातून होणा-या) बरोबरच वेदी बाहेरील लाभांची (म्हणजे यज्ञाच्या उद्देशा व्यतिरिक्त इतरही लाभांची) प्राप्ती होईल.”

या प्रमाणे राज्याभिषेकाचा व ऐंद्र महाभिषेकचा विधी नमूद करत असतांना आसंदी म्हणजेच सिंहासनाची स्थापना, अभिषेक, पुजन, आरोहण या संदर्भाने घडणाऱ्या विधींचे विस्तृत वर्णन ऐतरेय ब्राह्मणात करण्यात आलेले आहे. अभिषेक विधी आणि सिंहासनारोहण याचे सखोल विवेंचन मी माझ्या पुस्तकात विस्तृतपणे करणारच आहे. परंतू ऐतरेय ब्राह्मण ग्रंथातील राज्याभिषेक विधीचा उल्लेख येथे करण्याचे एक वेगळेच कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी गागाभट्टांनी “श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगः” हि जी पोथी बनवली होती तेव्हा ऐतरेय ब्राह्मणाचा योग्य वापर संदर्भ ग्रंथ म्हणून केलेला दिसून येतो. ऐतरेय ब्राह्मणाबरोबर वशिष्ठ संहितेचा ही उपयोग ही पोथी बनविण्यासाठी केलेला आहे.

महर्षि वशिष्ठ हे वैदिक काळातील विख्यात ऋषी आणि सनातन मान्यतेमधील सप्तर्षिंपैकी एक होत. योग-वशिष्ठ, रामायण, वशिष्ठ धर्मसूत्र, वशिष्ठ संहिता, वशिष्ठ पुराण, धनुर्वेद या ग्रंथांची निर्मीती करणाऱ्या वशिष्ठांना सृष्टी रचेत्या ब्रह्माचा मानस पुत्र म्हणुनही उल्लेख पुराणात आढळतो. निमि राजाच्या विवाहानंतर वशिष्ठांनी सुर्य वंशाच्या दुसऱ्या शाखांचे पुरोहित कर्म सोडून फक्त इक्ष्वाकु वंशाचे पुरोहित पद स्विकारले. राजा दशरथासाठी पुत्रेष्टि यज्ञ, राजसुय यज्ञ, गंगावतरण, रामाचा वनवासापूर्वीचा आणि नंतरचा राजाभिषेक अशा अनेक महत्त्वाच्या विधींच पौरोहित्य पद त्यांच्याकडेच होते. ऋग्वेदाच्या सातव्या मंडळाचे ते रचनाकार असुन वशिष्ठ धर्मसूत्रामध्ये वर्ण आश्रमाचे धर्म, संस्कार, राजधर्म, प्रायश्चित, दान, सदाचार या संबंधाने लिखाण त्यांनी केलेले आहे. सिंहासनाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने वशिष्ठ संहिता हा ग्रंथ महत्वाचा आहे. वशिष्ठ संहिता हा एक शाक्त ग्रंथ असून ज्योतिष विद्येवर आधारीत ४६ आध्ययांमार्फत शांती, होम, बली, दान वगैरे या विषयांची मांडणी यामध्ये केली आहे.  संहितेमध्ये ३३ व्या अध्ययामध्ये राज्याभिषेक विधी बद्दल सांगून राज्याभिषेकाचा योग्य मुहुर्ताबद्दल भाष्य करतांना योग्य मुहुर्ताचे फायदे, उपयुक्तता सांगत अयोग्य मुहुर्ताचे अनिष्ठ परिणाम ही त्यांनी सांगीतले आहेत.  याविधी दरम्यान राजा पृथ्वीचा अधिपति होण्यासाठी हा विधी सांगतानाच सिंहासनाबद्दल खालील प्रमाणे उल्लेख येतो –

प्राग्भागे मंदिरस्याथ गोमयेन तु कारयेत्।
मंडलं चतुरस्त्रं तद्वर्णकैः समलंकृतम् ॥
तत्र भद्रासनं सम्यग् अर्चयेत्सुमनोहरम् ।
गंगातोयसुसंपूर्णस्वर्ण कुंभोदकैः सह ॥
– (वशिष्ठ संहिता)

