सिद्धांत आणि साधना यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या या योगदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः या स्वाध्याय सुधाच्या पूर्वसूत्रामध्ये आपण योग परंपरेचा संक्षिप्त इतिहास पाहिला. याशिवाय योगदर्शनाचे स्वरूप काय आहे हे जाणून घेतले. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे नेमके काय? आणि योगसूत्रातील या सूत्रामध्ये आलेल्या चित्तवृत्ती कुठल्या हेही पाहिले. स्वाध्याय सुधाच्या या सूत्रामध्ये आपण या चित्तवृत्तींचा क्षय करण्याचे साधन कोणते आहे, हे बघणार आहोत.
स्वाध्याय सुधा सूत्र 6. योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 2) सुरु करण्यापूर्वी योगश्चित्तवृत्तिनिरोधः (भाग 1) इथे जोडत आहे.
योगदर्शनाची सैध्यांतिक परंपरा ही सांख्य दर्शनाच्या सोबतच चालणारी आहे. त्यामुळे योगदर्शनातही बंधनाचे मुळ कारण अविवेक मानले आहे. त्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध हा योगाचा अर्थ योग दर्शनांतून पुढे आला आहे. याच योगाची आठ अंगे, योगसूत्राच्या दुसऱ्या भागांत म्हणजे साधनपाद आणि विभूतीपाद मध्ये सांगितली आहेत. ‘साधनपाद’ या संज्ञेवरूनच यांत अंतर्भाव होणाऱ्या विषयांचा अर्थबोध होतो. प्रथम भाग म्हणजे समाधीपाद सिद्ध करताना योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे काय, हे महर्षी सांगतात. तर योगश्चित्तवृत्तिनिरोधः साध्या करण्याचे साधन या भागामध्ये महर्षी आपल्या समक्ष ठेवत आहेत. ते साधन म्हणजेच अष्टांग योग.
योगाङ्गाऽनुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः॥२.२८॥
याचा अर्थ असा की योग अनुष्ठानाने पंच भेदात्मक अविद्येचा क्षय होतो. तत्क्षयेसम्यग्ज्ञानस्याभिव्यक्तिः म्हणजे अविद्येच्या क्षयाने यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते. ही ज्ञानची प्राप्ती क्षयक्रमानुरोधिनी ज्ञानस्यापि दीप्तिर्विवर्धते म्हणजेच अविद्या क्षय क्रमानुसार ज्ञानाचा प्रकाश वाढत जातो. विवेकख्याती ही या ज्ञानप्रकाशातील सर्वांत अंतिम आणि तेजस्वी शलाका आहे. या तेजस्वी शलाकेचा उदय म्हणजेच जीवनमुक्ती, जी कैवल्य मुक्तीचे प्रथम पाद म्हणता येईल.
ही यौगिक संस्कृती आपल्या सर्वांच्या जीवनातील नैतिक मूल्य रुजवणारी शिक्षा प्रणाली आहे. परंतु अनुकरणीय स्वभावाच्या आधीन जाणून आपण आपल्याच संस्कृतीपासून हळूहळू दुरावत आहोत. योगशास्त्र हे प्राचीन दर्शन किंवा शास्त्र आहे, त्यामुळे ते केवळ ग्रंथामध्ये अडकून ठेवण्यापेक्षा, आजच्या काळानुरूप ही योगविद्या आपल्या जीवनाचा भाग करण्याचा संकल्प आपण सर्वांनी घ्यायला हरकत नाही.
शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, व्यावहारिक आणि आध्यात्मिक या पाच स्थरांवर आपल्या जीवनाचा उत्कर्ष या योग साधनेतून साध्य करता येतो. त्यामुळे योगाचरण हे केवळ योगीजन किंवा साधकांसाठी सांगितले असेल, असे समजून ते दुर्लक्षित करणे म्हणजे खरंतर स्वतःकडेच आपण दुर्लक्ष करण्यासारखे आहे.
हे सगळे विवेचन प्राचीन काळाला धरून असले, तरी त्याचा आताच्या आधुनिक काळातील आवश्यकता आणि महत्त्व चिंतन करण्यायोग्य आहे. आजच्या आधुनिक युगांत आपण सर्वच, अगदी मीही या तंत्रज्ञानाने जोडले गेलो आहोत. या आधुनिकतेमुळे मानवी विकासाच्या कक्षा रुंदावत आहेत ही जमेची बाजू. आज वैश्विक महामारीचे संकट जेव्हा आपल्यापुढे आवासून उभे राहिले तेव्हा अनेक शारीरिक, मानसिक व्याधी समोर आल्या. इतकेच नाही तर अनेकांनी नैराश्याच्या खोल गर्तेत स्वतःला ढकलून टोकाचे पाऊलही उचलले. हे कितपत योग्य आहे? स्वतःसाठी, आपल्या परीजानांसाठी आणि समाज स्वस्थासाठीही अश्या गोष्टी निश्चितच योग्य नाहीत.
