नटराज शिल्पांमधील एक विलक्षण सुंदर आणि दक्षिणात्य शैलीत लोकप्रिय झालेले म्हणता येईल असे एक करण म्हणजे कुञ्चित करण. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात याची दोन शिल्पे आहेत, याशिवाय पट्टदकल येथेही मला कुञ्चित करण असलेले नटराज शिल्प बघता आले. कैलासनाथ मंदिरामधील दोन्ही शिल्पे उत्कृष्ट आहेत परंतु पट्टदकल येथील शिल्पाची झीज झालेली आहे. तरीही पट्टदकल येथील कुञ्चित करण करणारा नटराज आपल्याला समजू शकतो.
इ.स. 7-8 शतकांत पल्लव राजा नरसिंहवर्मन द्वितीय (राजसिंह) आणि त्याचा पुत्र महेन्द्रवर्मन तृतीय यांनी बांधलेले शिवालय म्हणजे कांचीपुरम् येथील कैलासनाथ. या मंदिरामध्ये शिवाची विविध नर्तन शिल्पे आहेत. प्रस्तुत प्रतिमेमध्ये (प्रतिमा क्र.1) एका पीठावर नटराज नर्तन करीत आहे. यामध्ये डाव्या पायाचा गुडघा पीठावर स्थिरावला असून पाय उचलेल्या स्थितीत आहे तर उजवा पाय पिठावर ठेवलेला आहे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये या स्थितीला कुञ्चित करण म्हटले आहे.
आद्यः पादो नतः कार्यः सव्यहस्तश्च कुञ्चित |
उत्तानो वामपार्श्वस्थस्तत्कुञ्चितमुदाहृतम् |
डावा पाय खाली झुकलेला असावा आणि डावा हात झुकलेल्या अवस्थेत उजव्या पार्श्वाजवळ ठेवावा, त्याचा हात वर उचलेला असावा, त्याला कुञ्चित करण म्हणतात.
देवकोष्टामध्ये ही द्वादशभुज नटराज प्रतिमा आहे. देवकोष्टाच्या उजव्या बाजूला वाद्यवृंद आहे. तर डाव्या बाजूला पार्वती, तिच्या सखी आणि नंदी हा दिव्य सोहळा अनुभवत आहेत. नटराज शिल्पाच्या खालील भागांत शिवाप्रमाणे नृत्य करणाऱ्या गणांचे शिल्प आहे.
एका पीठावर नटराजाचा उजवा पाय टेकवलेला असून डावा गुडघा या पीठावर टेकवलेला आहे. डावा पाय मागे उचललेला आहे. द्वादशभुज शिवाच्या हातामध्ये करीहस्त, सिंहकर्ण, अर्धचंद्र या मुद्रा असून डमरू, पाश, त्रिशूल, परशु, सर्प अशी विविध आयुधे आहेत. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आहेत. नटराजाच्या डोक्यावर उंच जटामुकुट आहे. कानात गोल कुंडले आहेत. खांद्यावर कोरीव यज्ञोपवीत आहे. दंडात केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपर दाखवले आहेत.
कैलासनाथ मंदिरामधील दुसरी प्रतिमा (प्रतिमा क्र. 2) कुञ्चित करण नटराज प्रतिमा ही दशभुज असून हातामध्ये करीहस्त, सिंहकर्ण, अर्धचंद्र, अलपल्लव या मुद्रा असून डमरू, परशु, ही आयुधे आहेत. इथे परशु उलटा पकडलेला आहे, नृत्याचा लयीमध्ये स्वाभाविक हलणारी आयुधे शिल्पकाराने अचूक टिपलेली आहेत. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आहेत. नटराजाच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. कानात कुंडले आहेत. खांद्यावर कोरीव मणीयज्ञोपवीत आहे. दंडात केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. इथे वस्त्राचा सोगा डाव्या पायाजवळ पडलेला दाखवला आहे. पायामध्ये नुपर दाखवले आहेत.
आणि तिसरी कुञ्चित करण नटराज प्रतिमा (प्रतिमा क्र.3) ही पट्टदकल येथील आहे. इथेही एका पीठावर उजवा पाय टेकवलेला असून डावा गुडघा या पीठावर टेकवलेला आहे. डावा पाय मागे उचललेला आहे. अतिशय झीज झाल्याने आयुधे किंवा शिल्पामधील बारकावे टिपणे कठीण असले तरी हे शिल्प पूर्ण असताना निश्चितच त्यातील सौंदर्य कसे असेल याची कल्पना पाहताना येते. आयुधांपैकी केवळ त्रिशूल, नंदीध्वज आणि सर्प दिसतायेत. डोक्यावर सुंदर असा जटामुकुट. गळ्यात ग्रेवेयक, डाव्या खाद्यावरून रुळणारे यज्ञोपवित आहे. हातांमध्ये कंकण आणि दंडाला व्यालयुक्त केयूर आहे.
एकूणच कुञ्चित जानु आणि त्यातून साधलेला कुञ्चित करण यांच्या प्रयोगाने शरीराचा साधलेला डौल नटराजाच्या या शिल्पांमधून अभिव्यक्त होत आहे.
छायाचित्र – प्रतिमा क्र. 1 व 2 – साभार अंतरजाल | प्रतिमा क्र. 3 – © धनलक्ष्मी म. टिळे
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल सप्तमी शके १९४४.)