अर्थः- “प्रारंभी (राज) मंदिराच्या पूर्वभागास द्रोणाचे चतुष्कोणी मंडल करवून, ते रांगोळी, हळादकुंकू इत्यादींनी सुशोभित करावे.  तेथे सुंदर व मंगल अशा भद्रासनाची (सिंहासनाची) गंगाजलाने परिपूर्ण असलेल्या सुवर्णकलशासह व कुभोदकासह पुजा करावी”

या विधीसाठी सर्व दिशांना ठरवलेल्या प्रमाणे गंध, माळा, वस्त्र, सोने, रत्न, मृत्तिका, बैलाचे शिंग, हस्तिदंत इ. वस्तू घेवून ‘देवस्य त्वा’ या मंत्राने शुभ मुहुर्तावर पुढील विधी करावा –

आब्लिंगैर्वेदमंत्रैश्र्च शुभलग्ने शुभान्विते ।
भद्रासने स नृपतिरभिषेकं च  कारयेत् ॥
नीराजनं च कर्तव्यं शंखवादित्रानिःस्वनै।
आशिषो वाचनं कृत्वा पूजयेच्च सुरान्पितृन्॥
आयुधानि पदंचैव विप्रान् गंध दिनार्चयेत्।
शुक्लमाल्यांबरधृतः प्राड्श्रुखस्य महीपतेः॥
पट्टं शिरसि बध्नीयात् सिहासनगतस्य च।
विप्रेभ्यो दक्षिणां दद्यात मानयेन्मंत्रपूर्वकम्॥
– (वशिष्ठ संहिता)

अर्थः- “शुभ युक्त शुभ लग्नावर, “आपी हि ष्ठा” इत्यादि वेद मंत्रानी भद्रासनावर त्या नृपतीने अभिषेक करवून घ्यावा. शस्त्र व वाद्यें याच्या निनादात निराजन ओवळावे. आशिर्वादाचे मंत्र म्हणून देवाचे आणि पितरांचे पूजन करावे. “गन्ध द्वारा” इत्यादि मंत्र म्हणून आयुधे व ब्राह्मणाचे चरण यांचे अर्चन करावे.  शुभ माळा व वस्त्रे धारण करणा-या पुरोहिताने, पुर्वाभिमुख सिंहासनावर बसलेल्या राजाच्या मस्तकावर फेटा बांधावा व ब्राह्मणांना दक्षिणा देऊन मंत्रपूर्वक त्यांचा सन्मान करावा.”

या प्रमाणे राज्याभिषेक विधी आणि अभिषेक प्रसंगी केल्या जाणा-या मंत्रोच्चाराचा जरी या अध्ययात समावेश केला असला, तरी गागाभट्टांनी ‘वशिष्ठ संहिते’चा उपयोग आपल्या ‘श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगः’ मध्ये अभिषेकाची सुरुवात (प्रस्तावणा) म्हणूनच केलेला दिसून येतो.  

शिवाजी महाराजांनी आपला सशास्त्र राज्याभिषेक करण्याचा निश्चिय केल्याने त्यास योग्य न्याय देईल असे एकमेव गागाभट होते. गागाभट्ट हे धर्मशास्त्राचे जानकार असे विद्वान मूळचे महाराष्ट्रातील पैठणचे मात्र त्यांचे पूर्वज काशी येथे गेले आणि स्थायिक झाले. त्यांच नांव विश्वेश्वर परंतू त्यांचे वडील त्यांस गागा या नावाने हाक मारीत म्हणून त्यांचे नांव गागाभट्ट असेच रुढ झाले. गागाभट्टांनी काशी येथे आपले शिक्षण पुर्ण करत न्याय, मीमांसा, वेदांत या मध्ये प्राविण्य मिळविले. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केलीली असून यामध्येही त्यांनी धर्मशास्त्रावरील ग्रथांनाच प्राधान्य दिलेले आहे. मीमांसाकुसुमांजलि, पिण्डपित्रयज्ञप्रयोग, सुज्ञानदुर्गोदय, राकागमसुधा, भाट्टचिन्तामणि, दिनकरोद्योत, तुलादानप्रयोग इ. ग्रंथ गागाभट्टांनी लिहलेले आहेत. गागाभट्टांचे पांडित्य आणि धर्मशास्त्रातील त्यांचे विद्यार्जन यामुळे त्यांना उत्तर भारतात न्याय आणि धर्मसभांमध्ये मानाचे स्थान होते. परंतु महाराजांनी त्यांना राज्याभिषेकासाठी निवडण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी केलेले कृष्णस नरसिंह शेष यांच्या मताचे केलेले खंडन होय. सम्राट अकबराच्या काळात कृष्ण नरसिंह शेष नावाच्या एका विद्वानाने शुद्राचारशिरोमणि नावाचा ग्रंथ काशी तेथे रचला होता. ‘कलियुगात क्षत्रिय उरले नाहीत’ असा सिद्धांत त्याने या ग्रंथात मांडला. या सिद्धांताचा प्रभाव अन्य प्रांतांतील समाजाप्रमाणे महाराष्ट्रातील समाजावरही पडलेला होता. गागाभट्टांनी शुद्राचारशिरोमणि यातील कृष्णशेषाच्या मतांचे पूर्ण खंडण केले. त्यांनी व त्यांच्या सहकारी पंडीतांनी क्षत्रिय वर्णाच्या अस्तिवाचा सिध्दांत आपल्या तर्काने आणि विचाराने उत्तर भारतात मांडला. नीलकंठभट्टकृत व्यवहारमयूख, कमलाकरभट्टकृत निर्णयकमलाकर उर्फ निर्णयसिंधू, दिनकरभट्टकृत दिनकरोद्योत इत्यादी ग्रंथात कृष्णशेषाच्या मताचे मार्मिक खंडन करण्यात आलेले आहे.   