योग दर्शनाने देह आणि मन या दोहोंना समान प्राधान्य दिले आहे. आधुनिक युगातही मनावर संयम आणि शरीरामध्ये दृढता, समतोल साधण्याचे योग हे उत्तम साधन आहे, हे फक्त आपल्याला समजले पाहिजे. या संपूर्ण अष्टांगातील केवळ आसन आणि प्राणायाम, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतात. त्यामुळे आजच्या सूत्रामध्ये अष्टांग योग थोडक्यात समजवून घेऊया.
अष्टांग योग
महर्षी पतञ्जली यांनी योगसूत्रामध्ये योगाची आठ अंगे सांगितली आहेत, त्यांना अष्टांग म्हणतात. या अष्टांगांच्या सहाय्याने चित्तवृत्तींचे शमन शक्य आहे. ही आठ अंगे पुढील सूत्रातून समजून घेऊया –
यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टावङ्गानि॥ २.२९ ॥
यम , नियम , आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा , ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. या अंगांना महर्षींनी बहिरंग साधन आणि अंतरंग साधन अश्या दोन क्षेत्र विभागात विभागले आहे. बहिरंग साधनामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार यांचा समावेश होतो. तर अंतरंग साधनामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी येतात.
बहिरंग म्हणजे याच उद्देश्य हा बाह्य रूपाने मनुष्य जीवनाचे परिशोधन करणे हा अपेक्षित आहे. यम आचरणाने सामाजिक, नियम आचरणाने वैयक्तिक, आसन अभ्यासाने शारीरिक, प्राणायामाने प्राण तर प्रत्याहाराने इंद्रिय शुद्धी साधता येते. याच प्रमाणे अंतरंग साधनाने देहाच्या अंतरंगात सूक्ष्म- अतिसूक्ष्म स्थरावर शुद्धी साध्य केली जाते. अंतरिक योग साधनेत धारणेतून मनशुद्धी, ध्यानातून अस्मिता शुद्धी, समाधी मधून चित्तशुद्धी प्राप्त होते.
1. यम म्हणजे काय ?
अष्टांग योग मधील सर्वप्रथम अंग म्हणजे यम. आपल्याला यम ही देवता म्हणून माहिती आहे. यामाचेच दुसरे नाव धर्मराज असेही आहे. यम ही देवता म्हणून जेव्हा त्याचा विचार होतो तेव्हा ‘अनुशासन’ हा त्याचा स्वभावधर्म चटकन आपल्या लक्षात येतो. इथे यम देवता म्हणून नव्हे परंतु संकल्पना म्हणून, योगाचे प्राथमिक अंग म्हणून समजणे श्रेयस्कर आहे. अनुशासन आणि नियमांसाठी कटिबद्धता म्हणजे यम. सामाजिक नियमांचे अनुपालन करण्यासाठी आधी स्वतःला एका कक्षेमध्ये बसवून तयार करावे लागते. या कक्षा नेमक्या कोणत्या आहेत, तेही महर्षी सांगतात.
अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः॥२.३०॥
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहा म्हणजे यम. या प्रत्येक संज्ञा अत्यंत चिंतनीय आहेत आणि त्याहीपेक्षा कठीण त्यांचे अनुपालन आहे. त्यामुळे शब्दमर्यादेचे नियम पळून या यम संज्ञांना स्वतंत्र सूत्रामध्ये न्याय द्यावा या विचाराने मी पुढे जात आहे.
- अहिंसा – सदैव आणि सर्वत्र चित्त, वचन आणि देहानेही हिंसा न करणे म्हणजे अहिंसा.
- सत्य – अर्थानुकुल वाणी आणि मनाचा व्यवहार असणे म्हणजे सत्य.
- अस्तेय- अस्तेय म्हणजे चौर्यकर्म न करणे.
- ब्रह्मचर्य – ब्रह्मचर्य म्हणजे विषय भोग भावना बुद्धीमध्ये उत्पन्न न होवू देणे.
- अपरिग्रह – अपरिग्रह म्हणजे संचय न करणे. या पाच यमांचे अनुष्ठान सध्या करून साधक नियम या द्वितीय अंगाच्या प्राप्तीसाठी मार्गस्थ होतो.
2. नियम म्हणजे काय?
योग सूत्रामध्ये यम या पहिल्या अंगानंतर नियम हे अंग आहे. नियम हे वैयक्तिक अनुशासन आणि आत्म परिशोधनास प्रवृत्त करतात.
शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः॥२.३२॥
- शौच – शौच म्हणजे शुद्धता. शरीर आणि मन यांची अंतर्बाह्य शुद्धता इथे अपेक्षित आहे.
- संतोष – संतोष म्हणजे अंतरिक सुख प्राप्ती.
- तप – देह, मन आणि इंद्रिये यांच्याद्वारा संयम पालन मोठे उद्दिष्ट साध्य करण्या करिता आवश्यक असे व्रत, अनुष्ठान करण्याच्या कष्टकारक आचरणाला तप म्हणतात.
- स्वाध्याय – स्वतःला निश्चयपूर्वक जाणणे.
- ईश्वरप्रणिधान – ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती.
3. आसन म्हणजे काय?
स्थिरसुखम् आसनम् ॥२.४६॥
आसनांची व्याख्याच अत्यंत सुरेख केली आहे. आसनं म्हणजे ज्यामध्ये स्थिरता आणि सुख यांची अनुभूती प्राप्त होईल. म्हणजे शरीरामध्ये कंप निर्माण न होता शरीराचा समतोल साधता आला की ती आसनस्थिती झाली. व्यास भाष्यामध्ये पद्मासन, वीरासन, भद्रासन, स्वतिकासन आणि दंडासन यांचा उल्लेख स्थिरसुखम् आसनम् म्हणून आला आहे. हठयोग प्रदिपिकामध्ये पंधरा आसनांचा उल्लेख आला आहे. सिद्धासन, पद्मासन, वीरासन, भद्रासन, स्वतिकासन, दंडासन, शवासन, धनुरासना, मयुरासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन, गोमुखासन, सिंहासन, कुकुटानासन, कूर्मासन आणि उत्तानकूर्मासन.
शरीरशुद्धीचा विचार हा आसन या योगाच्या तिसऱ्या अंगाचा उद्देश्य आहे.
4. प्राणायाम म्हणजे काय?
प्राण म्हणजे आपला श्वास आणि प्रश्वास धारण करणारी जीवशक्ती. श्वासाचे महत्त्व ही आजच्या काळाची गरज बनली आहे, त्यामुळे त्याबद्दल वेगळे काहीच लिहायला नको. परंतु याच श्वासचे नियमन समजून घेणे आवश्यक आहे. श्वासाची आणि प्रश्वासाची गती, त्यांचा विस्तार, त्यांचे आकुंचन-प्रसारणादी भाव जाणीवपूर्वक समजून घेतले पाहिजेत.
तस्मिन्सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः ॥ २.४९॥
नासिकेद्वारा वातावरणामधील मधला वायू शरीरात घेण्याच्या क्रियेला श्वास म्हणतात. शरीरातीलतील वायू बाहेर टाकण्याच्या क्रियेला प्रश्वास म्हणतात. कोणतेही आसन सिद्ध करताना श्वास आणि प्रश्वास यांची गतीचे नियमन करणे म्हणजे प्राणायाम.
प्राणायामामध्ये श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचे नियमन तीन प्रकाराने केले जाते.
- पूरक क्रियेद्वारा दीर्घ श्वास शरीरामध्ये धारण केला जातो.
- रेचक क्रियेद्वारा श्वास शरीराबाहेर बाहेर सोडला जातो.
- आणि कुंभक क्रियेद्वारा शरीरामध्ये श्वास रोकला जातो.
प्राणायाम ही संपूर्ण क्रिया श्वसनशुद्धीची आहे. यामध्ये पूरक क्रियेने श्वसन संस्था प्रवर्धित केली जाते. रेचक क्रियेच्या सहाय्याने शरीरातील दुषित वायू हे शरीराबाहेर काढण्याचे कार्य होते. कुंभक, नावाप्रमाणेच जसे एखाद्या कुंभामध्ये वायू भरून त्याचे मुख बंद केले तर तो वायू संपूर्ण कुंभात संचारित होतो. त्याचप्रमाणे कुंभक या क्रियेद्वारा शरीरात निर्माण झालेली ऊर्जा सर्वत्र पोहोचवली जाते.
प्राणायाम तर आपण निश्चितच आपल्या रोजच्या जीवनात करताच असतो. पातञ्जल योगसुत्रामध्ये प्राणायाम क्रियेचा उल्लेख येत असला तरी प्राणायामाचे प्रकार हठयोग ग्रंथामध्ये उपलब्ध होतात. या प्राणायामाच्या यादीमध्ये नाडी शोधन, उज्जायी प्राणायाम, शीतली प्राणायाम, सीत्कारी, चंद्रभेदी, सूर्यभेदी, भस्त्रिका, प्लावनी आणि भ्रामरी प्राणायाम यांचा उल्लेख येतो.
