स्वस्तिकापसृतः पादः करौ नाभिकटिस्थितौ|
पार्श्वनुद्वाहितं चैव करणं तत्कटीसमम् ||
स्वस्तिक करणाचे संपादन केल्यानंतर पायांना विलग केले जावे. एक हात नाभि जवळ तर दुसरा कटिवर स्थित असेल तसेच पार्श्व भाग उद्वाहित मुद्रेत असल्यास त्याला कटीसम करण म्हणतात.
वेरूळ येथील लेणीसमूहांपैकी, रामेश्वर लेणीमध्ये दक्षिणेकडील दालनात, भिंतीवर पश्चिमाभिमुख अशी कटीसमम् नृत्यमग्न नटराज प्रतिमा आढळते. अत्यंत देखणी अशी ही प्रतिमा आहे. सात्विक सौम्य चर्या असलेला त्रिनेत्रधारी शिव नर्तनात तल्लीन झाला आहे, असा भाव आहे. षड्भुज नटराजाचा उजवा हात नाभिजवळ आहे परंतु भग्न पावल्याने हस्त मुद्रा दिसत नाही. दुसरा उजवा हात ही भग्न आहे, परंतु हात लताहस्तामध्ये दिसतो. या हातावरून तलम वस्त्राचे उत्तरीय रुळताना शिल्पित केले आहे. उजव्या मागच्या हातामध्ये डमरू आहे. डाव्या हातांपैकी पुढचा डावा हात हा गुडघ्यावर ठेवला आहे. पदन्यासाचा विचार केला तर उजवा पाय गुडघ्यातून किंचित वाकवला आहे, तर डावा पाय किंचित उचलेला आहे. या शिल्पामध्ये नृत्यरत शिवाचे मस्तक हे जटांच्या वेष्टनाने सुशोभीत केले आहे. हा जटामुकुट रत्नपट्टाने बांधला आहे, तर काही जटा शिवाच्या खांद्यावर रुळताना दिसत आहेत. गळ्यात सुंदर असे ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. उदरबंद आहे, कमरेला सुंदर असा मेखला आहे, कटीवस्त्र म्हणून व्याघ्रचर्म आहे. हातामध्ये कंकण, आणि दंडामध्ये केयूर आहे. पायापर्येंत रुळणारी माळा आहे.
शिवाच्या या दिव्य नर्तनाचा सोहळा पाहण्यासाठी अनेक देवी-देवता, गण- गन्धर्व, दिक्पाल जमलेले आहेत. शिवाच्या उजव्या बाजूला खाली मृदुंगासारखे तालवाद्य आणि बासरी सारखी सुशीर वाजवणारा वाद्यवृंद आहे. त्यांच्या वर गणेश आहे. नृत्यरत शिवाच्या डाव्या पायांत अस्थीपंजर भृंगी दिसतो आहे. नटराजाच्या डाव्या पायाशी तंतुवाद्य वाजवणारी एक स्त्री बसलेली आहे. तिच्या मागे पार्वती स्कंदाला तिच्या कडेवर घेऊन उभी आहे. त्यांच्या मागे शैव द्वारपाल उभा आहे. आकाशामध्ये हंसारूढ ब्रह्मदेव, गरुडारूढ विष्णू, इंद्र आणि यम या नर्तन सोहळ्यास उपस्थित झाले आहेत.
या संपूर्ण शिल्पपटाकडे पाहताना हळूहळू या तालवाद्य, तंतुवाद्य आणि सुशीरवाद्यातून नाद उमटू लागतात आणि नृत्यमग्न नटराजाच्या या कटीसमम् नृत्यात आपणही काही क्षण तल्लीन होतो.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- वेरूळ
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल नवमी शके १९४४.)