कृष्णशेषाच्या मताचे खंडन झाल्यामुळे जयपूर, उदेपूर येथे राज्याभिषेक, सिंहासन, व्रतबंध होत होते. जयसिंग यांनी काशी क्षेत्री कलियुगात वर्ज असलेला अश्वमेध केला होता. गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आवश्यक त्यासर्व विधींचे संकलन करुन त्याची पोथी बनविण्यासाठी घेतली. शिवाजी महाराजांच्या आवश्यकतेनुसार राज्याभिषेकाचा प्रकार निवडणे हे आवश्यक होते. ज्येष्ठ इतिहास कर वा. सी. बेंद्रे यांनी राज्याभिषेकाचे खालील प्रमाणे तीन प्रकार सांगितले आहेत.- 

(१) सांवत्सराभिषेक  किंवा मंचकारोहन – पहिल्यापासूनच अस्तित्वात असलेल्या सिंहासनावर आरोहण जे राजा आजारी अथवा मृत्यूनंतर संवत्सर पुरोहिताद्वारे केले जाते. 

(२) संवत्सराभिषेक किंवा जन्मनक्षत्रे अभिषेकः – हा अभिषेक नियतकालिक म्हणजे वार्षिक किंवा मासिक समारंभ असतो. ज्या नक्षत्रावर राजाचा प्रथम अभिषेक केलेला असतो, त्याच नक्षत्रावर दरवर्षी आणि महिन्याला केला जातो. 

(३) महाराजाभिषेक किंवा ऐन्द्र्याभिषेक सोहळा – राज्याभिषेकाचा हा प्रकार नवीन राज्य वा सिंहासनावर किंवा राजास सम्राटाचा दर्जा मिळतो तेव्हा केले जाते. 

गागाभट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक ‘महाराजाभिषेक किंवा ऐन्द्र्याभिषेक’ पध्दतीने करावयाचे निश्चित केले. कोण –कोणते विधी करावयाचे निश्चित केले. राज्याभिषेक विधि कसा करावयाचा, कोणकोणते धार्मिक विधि व समारंभ कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी करावयाचे याचे तपशिलवार वर्णन ‘श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगः’ या पोथीमध्ये करण्यात आले. या पोथीमध्ये खालील प्रमाणे विधींचे तिथीनुसार वर्गीकरण केलेले आहे.-

श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगामधील विधींच्या क्रमांनुसार आवश्यक ते साहित्य, फुले, सेवक, गायक, मंत्र-जप करणारे जापक, गवय्ये, वैदिक, ब्राह्मणवृंद यांची व्यवस्था करण्यात आली होती. राज्याभिषेकामध्ये राजाच्या आसनाला अनन्यसाधारण महत्व असल्याने विधीनुसार लागणा-या आसनांची व्यवस्था अधिच करुन ठेवलेली होती. या पोथीमधील राज्याभिषेक विधी (श्लोक ३ ते २९ ) मुळात वसिष्ठ संहितेतील ३३ व्या राज्याभिषेकाध्यायातील (श्लोक १ ते २७) आहेत. पुढील विधीचा भाग हा विष्णुधर्मोत्तर मध्ये सांगितलेला आहे. पोथीमध्ये मंचक, भद्रासन, पीठ, आसंदी, सिंहासन अशा विविध नावांनी राजाच्या आसनाबद्दल उल्लेख आलेला आहे. परंतू विष्णुधर्मोत्तर पुराणात खालील प्रमाणे आसनाचे प्रकार सांगितले आहेत – 

