स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

Home \ बोधसूत्र \ स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेचा आरंभ श्रीगणेशाच्या स्तवनाने होतो. या मंगलाचरणामध्ये माउली एक एक ओवीमधून शब्दब्रह्म गणेशाचे अव्यक्त स्वरूप व्यक्त करीत जातात. जसे हे शब्द आकार घेतात, तशी श्रीगणेश प्रतिमा आपल्या मनःपटलावर साकार होत जाते.

श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व सूत्राच्या पूर्वार्धामध्ये या वेदाधिष्टीत श्रीगणेशाचे मूर्तरूप, त्याच्या देहावर सजलेले पुराणोक्त काव्य, नाट्यादिकांचे वस्त्रालंकार आपण बघितले. आज या उत्तरार्धात श्रीगणेशाच्या तत्त्वरूपाचा अविष्कार श्रीज्ञानेश्वर माउलींच्या ओवींमधून अनुभवणार आहोत.

उत्तरार्ध सुरु करण्यापूर्वी पूर्वार्धही इथे जोडत आहे.

षड्भुजा, आयुधे आणि षड्दर्शने

देखा षड्दर्शने म्हणिपती तेचि भुजांची आकृती ।।
म्हणऊनि विसंवादें धरिती आयुधे हातीं ।। 10 ।।

प्रतिमाशास्त्राच्यादृष्टीने हे वर्णन आपला दृष्टीकोन अधिक समृद्ध करणारे आहे, असे मला वाटते. या षड्भुज गणेशाच्या हातामध्ये निरनिराळी आयुधे श्रीज्ञानेश्वरांनी वर्णिली आहेत.

गणेशाच्या सहा भुजा आणि त्यामध्ये धारण केलेली सहा आयुधे यांचा गूढार्थ, जो माउलींना इथे अभिप्रेत आहे, त्यांचा तत्त्वबोध आपल्याला या ओवींमधून उलगडत जातो.

देखा षड्दर्शने म्हणिपती तेचि भुजांची आकृती ।। गणेशाच्या सहा भुजा म्हणजे षड्दर्शने. इ.स. चौदाव्या शतकाच्या मध्यात कर्नाटकातील विजयनगर साम्राज्याचे मंत्री होते वेदभाष्यकार सायणाचार्य त्यांचे सुपुत्र श्रीमान् माधवाचार्यांच्या ‘सर्वदर्शन संग्रह’ या ग्रंथामध्ये एकूण सोळा दर्शनांचे विवेचन आले आहे. परंतु त्यातील महत्त्वाच्या अश्या एकूण नऊ दर्शनाचा अंतर्भाव, दर्शनशास्त्रांमध्ये प्रामुख्याने केला जातो. या नऊ दर्शनांपैकी सहा दर्शने ही वैदिक आहेत, तर उरलेली तीन दर्शने ही अवैदिक मानली आहेत. त्यामुळे ही सहा दर्शने वेदप्रामाण्य मानणारी असल्याने, त्यांना आस्तिक दर्शने म्हटले आहे.

माउलींच्या निरुपणात वेदानुकुल अश्या गणेशाच्या स्वरूपाचे वर्णन आले आहे. त्यामुळे इथेही वेदप्रामाण्य मानणारी वैदिक षड्दर्शने ही या श्रीगणेशाच्या सहा भुजा झाल्या आहेत.   

तरी तर्कु तोचि फरशु नीतिभेदु अंकुशु
वेदान्तु तो महारसु मोदकु मिरवे ।। 11 ।।

तरी तर्क तोचि फरशु परशु हे आयुध धारणा केलेला गणेशाचा हात, म्हणजे तर्करुपी न्यायदर्शन. महर्षी गौतम हे न्याय दर्शनाचे सूत्रकार आहेत. न्याय दर्शनाचे स्वरूप हे तर्कप्रधान आहे. 

प्रमाणैरर्थपरिक्षणं न्यायः ।। वात्सायन न्यायभाष्य 1.1.1 

वात्सायन यांच्या न्यायभाष्यामध्ये न्याय दर्शनाचे स्वरूप त्यांनी प्रतिपादित केले आहे. न्याय म्हणजे विविध प्रमाणांच्या सहाय्याने वस्तूच्या तत्त्वाचे परीक्षण करणे.

आता या तर्कनिष्ठ दर्शनाचा आणि परशु या आयुधाचा संबंध जाणणे इथे आवश्यक आहे. परशु या आयुधाचा वापर छेदन क्रियेसाठी केला जातो. इथे हाच तत्त्वरूप भाव आला आहे. न्याय शास्त्रामध्ये तत्त्वांच्या म्हणजे पदार्थांच्या यथार्थ ज्ञानासाठी उत्पन्न होणाऱ्या संशयाचे खंडन करणारे हे शास्त्र आहे.    