5. प्रत्याहार म्हणजे काय?
स्वविषयासंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः ॥२.५४॥
ही अष्टांग योगातील पाचवी पायरी आहे ज्यामध्ये साधक किंवा योगी प्रत्याहारद्वारा इंद्रियशुद्धी साध्य करतो. इंडियाचे चित्तस्वरूपामध्ये विलीन होने यालाच प्रत्याहार असे महर्षी म्हणतात. प्रत्याहार सहाय्याने शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या विषयाची आसक्ती जीवाच्या चित्ताला विचलित करीत नाही. प्रत्याहार हे अंग योगाच्या अंतरंग साधनातील प्रवेशद्वार आहे. इथून पुढे साधक बाह्यशुद्धी कडून अंतरिक शुद्धीच्या दिशेने अग्रेसर होतो.
6. धारणा म्हणजे काय ?
अष्टांग योगाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंग समजून घेण्यसाठी योगसूत्राचे तृतीय पाद म्हणजे विभूति पाद सहाय्यक ठरते. विभूती पादामध्ये धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंगांची लक्षणे, त्यांच्या सिद्धतेचे फलित, विविध स्तरांमधील विनियोग अश्या अनेक संकल्पनांचा गंभीर विचार येतो.
देशबन्धश्चित्तस्य धारणा ॥ ३.१॥
म्हणजे नाभिचाक्र, हृदयपुंडरीक, नासिकाग्र, जिव्हाग्र किंवा शरीराच्या कोणत्याही भागात बाह्य विषय चित्तामध्ये येण्यापासून अवरोध करणे म्हणजे धारणा. थोडक्यात धारणा म्हणजे धारण करणे. काय धारण करणे? तर संयम धारण केल्याने बाह्य-आभ्यंतर सिद्धीसाठी लक्ष्य केंद्रित करण्याला धारणा म्हटले आहे. चित्ताची एकाग्रता शक्तीच्या विकास हा धारणेतून साध्या होतो.
7. ध्यान म्हणजे काय ?
तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ॥ ३.२॥
धारणेचा पुढचा टप्पा म्हणजे ध्यान. ज्या ध्येय वस्तूमध्ये चित्ताची एकाग्रता केली आहे या धारणेमध्ये केवळ ध्येयमात्राची वृत्ती प्रवाहित होने अपेक्षित आहे, त्याला ध्यान म्हणतात. ध्यानाने अंतरिक चेतनेचा विकास होतो होऊन इंद्रिय निग्रह प्रस्थापित होतो. ध्यानाचे अंतिम चरण म्हणजे समाधी.
8. समाधी म्हणजे काय?
समाधी म्हणजे खरंतर अत्यंत व्यापक संकल्पना आहे. ध्यानातूनच समाधी अवस्थेची प्राप्ती आहे.
तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः ॥ ३.३॥
इथे प्रवाह लक्षात घेणे आवश्यक आहे. अष्टांग योगातील पहिला चरण यमाने सुरु होतो, सामाजिक अनुशासनातून सुरु झालेला हा प्रवाह वैयक्तिक शुद्धी, स्थिर शरीर, प्राण नियमन क्रियेतून, प्रत्याहाराकडे म्हणजे आत्मस्वरूपसाक्षात्काराकडे येतो. आणि धारणेद्वारा अंतरिक शक्तीची वृद्धि करून ध्यानाने ध्येयमात्र वृत्ती सध्या करून समाधी अवस्थेला प्राप्त होतो. समाधी म्हणजे जिथे साधकाला किंवा योगीला स्वस्वरूपाचा विसर पडतो. ब्रह्मस्वरूप जाणणेयोग्य साधकाला विवेकख्याती होते. हा अष्टांग योग आहे. त्यामुळे योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे योगाच्या सहाय्याने चित्तवृत्तींचा निरोध करून साधक कैवल्य प्राप्तीस सिद्ध होतो.
या अष्टांग योग साधनेतून उत्तम आरोग्यलाभ हा सर्वांनाच प्राप्त करता येणे सहज शक्य आहे. संस्कृतमधील पुढील पंक्ति त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत –
व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥
म्हणजेच व्यायामाने स्वास्थ्य, दीर्घायुष्य, बल आणि सुखाची प्राप्ती होते. आरोग्य लाभणे हे परम भाग्याचे लक्षण आहे. सर्वार्थाने स्वउन्नतीसाठी स्वास्थ्य हे श्रेयस्कर आहे. त्यामुळे सर्वांसाठी स्वस्थ आरोग्याची कामना करून आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते.
– ज्येष्ठ शु.8 शके 1943, शुक्रवार (18 जून 2021).