कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम इथली ही नटराजाची प्रतिमा आहे. यामध्ये आक्राळ अश्या अपस्मार पुरुषावर शिव नृत्य करतो आहे. त्याचा उजवा पाय हा अपस्माराला दाबतो आहे तर दुसरा ऊर्ध्वजानु करणामध्ये वर उचललेला आहे. या शिल्पामध्ये शिवाची चर्या काहीशी भयानक झाली असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. या शिल्पामध्ये नटराज चतुर्भुज आहे. त्याच्या हातामध्ये त्रिशूल, पाश, अलपल्लव मुद्रा आणि सूची मुद्रा आहे. त्याच्या डाव्या पायाशी फणा काढलेला भुजंग आहे. नटराजाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. कानात गोल कुंडले आहेत. खांद्यावर कोरीव यज्ञोपवीत आहे. दंडात त्रिवलय केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपर दाखवले आहेत. त्रिनेत्र नटराजाचे डोळे गोल व मोठे आणि दात बाहेर आलेले दाखवून यातील उग्र भाव सहज प्रदर्शित होत आहे. या नटराजाने त्याचा उजवा पाय या जाडजूड, बेढब मूलयकावर ठेवला आहे. शिवाची सूची मुद्रा ही अपस्मार पुरुषासाठी चेतावनी देणारी आहे. या अपस्मार पुरुषाच्या चेहऱ्यावर त्याची हतबलता स्पष्ट दिसत आहे. शांत चित्ताने या शिल्पाकडे पहिले तर, शिवाच्या नृत्यावस्थेतील संवेग, शिल्पातून अभिव्यक्त होणारे भाव एखाद्या कथेप्रमाणे आपल्या मनात झिरपत जातात.
छायाचित्र – साभार अंतरजाल
(पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष द्वितीय शके १९४४.)