नीतिभेदु अंकुशु इथे गणेशाच्या अंकुश या आयुधाचे आकलन करून घेता येते. गणेशाचा हा हात नीतिभेदरुपी वैशेषिक दर्शनशास्त्राचा आहे. महर्षी कणाद प्रणीत वैशेषिक दर्शनाची सुरुवातच अथातो धर्मं व्याख्यासामः।। या सूत्राने होते. वैशेषिक दर्शनामधील धर्म म्हणजे नीतिभेद जाणणारे शास्त्र म्हटले आहे. इथे धर्माची व्याख्या आजकाल जी ढोबळमानाने केली जाते ती अपेक्षित नाही.  

यतोऽभ्युदयनिश्रेयससिद्धिः स धर्म।। याचा अर्थ असा की इथे अभ्युदय सोबत निःश्रेयस प्राप्तीचा मार्ग दाखवणारा धर्म जाणण्याची जिज्ञासा केली आहे. अभ्युदय म्हणजे मनुष्य जीवनातील उत्कर्ष परंतु मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये केवळ उत्कर्ष सध्या करायचा नाहीये, तर हा उत्कर्ष चांगल्या मार्गाने सध्या केला तर निःश्रेयस म्हणजेच मोक्ष प्राप्ती होते. 

अंकुश हे आयुध आपल्याला हत्तीच्या माहुताकडे दिसते. हत्तीच्या मस्तवालपणाला अंकुशाच्या टोकाने ताब्यात ठेवणे शक्य आहे. त्याचप्रमाणे हा वैशेषिक दर्शनरूपी अंकुश गणेशाकडे आहे. हा अंकुश स्वैर चित्तवृत्तींवर अंकुश ठेवून अभ्युदय आणि निःश्रेयस प्राप्तीमधील महत्त्वाचा घटक ठरतो. 

वेदांतु तो महारसु मोदकाचा ।। वेदान्त दर्शन म्हणजे साक्षात ब्रह्मज्ञानाच्या सुधेचा मधुर मोदक अशी उपमा श्रीज्ञानेश्वर माउली इथे देतात. वेदान्त दर्शनाचे मूळ उपनिषदांना मानले आहे, त्यामुळे या दर्शनचा प्रतिपाद्य विषय हा ब्रह्मविद्या असल्याने या विषयाचे ज्ञान हे मोक्षप्रदच मानले आहे. 

एके हातीं दंतु जो स्वभावता खंडितु
तो बौद्धमतसंकेतु वार्तिकांचा ।। 12 ।।

ही ओवी समजून घेताना मात्र असंख्य प्रश्नांची गर्दी झाली खरी, पण अधिकाधिक संयुक्तिक उत्तरासाठी इथे काही गोष्टी अधिक समजून घेणे आवश्यक ठरले. या ओवीमध्ये बौद्धमत संकेतु या पदाने बौद्धमताचा विचार आला आहे, असे प्रथम दर्शनी वाटले. पण उपरोक्त ओवींमध्ये जर पहिले तर श्री ज्ञानेश्वरांनी षड्दर्शनांना गणेशाचे बाहू म्हणून स्वीकार केला आहे. ही षड्दर्शने वेदप्रामाण्य मानणारी आहे. वर सांगितल्याप्रमाणे बौद्धमत हे वेदप्रामाण्य मानीत नाहीत, तर इथे या ओवीतून नेमका अर्थ कसा घ्यावा, हा प्रश्न उद्भवतो.

गुढार्थदीपिका याला सार्थ उत्तर देते. कुमारील भट्ट यांनी पूर्वमीमांसेवर तंत्रवार्तिक आणि श्लोकवार्तिक अशी दोन वार्तिके लिहिली आहेत. या वार्तिकात आत्मा कर्ताभोक्ता आहे असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे बौद्धमताच्या क्षणिकवाद, अनात्मा, विज्ञानवाद आणि शून्यत्ववाद यांचे खंडन झाले आहे. त्यामुळे स्वभावतः खंडित असलेला दंत, धारणा करणारा गणेशाचा हात हा या षड्दर्शांतील पूर्वमीमांसा असावा.

ज्ञानेश्वरीच्या संशोधित ग्रंथामध्ये हा खंडित दंत म्हणजे बौद्धमत स्वीकारून तो दंत धारण करणारा हात म्हणजे महर्षी पतञ्जली यांचे योगदर्शन मानला आहे.  

