स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

Home \ बोधसूत्र \ स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। 
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।। 1 ।।

कोणत्याही कार्याचा आरंभ, आपण श्रीगणेशाच्या पूजनाने करतो. गणेश या देवतेचा दैवतशास्त्रीय विचार स्वतंत्रपणे करणे उचित ठरेल. आजच्या स्वाध्याय सुधाच्या या भागात मात्र श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्वाचा विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 

भगवान श्रीकृष्णाने मुखर केलेली श्रीमद् भगवद्गीता, श्रीज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या अलगद, हळुवार शब्दांमधून जनसामान्यांच्या हृदयात भावार्थदीपिकेच्या रुपात स्थापित केली. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने जीवनाचे सार सांगितले ते ज्ञानेश्वर माउलींनी भावार्थाने प्रकट केले, जे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आजही चित्ताला दिग्दर्शन करते आहे.

भक्तशिरोमणी नामदेव महाराज, भावार्थदीपिका या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणतात. श्रीज्ञानेश्वर माउलींची भावार्थदीपिका ही रचना गीतेवरील भाष्य असले तरी, या ग्रंथातून प्रमेयाच्या अनेक ब्रह्मानंदलहरी श्रीज्ञानेश्वर माउलींनी प्रकट केल्या आहेत. भावार्थदीपिकेची थोरवी मोठी आहे, ती अनुभवण्यातच सार्थता आहे. 

या भावार्थदीपिकेला समजून घेण्याच्या दृष्टीने यातील प्रथम ओवीला मी सुरुवात केली, मंगलाचरणाने.. प्रत्येक कार्याचा आरंभ या गौरीपुत्र विनायकाच्या स्मरणाने होतो तसाच येथेही झाला आहे. इथूनच खरतरं श्रीज्ञानेश्वर माउली त्यांच्या वाग्वैभवाची दालनं खुले करून देतात.

एक एक शब्द वेचावा आणि त्यातला अर्थ हृदयाच्या छोट्याश्या कुपीत साठवून जपावा इतका अनमोल. माउलींचा शब्दरूप श्रीगणेश मनःपटलावर हळूहळू आकार घेत जातो, आणि मंगलाचरण होईस तोवर, आपल्यासमोर तत्त्वरूप श्रीगणेश उभा राहतो. अगदी आपण गणेशाची मातीची मूर्ती घडवताना होते तसेच, निराकारापासून साकारापर्येंतचा साक्षात प्रवास, पण भावार्थदीपिकेत हा शब्दबद्ध आहे आणि यात तत्त्वाचे चैतन्य भरून राहिले आहे.

मंगलाचरणारंभ

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ।। 1 ।। 

भारतीय संस्कृतीमध्ये ॐकार हा प्रणव मानला गेला आहे. हिंदू, बौद्ध, जैन अगदी शीख बांधवांमध्येही ओमकाराचे विशेष महत्त्व आहे. ॐकाराचे स्वतंत्र चिंतन इथे नाही, त्यासाठी विस्तृत चिंतन पुढे असेलच.

ॐकार या आद्य प्रणवाने ग्रंथारंभ होतो. ॐकार हे त्या ब्रह्मस्वरूपाचे स्थूल असे मंगलकारक अभिधान आहे. या ॐकाराला ‘आद्या’ म्हणजे सर्वांचे मूळ असलेला, असे म्हटले आहे. गुलाबराव महाराजांनी ‘आद्या’ या शब्दातील आरंभवादाचा गुढार्थ प्रतिपादित केला आहे.

वेद प्रतिपाद्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असलेल्या त्या ॐकाराचे चिंतन केले आहे. ‘स्वसंवेद्या’ इथे स्वतःला जाणण्यास योग्य असलेल्या त्या ‘आत्मरूप’ तत्त्वाचा जय जयकार केला आहे.

उपनिषद् ज्ञानपरंपरेत आत्म्याचे चिंतन अनेकदा आले आहे. हा कोणत्या आत्मरुपाला नमस्कार आहे? हे जाणून घेताना या उपनिषदांचा उपयोग होतो. ऐतरेय उपनिषदामध्ये आत्मस्वरूप, हे आद्य मानले आहे.

आत्मा वा इदमक एवाग्र आसीन्नान्यत्किंचन मिषत् ।।  1.1

याचा अर्थ असा की, पूर्वी केवळ आत्माच व्यापून होता, दुसरे काहीच नव्हते. श्रुतीवचन सांगते की, कोणत्याही प्रकारची हालचाल करणारे काही नव्हते तेव्हा, या जगताला आत्मा व्यापून होता. इथे आत्मा हा परमात्म्याचे शब्दरूप म्हणूनच येतो. त्याच न्यायाने भावार्थदीपिकेतील आत्मरूप म्हणजे त्या परमात्म्यालाच हा नमस्कार आहे.

