निकुट्टितौ यदा हस्तौ स्वबाहुशिराशोsन्तरे|
पादौ निकुट्टितौ चैव ज्ञेयं तत्तु निकुट्टकम् ||
भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये निकुट्टन करणाचे लक्षण सांगितले आहे. जेव्हा दोन्ही हात हे बाहू आणि मस्तक यांच्यामध्ये निकुट्टित पद्धतीने संचालित केले जातात आणि त्याच वेळी पाय निकुट्टित होतो त्याला निकुट्टकम् म्हणतात. अभिनवगुप्तपादाचार्य, निकुट्टन याची परिभाषा करताना कोहीलकृत परिभाषेचा आधार घेतात आणि सांगतात, ‘उन्नमनं विनमनं स्यादङ्गस्य निकुट्टनम्’| म्हणजेच निकुट्टनचा अर्थ ऊर्ध्व आणि अधः संचलन. आचार्य अभिनवगुप्त यांच्या मते एका पायाद्वारा निकुट्टकम् प्रकट केले जाते.
वेरूळ लेणी समूहांपैकी रावण की खाई या लेणीमध्ये दक्षिणेकडील मंडपामधील तिसऱ्या शिल्पपटात नटराज स्वरूप शिव नृत्य करताना शिल्पित केला आहे. त्रिभंग अवस्थेमधील अष्टभुज नटराज इथे बघायला मिळतो. उजवा पुढचा हात करीहस्त मुद्रेत आहे, त्याचा मागचा हात भग्नावस्थेत आहे, उर्वरित हातांमध्ये अंकुश आणि डमरू आहे. तर डाव्या वरच्या हातामध्ये अग्नी, अलपल्लव हस्त, डोलाहस्त, पातक मुद्रा आणि कटकमुख मुद्रा इत्यादी नृत्यहस्त आहेत. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. कानात कुंडले आहेत, हातामध्ये कंकण असून, दण्ड हे त्रिवलय असलेल्या केयुरांनी सुशोभित केले आहेत. कटीला एक सर्प गुंडाळलेला आहे. व्याघ्रचर्माचे कटीवस्त्र असून शिवाच्या जंघेवर वाघाचे मुखही शिल्पित केले आहे. इथे मध्यभागी शिव एका उंच पीठावर निकुट्टकम् करणाप्रमाणे त्याचा उजवा पाय किंचित उचललेला शिल्पित केला आहे. नटराजाच्या उजव्या पायाशी वाद्यवृंद असून यामध्ये मृदुंग, बासरी आणि झांज वाजवताना काही गण दाखवले आहेत. शिवाच्या उजव्या पायाशी हाडांचा सापळा झालेला भृंगी ही दाखवलेला आहे. डावीकडे पार्वती असून शिल्पपटाच्या वरच्या बाजूला अन्य देवता, ऋषी, दिक्पाल आणि आकाशगामी गन्धर्व हे हा दिव्य नर्तन सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित झाले आहेत.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल पौर्णिमा शके १९४४.)