मग सहजें सत्कारवादु तो पद्मकरु वरदु
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु ।। 13 ।।

मग सहजे सत्कारवादु मग येतो तो सत्कार्यवाद किंवा सत्कारवाद. सांख्य दर्शन म्हणजे भारतीय दर्शन परंपरेतील प्राचीन आणि महत्त्वपूर्ण असे दर्शन आहे. महर्षी कपिल हे या दर्शनाचे प्रणेते. सांख्यदर्शनातील पायाभूत सिद्धांत म्हणजे सत्कार्यवाद.

‘कार्य’ तसेच ‘कारण’ या दोघांचे अस्तित्व ‘सत्’ मानले आहे. या सत्कार्यवादाची सांगड श्रीज्ञानेश्वरांनी श्रीगणेशाच्या वरदहस्ताशी घातली आहे. मूर्तिशास्त्रामध्ये हस्तमुद्रांचेही एक विशेष महत्त्व आहे. त्यापैकी एक हस्तमुद्रा इथे पाहता येते, ती म्हणजे वरद मुद्रा. 

अधःस्थितो दक्षहस्तः प्रसृतो वरमुद्रिका ।।

वरद मुद्रा म्हणजे हाताचा पंजा बाहेरच्या दिशेला असून, बोटे अधम म्हणजे खालच्या दिशेला असतात. वरद मुद्रा म्हणजे देवांचा अनुग्रह किंवा त्यांची अनुकंपा दाखवण्याच्या क्रिया या अर्थाने शिल्पांमधून अभिव्यक्त होत असतो. 

इथे श्रीगणेशाचा वरद मुद्रेतील हात हा सांख्यदर्शनचा आहे. याचा अर्थ सत्कार्यवाद आणि त्या अनुषंगाने सांख्यदर्शन, हे सर्वांसाठी त्रिविध तापांतून मुक्ती आणि त्यातून विवेक निर्माण करणारा मार्ग प्रशस्त करणारे असल्याने हा हस्त वरदान देणारा असा आहे.

धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु अभयहस्तु ।। अभय हस्ताच्या रूपात महर्षी पतञ्जली यांचे योगशास्त्राचे तत्त्व श्रीज्ञानेश्वरांनी मांडले आहे. योगदर्शन आणि सांख्यदर्शन ही दोनही दर्शने सोबत चालणारी अशीच आहेत.

महर्षी पतञ्जली यांच्या योगसूत्रांमधून जीवनमुक्तीच्या मार्ग प्रतिपादित केला आहे. योगश्चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे योगसहाय्याने चित्तवृत्तिंचा निरोध करून विवेकख्याती प्राप्त करण्याचा दृढ असा मार्ग पातञ्जल सूत्रे सांगतात. योगदर्शन हे अधिक क्रियात्मक असल्याने समग्र जीवनाचे दर्शन आहे. त्यामुळे  श्रीगणेशाच्या प्रतिमेतील एक हस्त मानव प्रजातीसाठी हा योगशास्त्ररूपी अभयदान देणारा आहे.     

देखा विवेकवंतु सुविमळु तोचि शुंडादंडु सरळु
जेथ परमानंदु केवळु महासुखाचा ।। 14 ।।

देखा विवेकवंतु सुविमळु तोचि शुंडादंडु सरळु या ओवीमध्ये गणेशाच्या सोंडेवर आत्मानात्म-विवेक तत्त्वाचे रोपण करून परमानंदाचा मार्ग सांगितला आहे. आत्मानात्म-विवेक म्हणजे आत्मा नित्य आहे आणि शरीर अनित्य आहे, हा विवेक म्हणजेच ज्ञान जागृत करणारी ही सरळ सोंड आहे, असे म्हटले आहे.

गणेशाची ही सरळ सोंड म्हणजे विवेकी जनांसाठी ब्रह्मसुखाचा परमानंद देणारी आहे. विवेकाने प्राप्त होणारा साम्यभाव हा महासुखाचा कारक असतो.

तरी संवादु तोचि दशनु ।। जो समताशुभ्रवर्णु
देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु विघ्नराजु ।। 15 ।।

तरी संवादु तोचि दशनु ।। जो समताशुभ्रवर्णु श्रीगणेशाचा शुभ्र एकदंत म्हणजे सर्व दर्शनांच्या सिद्धान्तांमधील संवाद आहे. संवाद म्हणजे या षड्दर्शनांच्या प्रमेयामध्ये सुरु असलेली देवाण-घेवाण आहे, मतांचे आदान-प्रदान आहे. या षड्दर्शनातील एकवाक्यता इथे श्रीज्ञानेश्वर सांगत आहेत. हा विघ्नराज गणेश म्हणजे अद्वैतज्ञानरुपी सूक्ष्म ईक्षण म्हणजे दृष्टी असलेला देव आहे. 

