मंदिर स्थापत्यातील एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी घटक म्हणजे शुकनास. मंदिराच्या छाद्य भागावर शिखर सुरु होते. या शिखरावर शुकनासिका किंवा महाशुकनासिकेची रचना केलेली असते. ‘शुक’ म्हणजे पोपट आणि ‘नासिका’ म्हणजे नाक त्यामुळे या स्थापत्य घटकाचा आकार हा पोपटाच्या नाकाप्रमाणे असल्याने याला शुकनास असे म्हणतात. या शुकनासिकांमध्ये विविध देवी- देवता किंवा क्वचित सिद्धांची शिल्पे असतात. त्यापैकी नटराज शिल्पांचा विचार आज करणार आहोत.
अनेक मंदिरांच्या शिखरांवर शुकनासिका या नृत्यमग्न शिवाच्या नटराज विग्रहाने सुशोभित केलेल्या असतात. भारतभर अनेक मंदिरांवर अश्या शुकनासिकेतील नटराज शिल्पे बघायला मिळतात. नागर शैलीतील इ.स. 8 व्या शतकातील जम्बूलिंगेश्वर मंदिर, पट्टदकल (प्रतिमा क्र.1) या मंदिराच्या शिखराच्या शुकनासिकेवर नटराज शिवाचे शिल्प आहे. मध्यभागी अष्टभुज नटराज कटीसम ताण्डव करीत आहे. शिवाच्या मागे वृषभ असून त्याच्या डावीकडे द्विभुजा उमा त्रिभंग स्थितीत उभी आहे. शिवाचा उजवा हात नाभीजवळ आणि दुसरा सिंहकर्ण मुद्रेत तर डावा हात करीहस्त आणि एक हात मांडीवर ठेवला आहे. इतर हातांमध्ये डमरू, परशु, सर्प असून एक हात उमेच्या खांद्यावर आहे ही सालंकृत प्रतिमा आहे. या शुकनासिकेच्या दोन बाजूला दोन नाग हात जोडून शिवाचे हे नृत्य बघत आहेत. तसेच आकाशगामी गंधर्व हे या दिव्य नृत्याचे आकाशातून अवलोकन करीत आहेत.
उदयेश्वर मंदिर (प्रतिमा क्र.2) उदयपुर विदिशा येथील शिखरावरील शुकनासिकेतील ही नटराज प्रतिमा असून सध्या ग्वाल्हेर संग्रहालायात आहे. हा शुकनासिकेचा भाग असून त्यामध्ये ऊर्ध्वजानु पदन्यासात तल्लीन नटराजाची सुंदर असे शिल्प आहे. यामध्ये अष्टभुज नटराजाच्या हातामध्ये अलपल्लव मुद्रा, त्रिशूल, बाण आणि सर्प असून डाव्या हातांमध्ये हंसपक्ष मुद्रा, धनुष्य, घंटा आणि कपाल आहे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट आहे. गळ्यात एकावली, ग्रेवेयक आणि एक माळा आहे. डाव्या खांद्यावरून रुळणारे यज्ञोपवित आहे. हातामध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र असून त्यावर सुंदर मेखला आहे. पायामध्ये पादकटक आणि पादजालक दोन्ही आहे. शिवाच्या उजव्या पायाशी एक गण डमरू वाजवतो आहे तर डाव्या पायाशी हातामध्ये झांज घेतलेला गण आहे. संपूर्ण शुकनासिका ही पद्मदल आणि पुष्पवेलींनी वेढलेली आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील अंबरनाथ, भुवनेश्वर येथील परशुरामेश्वर मंदिर, वेताळ मंदिर यांसारख्या अनेक मंदिरांच्या शिखरावर शुकनासिकेमध्ये विशेषत्वाने नटराज शिल्पे दिसतात.
छायाचित्र – प्रतिमा क्र. 1 – © धनलक्ष्मी म. टिळे | प्रतिमा क्र. 2 – © AIIS Photo Archive
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल त्रयोदशी शके १९४४.)