प्रहारतः प्रयोक्तव्यमावेशे क्रन्दने तथा ।
भद्रासनं तु देवानां राज्ञां सिंहासनं भवेत ।।
रूप्यासनं तु दातव्यं सांवत्सरपुरोधसोः ।
वेत्रासनममात्यानां मन्त्रिणां तु तथा भवेत ।।
मन्दासनं तु दातव्यं सेनानीयुवराजयोः ।
मुनीनां च द्विजानां च तथा सब्रह्मचारिणाम् ।।  (विष्णूधर्मोत्तरपुराणम्) 

“विष्णूधर्मोत्तर पुराणात सिंहासन हे राजाचे आसन असून देवांसाठी भद्रासन वापरावे असे सांगीतले आहे.  तसेच रुप्यासन(चांदीचे आसन) हे राज ज्योतिषी(पुरोहीत) व प्रधानास आणि मंत्री व सचिवांना वेत्रासन (लाकडाचे) वापरावे हे नमूद करत सेनापती व युवराजास मंदासन (मंद वनस्पतीच्या पासून बनवलेल) वापरावे”

श्रीशिवराज्याभिषेकप्रयोगामधील सिंहासनाचे उल्लेख 

राज्याभिषेकाच्या पहिल्या दिवशी विनायक शांतीनंतर वेदीची स्थापना करुन भद्रासनावर महाराजांना आसनस्त करुन त्यांस मृत्तिकास्नान घालण्यात आले. पुढील दिवशी सुध्दा सप्तमृत्तिकाने अभिषेक करुन महाराजांना अभिषेक करण्यात आला. वेगवेगळ्या दिवशी कोणते कोणते विधी करण्यात आले हे उरोक्त परिच्छेदात नमूद केले आहे. परंतू सिंहासनारोहणाचा मुख्य विधी हा ६ जून १६७४ ला आठव्या दिवशी होणार होता. गागा भट्टांनी  “ज्येष्ठ शुध्द १२, शुक्रवार घटी २१, पळे ३४, विष्कंभ ३८, घटिका ४०,पळे सिं ४२ तीन घटिका रात्र उरली” असतानाचा मुहूर्त काढला होता. सुर्योदयापूर्वी तास-सव्वातास अधिचा हा मुहूर्त म्हणजेच नेहमी ज्या वेळेस गर्गाचार्याचा मुहूर्त म्हणतात तोच हा होय. या दिवशी महाराजांचे दोन महत्वाचे अभिषेक झाले एक अभिषेक शाळेत भद्रासनावर तर एक वेदी जवळ आसंदीवर. ऐन्द्र्याभिषेकाचा विधी पुर्ण झाल्यावर महाराज सदरेवर आले आणि सिंहासनारोहणाचा मुख्य विधी तेथे पार पडला. श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः मध्ये सिंहासनारोहणाच्या विधीबद्दल खालील बाब नमूद आहे –

ततः सभामंडपस्थापितसिंहासने वृषमार्जारद्विपिसिंहव्याघ्र-
चर्मस्तुते मंगलघोषेण उपविश्य अस्य सिरसि स्वस्ति
नो मिमीत्येति पट्टं बध्नीयात्। ततः तत्र प्रतिहारोऽमात्यान्
पौरान् नैगमान् पंडितान् वाणिजोऽन्यांश्च लोकान् प्रदर्शयेत्।
– (श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः)

अर्थः- “त्यानंतर सभामंडपात (सदरेवर) स्थापन केलेल्या सिंहासनावर, बैल, माजर, हत्ती, सिंह, वाघ याची कातडी आथरुन त्यावर मंगलघोषात (शिवाजी महाराजांना) बसवून त्या मस्तकावर “स्वस्ति नो मिमीत्य” इत्यादी मंत्र म्हणत पट्टबंधन करावे (जीरेटोप परिधान करण्यात यावा) त्यानंतर तेथल्या प्रतिहाराने अमात्य (अष्टप्रधान), नगरप्रमुख (प्रमुख सरदार व किल्लेदार), वेदज्ञ पंडित (गागाभट्ट, बाळंभट्ट, निश्चलपुरी व परंमानंद गोसावी), व्यापारी व इतर लोकांची ओळख करुन द्यावी.” 