अवयवस्थान आणि तत्त्व

मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानीं
बोधमदामृत मुनी अलि सेविती ।। 16 ।।

माउलींनी गणेशाच्या श्रवणस्थानाला म्हणजे कानांवर मीमांसा तत्त्वाचे रोपण केले आहे. यामध्ये पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी ही दोन श्रवणस्थाने म्हटले आहे. आता या दोन मीमांसा, श्रवणस्थानी मानण्याचे प्रयोजन काय, हे समजून घेण्यासाठी पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा यांचे स्वरूप समजून घ्यावे लागेल.

मीमांसा हे षड्दर्शनांचा भाग आहे, हे वर सांगितलेच आहे. त्यामुळे वेदप्रामाण्य या दर्शनांचा गाभा आहे. वेदाचे दोन प्रतिपाद्य विषय आहेत एक कर्मकांड आणि दुसरे ज्ञानकांड. यातील कर्मकांड या विषयामध्ये यज्ञयाग, अनुष्ठान आदि येतात. ज्ञानकांडामध्ये जीव, जगत्, ईश्वर, ईश्वराचे स्वरूप, त्याचा परस्पर संबंध यांचे निरुपण येते.

इथे मीमांसा दोन आहे एक कर्ममीमांसा ज्याला पूर्वमीमांसा म्हणतात आणि दुसरी ज्ञानमीमांसा ज्याला उत्तरमीमांसा म्हणतात. मीमांसा याचा अर्थ होतो जाणण्याची इच्छा. कोणतेही तत्त्व जाणण्याची इच्छा असेल, तर उहापोहपूर्वक विचार करणे आवश्यक असते.

मीमांसा दर्शनामध्ये मग ते पूर्वमीमांसा असो किंवा उत्तरमीमांसा दोन्हीचे विषय वेगळे असले तरी दोन्हीच्या प्रक्रियांमध्ये तत्त्व जाणण्याची क्रिया असल्याने श्रवणेंद्रिये ही त्यादृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे ही दोन दर्शने श्रीगणेशाचे दोन कान असे म्हटले आहे.

बोधमदामृत मुनी अलि सेविती ।। या गणेशाच्या कानाशी मुनिरूपी भ्रमर सदैव भ्रमण करून पूर्वमीमांसेतून मिळणारे कर्मज्ञान आणि उत्तरमीमांसेतील ब्रह्मज्ञानाच्या बोधामृताचा मकरंद सेवन करीत असतात. 

प्रमेयप्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेचि निकुंभ
सरिसे एकवटत इभ मस्तकावरी ।। 17।।

या ओवीमध्ये दोन भिन्न मतांची तुलना करून त्यांच्यामधील एकवाक्यता प्रतिपादित केली आहे. हत्तीच्या मस्तकावर दोन उंचावटे असतात त्यांना गंडस्थळ असे म्हणतात. गणेशाचे गजमुख आहे त्यामुळे त्याच्या मस्तकावर दोन समान उंचीचे उंचवटे आहेत. त्यांवर द्वैत आणि अद्वैत या दोन मतांना स्थापित करून या दोनही मतांची सरसता तुल्यबळ असल्याचे प्रतिपादन इथे केलं आहे. ही दोनही मते आणि त्यांचे सिद्धांत हे त्या गंडस्थळावर पोवळाच्या रत्नाप्रमाणे त्यांची आभा पसरवत आहेत.

इथे या ओवीचा समारोप करतानाच सरिसे एकवटत असे म्हणत द्वैताचे अद्वैतात झालेले एकीकरणही सांगितले जात आहे. इथे श्रीज्ञानेश्वरांनी द्वैत आणि अद्वैत या दोनही मतांना तुल्यबळ मानून दोघांचा सरसपणा स्पष्ट केला असला तरी ब्रह्मत्तत्व आणि त्याच्यातील शक्तीस्फुरणात परब्रम्ह हे अद्वैत एकच तत्त्व आहे हे सांगितले आहे. 