देवा तूंचि गणेशु सकलमति प्रकाशु
म्हणे निवृत्ति दासु अवधारिजो जी ।। 2 ।।

श्रीगणेश हा देव, सर्वांच्या बुद्धीला, ज्ञानाच्या प्रकाशाने उजळवून टाकणारा आहे. त्यामुळे त्याच्या स्मरणाने उत्तम ज्ञानच प्रकाश व्हावा ही प्रार्थना ‘निवृत्ति दासु’ म्हणजे श्रीज्ञानेश्वर करीत आहेत. श्रीनिवृत्तिनाथ महाराज हे श्रीज्ञानेश्वरांचे जेष्ठ बंधू तर होतेच, पण ते त्यांचे गुरुही होते. आपल्या गुरूंचे दास्यत्व पत्करून विनम्रपणे ते श्रीगणेशाचे स्मरण करीत आहेत. 

मूर्तीस्वरूप श्री गणेश

हें शब्दब्रह्म अशेष तेचि मूर्ति सुवेष
तेथ वर्णवपु निर्दोष मिरवत असे ।। 3 ।। 

श्रीज्ञानेश्वर माउली श्रीगणेशाचे शब्दचित्र रेखाटायला सुरु करतात. हें शब्दब्रह्म अशेष शब्दब्रह्म या संज्ञेची व्याप्ती व्यापक आहे. पण इथे शब्दब्रह्म वेदवाङ्मय याला उद्देशून आहे. सर्व वेद, शास्त्र, पुराणे, स्मृती यांची एकात्म स्वरूपाने बनलेली ही गणेशाची रेखीव, सुंदर सजवलेली मूर्ती आहे असे मानले आहे.

ही गणेश मूर्ती वर्णवपु निर्दोष आहे. गुलाबराव महाराज वर्णवपु निर्दोष म्हणजे नेमके काय हे समजावतात. श्रीज्ञानेश्वरांनी मानलेल्या श्रुती, स्मृती, पुराणोक्त शास्त्रे यांच्यातील एकवाक्यता आणि त्यांची महत्ता इथे प्रतीत होते.

या वाङ्मयाची वर्णरचना ही पूर्णतः निर्दोष आहे. इथे ‘निर्दोष’ हा शब्द भ्रम, प्रमाद, करणापाटव आणि विप्रलिप्सा या चार दोषांचे खंडन करतो. भ्रम म्हणजे विपरीत ज्ञान, प्रमाद म्हणजे चुकणे, करणापाटव म्हणजे इंद्रियांची असमार्थ्याता आणि विप्रलिप्सा म्हणजे खोटे बोलून फसवण्याची बुद्धी. म्हणजे हे वाङ्मयादि दोषरहित वर्णरचनेतून साकार झालेली ही श्रीगणेश मूर्ती आहे.

स्मृति तेचि अवयव देखा अंगिकभाव ।
तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा ।। 4

स्मृतीग्रंथांमध्ये धर्मशास्त्र आणि षड्दर्शने यांचा अंतर्भाव होतो. स्मृती हे या गणेशाचे अवयव म्हटले आहेत. शरीर शास्त्राचा विचार केला तर मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आणि त्यांच्या सहाय्यक इंद्रियांची काही विशिष्ट कार्ये आहेत. आणि हे कार्य साध्य करून घेऊन शरीरास पुष्टी प्राप्त होते. त्याचप्रमाणे इथे, श्रुतींचे अर्थ किंवा त्यांचे ज्ञान स्मृतींमधून पुन्हा पुन्हा व्यक्त होत आले आहे. त्यामुळे या स्मृती भांडाराचे लावण्य अबाधित राहिले आहे. स्मृतींमधील विषयांच्या मर्माने त्यातील प्रतिपाद्य सिद्धांतांची शोभा अधिक वाढली आहे. 

वस्त्रालंकारांचे लावण्य

अष्टादश पुराणे तीचि मणिभूषणे ।
पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची 5

मूर्तीशास्त्रामध्ये वस्त्रालंकार, आभूषणे ही एखाद्या प्रतिमेचे लावण्य अधिक मनोहर करण्याकरीता अतिशय कल्पकतेने, बारकाईने आणि सौंदर्यदृष्टीने योजलेले असतात. तीच गोडी इथेही जाणवते. पुराणांची संख्या अठरा मानली आहे. इथे या अठरा पुराणांना या श्रीगणेशाची मणिभूषणे म्हटले आहे. ही अठरा महत्त्वाची किंवा प्राचीन पुराणे कोणती हे या पुढील श्लोकामधून समजेल.  

मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयम् ।​​
अनापलिंगकूस्कानि पुराणानि प्रचक्षते  

याच अर्थ असा की, दोन म (मत्स्य, मार्कंडेय), दोन भ (भागवत, भविष्य), तीन ब्र (ब्रह्म, ब्रम्हाण्ड, ब्रह्मवैवर्त्य), चार व (वराह, विष्णू, वामन, वायू) आणि अग्नी, नारद, पद्म, लिंग, गरुड, कूर्म, स्कन्द अशी एकूण अठरा पुराणे आहेत.