या प्रसंगास अनुसरुनच शिवाजी महाराजांनी इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिडेन यास गडावर रोखून ठेवले होते. सिंहासनारोहण झालेनंतर छत्रपती म्हणून आपल्या अष्टप्रधान, सुभेदार, सरदार यांच्याबरोबरच व्यापारी व रयते सोबत भेटवस्तुंची देवान-घेवानीचा सोहळा प्रत्यक्षात पार पडला.  ऑक्झिडेन ह्या सोहळ्यास प्रत्यक्ष हजर होता आणि त्याने या सोहळ्याचे वर्णन आपल्या डायरीमध्येही नमूद करुन ठेवले आहे. ऑक्झिडेन लिहतो, “साधारण ७-८ वाजता आम्ही दरबारात गेलो. त्या वेळी (छत्रपति शिवाजी) राजा भव्य सिंहासनावर आरुढ झालेला व मूल्यवान पोशाखात असलेल्या (अष्ट) प्रधानांनी वेढलेला दिसला. त्याचा पुत्र संभाजी राजा, पेशवा मोरो पंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण (बाळंभट्ट ?) हे सिंहासनाच्या खाली पायरीवर (अगर ओट्यावर) बसले होते. इतर बाकी अमंलदार, सेनापती सह (सिंहासनाच्या) बाजुला आदराने उभे होते. मी (काही अंतरावरुनच) मुजरा केला आणि नारायण शेणव्याने (सार्वभौम सिंहासनाधिश्वरास) नजर करावयाची हि-याची अंगठी (सिंहासनाच्या दिशेने) वर धरली. शिवाजीचे आमच्याकडे लक्ष जाताच, त्यांनी अगदी सिंहासनाच्या पायरीजवळ येण्याचा आम्हाला हुकूम केला व पोशाख देऊन आम्हांला तत्काळ रजा दिली. थोड्याच वेळ आम्ही सिंहासनासमोर होतो.”

सिंहासन हा माझ्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. उपरोक्त संकलन हे माझ्या पुस्तकातील कच्च्या मसुद्याचा भाग आहे. जो आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमीत्ताने आपल्या समक्ष प्रस्तुत केला आहे. वरील सर्व मजकूर हा छपाईच्या प्रक्रियेचा आणि प्रताधिकारचा भाग असल्याने त्यामध्ये बदल व दुरुस्ती होवू शकते. तसेच सदरील मजकूराचा वापर लेखाकाच्या परवानगी शिवाय करणे उचित ठरणार नाही. 

संदर्भ –

  • ऐतरेय ब्राह्मण,
  • परशुराम महादेव लिमये, भारतीयांच्या शासनपध्दति व शासनविषयक कल्पना (१९२८)
  • डॉ. विद्याधर विश्वनाथ भिडे, ब्राह्मणकालीन समाजदर्शन, त्रैमासिक भारत इतिहास संशोधक मंडळ (वर्ष ५२, अंक१-४, १९७४), ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड-१५, पृष्ठ २०.
  • Martin Hang, Aitareya Brahmanam of Rigveda (1922)
  • Edited by Shri. V. S. Bendrey, Coronation Of Shivaji The Great
  • वशिष्ठ संहिता
  • Edited by B. K. APTE, Chhatrapati Shivaji Coronation Tercentenary Commemoration Valume,
  • गागाभट्ट (मराठी विश्वकोष)
  • विष्णूधर्मोत्तर पुराण
  • श्री शिवराज्याभिषेक प्रयोगः
  • हिंदूपदपादशाहीचे सिंहासन

टीप – सदर लेखातील मते, विचार आणि लेखाची मांडणी ही संबंधित लेखकाची आहे.

ABOUT THE AUTHOR: Mukesh Vadiyar महाराष्ट्र शासनाकडे लेखापरीक्षक म्हणून कार्यरत असून सध्या शिवाजी महाराजांचे सिंहासन आणि तद्नुषंगीक मराठा इतिहास हा त्यांचा सध्याचा अभ्यासाचा विषय आहे. शिवाजी महाराजांचे सिंहासन, मराठ्यांची दुर्गनीति, ऐतिहासीक वास्तू आणि समाधि या विषयावर ते लेखन व संकलन करत आहेत.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.