खरं तर मी इतिहासाशी शाळेत असतानाच कट्टी घेतली होती. आणि शक्यतो परत कधी आम्ही दोघं (म्हणजे मी आणि इतिहास हा विषय) जवळ येणार नाही याचे अनेक प्रयत्न केले. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. शाळेनंतर थेट लग्न झाल्यावर मी पुन्हा M.A पदविका अभ्यासक्रम शिकायला सुरु करेन असं वाटलं नव्हतं. त्याहूनही जे नवल होतं ते म्हणजे माझ्या M.A साठी मी भारतीयविद्या हा अभ्यासक्रम निवडून नुसती इतिहासातच नाही तर चक्क प्राचीन काळात जाऊन पोहचले. पण काळाच्या ओघात लक्षात आलं की ती शाळेत घेतलेली कट्टी व्यर्थ होती. आपला भूतकाळ आपल्याला प्रगल्भ करतो हे समजलं आणि त्या निमित्ताने इतिहासाकडे बघण्याची चिकित्सक नजरही तयार झाली.
माणसाला पूर्वापार त्याच्या भूतकाळाविषयी जाऊन घेण्याची उत्सुकता राहिली आहे. इतिहास, म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा घेणे. इतिहासाचा अभ्यास करताना मागे उरलेल्या खुणा, पुरावे, कागदपत्र यांच्या पद्धतशीर संशोधनाने पूर्वी घडलेल्या घटनांचे तर्क लावले जातात. आता पूर्वी घडलेल्या किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांचा आत्ता वर्तमानात किंवा भविष्यात तरी त्याचा काय उपयोग, असा प्रश्न स्वाभाविक पडतो. परंतु इतिहास अभ्यासणे, तो जतन करणे आणि भावी पिढीच्या स्वाधीन करणे आवश्यक का आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
इतिहास या शब्दाची फोड इति + ह् + आस याचा अर्थ होतो ‘असे झाले‘. इतिहास हा केवळ कोणत्याही राजकीय किंवा मोठ्या घटनांचा आढावा असतो असे नाही. तर तो त्या काळात घडलेल्या सर्वच लहान-मोठ्या गोष्टीचा ठेवा असतो. भूतकाळात घडलेल्या माणसाच्या जीवनातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अश्या सर्वच बाबींचा मिळून इतिहास बनतो. यात गाथा ही असतात आणि कथा ही असतात. इतिहास अभ्यासक त्यांना आवश्यक असलेल्या अभ्यासातून मिळणाऱ्या परिणामांवर प्रादेशिक किंवा सांस्कृतिक मर्यादा आखून घेतात. यातून इतिहास अभ्यासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दिसून येतात. इतिहास केवळ माणसांचाच असतो असे नाही तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला इतिहास अश्या अनेक वेगवेगळ्या विषयात वर्गवारी होऊ शकते. जसे की मी सध्या प्राचीन भारतीय इतिहास या विषयाचा अभ्यास करीत आहे. मग त्या अनुषंगाने मला प्राचीन भारतीय इतिहासाचाचे वेगवेगळे पैलू अभ्यासणे गरजेचे आहे. जसे की, प्राचीन भारतीय समाज आणि त्याची संरचना, संस्कृती, राजकीय इतिहास, कला-स्थापत्य, वाड़्मय इ.
आपली वर्तमान स्थिती ही आपल्या भूतकाळावर अवलंबून असते, ज्याचे पडसाद अनेक वर्ष भविष्यातही दिसू शकतात. त्यामुळे इतिहास अभ्यासणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.
इतिहास आपल्याला काय देतो
- संस्कृती
इतिहास आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देतो. पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीशी नातं जोडायला मदद करतो. ही संस्कृती आपल्याला आचार-विचार-सभ्यता देते, कला, साहित्य, स्थापत्य देते.
- स्वतःची ओळख
इतिहास आपल्याला वर्तमानात जगत असताना संस्कृती देतो. आपल्याला इतिहासामुळे स्वतःची पुन्हा एकदा नव्याने ओळख होते. पूर्वी घडलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपण या ना त्या मार्गाने जोडले जातो. आपले जीवन त्यानुसार मार्गस्थ करून पुन्हा एकदा नवीन इतिहास भावी पिढीला देण्यासाठी सज्ज होतो.
- प्रेरणा
इतिहास म्हणजे गाथा. इतिहास म्हणजे कथा. आपल्या भूतकाळातील अनेक विजयाचे प्रसंग मग तो युद्धातील असो वा मानवाने इतर शक्तींवर, निसर्गावर किंवा अन्य गोष्टींवर मिळवलेला विजय असो, आपल्याला पुन्हा वाचताना तो नक्कीच प्रेरणा देऊन जातो. आपल्या इतिहासाविषयी डोळ्यात अभिमान ठेऊन जातो.
- बदल समजून घेण्याची पात्रता
सध्या आपण जगत असेलला वर्तमान हा पूर्णपणे भूतकाळातील घटनांचा एक भाग असतो. पण इतिहास आपल्याला मागे घडलेल्या गोष्टींशी एकरूप करून देतो. हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आजही पुसटश्या का होईना आपल्यासोबत आपण घेऊन पुढे जात असतो. या लोटलेल्या काळातील झालेले बदल समजून घेण्यासाठी इतिहास मदत करतो.
- समाजाविषयी आस्था
इतिहास जेव्हा आपल्याला संस्कृती देतो, स्वतःची पुन्हा नव्यानी ओळख करून देतो, कधी अभिमानाने भारावून टाकतो तर घडलेल्या घटनांविषयी जाणीव निर्माण करतो. यातूनच आपला समाज, त्याविषयीची आपली कर्तव्य, आस्था जागृत होण्यास मदत होते.
2 thoughts on “असाही एक इतिहास”