पुराणांचे स्वरूप कसे असते किंव्या त्यामध्ये अंतर्भाव होणाऱ्या विषयांच्या माहिती लक्षणावरून मिळते. पुराणांची पाच लक्षणे सांगितली आहेत, ती पुढीलप्रमाणे –

सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च।
वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम् ।।

सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित ही पुराणांची पाच लक्षणे आहेत.

  1. सर्ग – सर्गामध्ये सृष्टीची निर्मिती
  2. प्रतिसर्ग – सृष्टीचा लय
  3. वंश – विविध वंशांची उत्पत्ती आणि वृद्धी
  4. मन्वंतर – प्रत्येक मन्वंतराचे वैशिष्ट्य
  5. वंशानुचरित – वंशातील प्रसिद्ध पुरुषाचे वर्णन

पुराणांची रचना ही वर नमुद केलेल्या लक्षणांनी युक्त अशी असली तरी याशिवाय इतरही विषयांचे प्रतिपादन या पुराणांमधून येते. पुराणांमधील प्रतिपाद्य विषय हे त्या विशिष्ट पुराणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जसे की, अग्नी, गरुड आणि नारद पुराणांतून संस्कृत साहित्य, कला, वैद्यकीयशास्त्र, व्याकरण यांची माहिती मिळते. पद्म, स्कन्द आणि भविष्य यासारख्या पुराणांमधून तीर्थे आणि व्रते यांची माहिती मिळते. लिंग,वामन, मार्कंडेय, शिवपुराण यांमधून विविध संप्रदाय यांची माहिती मिळते. 

श्रीज्ञानेश्वरांनी अतिशय बारकाईने ही गणेशाची शब्द-प्रतिमा साकारली आहे. त्यांनी या अठरा पुराणांना मौल्यवान अशी मणी आभूषणे बनवून, या गणेशाच्या स्मृतीरूपी अवयवांना सुशोभित केले आहे. ही सुंदर मणिभूषणे या पुराणांमधून रचलेल्या छंदोबद्ध शब्दांच्या कोंदणात बसवलेली आहेत. या पुराणांमधून जे सिद्धांत आले ते म्हणजे या श्रीगणेशाच्या अभूषणातील रत्न बनून चमकत आहेत.  

पदबंध नागर तेचि रंगाथिले अंबर
जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे 6 ।।

यातील शब्दांच्या बांधणीने या गणेशाचे सुंदर असे रंगविलेले वस्त्र तयार झाले आहे. या वस्त्राचे तलम पण तेजस्वी तंतू या शब्दरचनेतील विविध उपमा आणि अलंकारांच्या रूपाने झळाळत आहे.  

देखा काव्यनाटका जे निर्धारिता सकौतुका
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी ।। 7 ।।

श्रीगणेश कलेची देवता म्हणूनही पूजनीय आहे. इथेही काव्य आणि नाट्य या कला गणेशाचे अलंकार बनून त्याच्या दिव्य स्वरूपाची प्रभा वाढवत आहे. गणेशाच्या पायामधील पैंजणे म्हणजे काव्य आणि नाटक. या पैंजणातील छोटे छोटे घुंगरु रुणझुण करीत आहेत. या काव्य आणि नाटक आदि मधला अर्थ या पैंजणाच्या झंकारातून अलगत उमटत आहे. काव्य आणि नाटके ही वेदार्थाला धरून आणि त्याला अनुकूल अश्याच प्रतिध्वनीचा उद्घोष करीत आहेत, हे इथे दिसते.

नाना प्रमेयांचि परी निपुणपणे पाहता कुसरी
दिसती उचित पदे माझारी रत्नें भली ।। 8 ।।

या कलांमधून उमटलेले वैदिक सिद्धांत इतके नेटके आणि कौशल्याने मांडले आहेत. हे सिद्धांत सांगणारी काव्यशास्त्रातील आणि नाट्यशास्त्रातील विविध पदे ही रत्नासमान मौल्यवान आहेत.

तेथ व्यासादिकांच्या मति तेचि मेखळा मिरवती
चोखाळपणे झळकती पल्लवसडका ।। 9 ।।

व्यास आदि ऋषींच्या विचारप्रांताची मर्यादा म्हणजे या गणेशाच्या कंबरेचे शेला. ‘पल्लवसडका’ म्हणजे या शेल्याच्या पदराचे पडलेले निरनिराळे पदर किंवा निऱ्या आहेत. हे निरनिराळे पदर जरी वेगवेगळ्या विचार मतांचे प्रतिनिधित्व करीत असल्या तरी त्या एकाच शेल्याच्या अविभाज्य भाग आहेत.

स्वाध्याय सुधा सूत्र 2. हा भाग श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व या लेखाचा पूर्वार्ध आहे. याच लेखाच्या उत्तरार्धात या श्रीगणेशाचे उर्वरित तत्त्वरूपाचे चिंतन आपल्याला अवलोकन करण्यास पुढील सूत्रामध्ये उपलब्ध होईल.

(क्रमश….)
– वैशाख शु. 9 शके 1943, शुक्रवार (14 मे 2021)..

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

One thought on “स्वाध्याय सुधा सूत्र 2. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (पूर्वार्ध)

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.