उपरि दशोपनिषदे जियें उदारें ज्ञानमकरंदें
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें शोभती भलीं ।। 18 ।।

गणेशाची ही शब्दरूप मूर्ती माउली अतीव माधुर्याने सुशोभित करतात. उपरि दशोपनिषदे जियें उदारें ज्ञानमकरंदें इथे गणेशाच्या मुकुटावरील सुगंध पसरविणाऱ्या फुलांचा उल्लेख करीत आहेत.

ही कुठली फुले आहेत? कुठला मकरंद यांमध्ये भरून आहे, जो या गणेशाच्या मस्तकाची शोभा वाढवत आहे? इथे श्री ज्ञानेश्वर दशोपनिषदांबद्दल सांगत आहेत. ब्रह्मविषयक ज्ञान हा उपनिषदांचा प्रतिपाद्य विषय आहे. उपनिषदांची संख्या खूप आहे परंतु त्यापैकी दहा उपनिषदे ही प्रमुख मानली गेली आहेत.

ईश–केन–कठ–प्रश्न–मुण्ड–माण्डूक्य–तित्तिरः ।
ऐतरेयं च छान्दोग्यं बृहदारण्यकं तथा ।।

दश उपनिषदांमध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड, माण्डूक्य, तित्तिर, ऐतरेय, छान्दोग्य आणि बृहदारण्यक यांचा समावेश होतो. यांना वेदांचा अंतिम भाग म्हणजे वेदान्त म्हणतात. या उपनिषदांच्या गर्भात ज्ञानमकरंदाचा संचय आहे. यातील प्रतिपाद्य विषय म्हणजे ब्रह्मज्ञान हे इहलोकापलीकडील तत्त्वंचा विचार जाणण्याची इच्छा असणाऱ्यांचे जीवन या तत्त्व-सुगंधाने भरून टाकते. अशी ही सुंदर उपनिषदरुपी फुले गणेशाच्या मस्तकावर आहेत.

अकार चरणयुगुल उकार उदर विशाल
मकार महामंडल मस्तकाकारें ।। 19 ।।

माउली या ओवीमधून, गणेशाचा देहाकार आणि ॐकार यांच्यातील साधर्म्य उलगडून सांगत आहेत. ॐकारामध्ये तीन मात्रा आहेत. अकार चरणयुगुल अकार मात्रा ही गणेशाचे दोन पाय आहेत. उकार उदर विशाल उकार मात्रेप्रमाणे मोठे पोट आणि मकार महामंडल मस्तकाकारें मकार मात्रेप्रमाणे विशाल मस्तक आहे.

हे तिन्ही एकवटले तेथें शब्दब्रह्म कवळलें
तें मियां गुरूकृपा नमिलें आदिबीज ।। 20 ।।

गणेशतत्त्वाचे निरुपण करणारी ही अंतिम ओवी पुन्हा प्रथम ओवीकडे आपल्याला घेऊन जाते. भावार्थदिपिकेच्या ‘ॐ नमोजी आद्या’ या पहिल्याच ओवीमध्ये या अंतिम ओवीचा अर्थ सापडेल. इथे श्रीज्ञानेश्वर माउली म्हणतात, की या तीनही मात्रा एकत्र येऊन ॐकार निर्माण होतो. हे शब्दब्रह्म सर्व जगाचे ‘आदिबीज’ आहे ज्याला ते गुरु अनुग्रहाने जाणून त्याला नतमस्तक होत आहेत. 

हाच भावार्थ श्रीज्ञानेश्वर माउलींनी पहिल्या ओवीमधून प्रकट केला आहे. ॐकाररुपी ब्रह्मस्वरूपाचे स्थूल असे मंगलकारक अभिधान म्हणजेच हा मंगलमूर्ती गणेश. शब्दब्रह्माचे आदिबीज याच गजाननाच्या ठाई एकवटले आहे, त्यामुळे आरंभ म्हणजेच हा श्रीगणपती आहे. म्हणूनच श्रीज्ञानेश्वर माउली या आत्मरूप तत्त्व असलेल्या गौरीपुत्र विनायकाला नतमस्तक होऊन ग्रंथ निर्मितीस आरंभ करीत आहेत.

– वैशाख कृ. 2 शके 1943, शुक्रवार (28 मे 2021).

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

3 thoughts on “स्वाध्याय सुधा सूत्र 3. श्रीज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेतील श्रीगणेश तत्त्व (उत्तरार्ध)

  1. स्वाध्याय सुधा सुत्र 2 भावार्थदीपिकेतील गणेशतत्व हा लेख खुप उत्कठपणे मनाला भावला अमृताची धार हृदयावर पडते अशी अनुभूती आली ,सुधा सुत्रे उत्तम

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.