आपण सर्वच समूहप्रिय लोक आहोत. पण केवळ समूह म्हणजे समाज नव्हे. एक सातत्यशील आणि सहकारी सामाजिक समूह ज्यांच्यामध्ये कार्य साध्य करण्यासाठी सुसंघटीत असा आकृतिबंध तयार झाला आहे, त्याला समाज म्हणता येईल. या समाजात राहून आपण आपले जीवन अधिक उन्नत करण्याच्या दृष्टीने संस्कृती आपल्याला सामाजिक भान देते. असे सामाजिक भान वैदिक काळातील समाजात निर्माण होत होते, याची साक्ष आपल्याला काही वैशिष्ट्यपूर्ण वैदिक सूक्तांमधून दिसते. अश्या काही वैदिक सूक्तांपैकी एक म्हणजे संज्ञानसूक्त, ज्यामध्ये सुमनत्वाची कामना केली आहे.
हे सुमनत्व म्हणजे, चित्ताला लाभलेले समाधान. समाजातील सर्वांची मने विवेकयुक्त विचारांनी परिपूर्ण असावीत आणि त्यातून सामाजिक स्वास्थ उत्तम राहावे यासाठी या सूक्तामधून कामना केली आहे.
सूक्त म्हणजे काय?
सूक्त या शब्दाची फोड सु+क्त किंवा सु+उक्त अशी होईल. सूक्त या शब्दामध्ये ‘सु’ उपसर्ग आहे. ‘क्त’ किंवा ‘उक्त’ हा शब्द ‘वच्’ या धातूपासून बनलेला आहे. त्यामुळे सूक्त याचा अर्थ सुयोग्य किंवा चांगल्या रीतीने बोललेले असा होतो. बृहद्देवता ग्रंथानुसार ‘संपूर्णं ऋषीवाक्यं तु सूक्तमित्यभिधीयते’ म्हणजे ऋषीवचनांना सूक्त म्हटले आहे.
याच ग्रंथामध्ये सूक्तांचे चार प्रकारही सांगितले आहेत. देवतांच्या स्तुतीपर सुक्तांना देवता सूक्त तर ऋषींच्या स्तुती सूक्तांना ऋषी सूक्त म्हटले आहे. समस्त प्रयोजनांची पूर्ति ज्या सूक्तांमधून अभिव्यक्त होते त्यांना अर्थ सूक्त ही संज्ञा दिली आहे. या सूक्तांचा चौथा प्रकार म्हणजे अशी सूक्त जी एका विशिष्ट छंदांमध्ये बांधलेली आहेत, त्यांना छंद सूक्त म्हटले आहे. सूक्तांचे विविध पद्धतीने प्रकार केले जातात, जसे देवता सूक्त, लोककल्याणकारक सूक्त, आध्यात्मिक सूक्त इत्यादी. यांपैकी संज्ञानसूक्त हे आध्यात्मिक सूक्त म्हटले आहे.
आध्यात्मिक सूक्त म्हणजे काय?
मुळात आध्यात्मिक हा शब्द धार्मिकतेशी आपण चटकन जोडतो, परंतु आध्यात्मिक या शब्दाची फोड अध्य्+आत्म अशी केली जाते. त्यामुळे आत्मिक ज्ञान हा या सूक्तांचा मूळ विषय आहे. ही आध्यात्मिक सूक्त म्हणजे दार्शनिक ज्ञानाने ओतप्रोत भरलेले आहेत. सुक्तांची संख्या कमी असली तरी अर्थगर्भित आशय हा अश्या सूक्तांचा भाव आहे. त्यामुळे संज्ञानसूक्त ही अश्याच प्रकारचे आध्यात्मिक सूक्त आहे जे सुमनत्वाची कामना करणारे आहे.
संज्ञान सूक्ताचे स्वरूप
संज्ञान या शब्दाचा अर्थ म्हणजे सद्भाव, सुसंवाद निर्माण करणे.त्यामुळे या सूक्ताचा आशय ही तसाच आहे. संज्ञानसूक्त हे सांमनस्य सूक्त या नावानेही सुपरिचित आहे. संज्ञानसूक्त हे अथर्ववेदाच्या तिसऱ्या काण्डातील तिसावे सूक्त आहे. अवघ्या सात ऋचांचे हे सूक्त आहे. या सूक्ताचे मन्त्रद्रष्टा ऋषी अथर्वा आहेत. हे सूक्त चंद्रमा किंवा सांमनस्य हीच देवता मानून त्याला समर्पित केले आहे. या सूक्ताचा छन्द अनुष्टप आहे.
संज्ञान सूक्त म्हणजेच सांमनस्य सूक्ताची वैशिष्ट्ये
- संज्ञान सूक्ताच्या आशयामुळे त्याला आध्यात्मिक सूक्ताचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
- काव्यमय भाषेमध्ये सामान्य शिष्टाचार आणि जीवनाच्या मूळ सिद्धांतांचे निरुपण या सूक्तांद्वारा प्रकट केले आहे.
- सर्व लोकांमध्ये आपापसात समभाव राहावा, परस्पर सौहार्द निर्माण व्हावे अशी भावना या सूक्तांमधून मन्त्रद्रष्टे ऋषी व्यक्त करतात.
- माता, पिता, भगिनी, बांधव, पति- पत्नी अश्या सर्वच नात्यांमधील अनुबंध टिकवा आणि या सर्व नात्यांमध्ये विश्वास आणि स्नेह फुलत रहावा अशी कामना केली आहे.
- समाजातील मूळ आधार असणारे सर्व परिवारातील व्यक्ती, संबंधी परस्पर मिळून-मिसळून राहावेत, त्यांच्या वाणीमध्ये माधुर्य राहावे, सर्वांची मने ही निर्मळ आणि एकसमान असावीत आणि एकमेकांच्या प्रती सहानभूती भाव राहावी, ही आशा या सूक्तांमधून व्यक्त केली आहे.
- परस्परांची सेवा आणि सोयी सुविधांची सम प्रमाणात वाटणी असावी, म्हणजेच सर्वांच्या प्रती समान भाव जागृत राहावा.
- ज्याप्रमाणे चक्राचे आरे एकाच बिंदूवर केंद्रित होतात त्याप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने एकसारखी आराधना करून अग्नी देवतेचे सदैव स्मरण करावे.
- सांमनस्य सूक्त म्हणजे सामाजिक एकात्मता आणि सद्भाव उत्पन्न होऊन त्यातूनच सुमनत्वाची कामना या आशयाचा सूक्तपाठ आला आहे.
परस्परांमधील स्नेहभाव हा चित्ताला स्थैर्य आणि सुमनत्व देणारा असतो. त्याने स्वाभाविकच समाजाचे ही हित सध्या करता येणे शक्य आहे. हा दृष्टीकोन वैदिक ऋषींना स्फुरला आणि त्यांना संज्ञान सूक्तासारख्या आध्यात्मिक सूक्ताचे द्रष्टृत्व प्राप्त झाले. आजच्या घडीलाही समाजस्वास्थ्य आणि सांस्कृतिक उत्थान साधण्यासाठी अशी सूक्ते मार्गदर्शक ठरू शकतात.
– ज्येष्ठ कृ.1 शके 1943, शुक्रवार (25 जून 2021).
स्वाध्याय सुधा सुक्त हे खुप छान प्रकारे शब्द बद्ध केल आहे सुक्ता चा अर्थ बोध होतो. स्वाध्याय सुधा हे नाव खुप सर्मपक आहे