भारतीय कला इतिहासात धातु प्रतिमांची एक उज्ज्वल परंपरा कायमच गौरवलेली आहे. यामध्येही विशेष करून चोल यांच्या कांस्य प्रतिमा या विशेष लोकप्रिय झाल्या. चोलांप्रमाणेच पल्लवांच्याही कांस्य किंवा धातु प्रतिमा बघायला मिळतात. कांस्य हा तांबे आणि कथिल या धातूंच्या मिश्रणातून तयार होणारा धातु आहे. त्यामुळे दोनही धातु हाताळताना कलाकाराचे शास्त्रशुद्ध ज्ञान आणि पारंपारिक कौशल्य यांची पराकाष्ठा या प्रतिमांमधून अभिव्यक्त होते. मुळात धातु प्रतिमा निर्मितीचा विचार का झाला असावा असा मागोवा घेतला तर लक्षात येते, की काळाच्या ओघामध्ये देवालयामध्ये काही चल मूर्तींची आवश्यकता भासू लागली आहे. अश्या प्रतिमा या उत्सव पर्वामध्ये उत्सव मूर्ती म्हणून वापरत. चोल शैलीतील कांस्य प्रतिमांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. शिवाय कांस्य प्रतिमांमध्ये शिवाचे विविध विग्रह निर्माण केले आहेत. जसे भिक्षाटन, कल्याणसुंदर, सोमास्कंद अश्या अनेक प्रतिमा आहेत त्यातील नटराज प्रतिमा हा आजचा विषय आहे.
कडलांगुडी, तंजावूर येथील चोल शैलीतील ही नटराजाची कांस्य प्रतिमा आहे. एका पद्मपीठावर अपस्मार पुरुष असून त्यावर नटराज नर्तन करीत आहे. भुजंगत्रसित पदन्यासात शिव पञ्चक्रिया करीत आहे. या नटराज प्रतिमेमध्ये त्याच्या भोवती असलेले अग्निचे तेजोवलय नाही. शिवाच्या मस्तकावर केवल शीर्षपट्ट असून मोकळ्या सोडलेल्या जटा या नृत्याच्या लयीनुसार रुळत आहेत. चतुर्भुज नटराजाच्या हातामध्ये अभय मुद्रा, डमरू, अग्नी आणि करीहस्त मुद्रा आहे. चर्येवर प्रसन्न आणि समतोल भाव आहे. गळ्यात ग्रेवेयक नसून सर्प आहे. तसाच अभय हस्तावरही सर्प आहे. उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर तर हातांमध्ये कंकण आहे, बोटांमध्ये अंगुलिका आहेत. कटीला वस्त्र आहे. पायामध्ये पादवलय आहे. पार्श्वदर्शनी या प्रतिमेमध्ये अतिशय सुंदर अश्या शिवाच्या मुक्तजटा दिसतात.
कलेमध्ये माध्यम हे महत्वाचे असल्याने पाषाणातून धातु या माध्यमामध्ये येताना अधिक सुबकता, सुडौलपणा कलाकारांना अचूक साधता आली आहे, हे या प्रतीमांवरून दिसते.
छायाचित्र – © AIIS Photo Archive
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल द्वादशी शके १९४४.)