खूप वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक गोष्ट घडली. खूप वर्ष म्हणजे जवळजवळ 70 वर्षांपूर्वी. 26 जानेवारी 1950 साली भारताची राज्यघटना अंमलात आणली गेली आणि आजच्याच दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ती म्हणजे 26 जानेवारी 1950 साली भारताचे राजकीय चिन्हे स्वीकारले गेले.
चिन्हे किंवा प्रतिके ही एक प्रकारची साधने आहेत, जी माणसाला त्या प्रतिकांमागाचा अर्थ समजून घेण्यासाठी अंतर्मुख होण्यास भाग पडतात. ही चिन्हे आपल्याला काहीतरी संदेश देत असतात. त्यातून अभिव्यक्त होणारा अर्थ समजून घ्यावा लागतो. तेव्हाच त्या चिन्हां मागच्या संकल्पना स्पष्ट होतात. म्हणूनच आपल्या भारताचे सध्याचे राजकीय चिन्ह आपल्याला काय अभिव्यक्त करत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल मागे, इतिहासात. साधारण इ.स.पू 4 थ्या शतकात.
इ.स.पू. 4 थे शतक म्हणजे मौर्यकाळ. भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात अनेक स्थित्यंतरे घडवणारे होते. अनेक नवे प्रवाह भारतात येत होते. भारतातील प्राचीन कलेची वाटचाल पहिली तर ही सुरुवात मानली जाते. याचा अर्थ असा नाही की या काळाआधी कलानिर्मिती झालीच नाही, परंतु त्या कलाकृती काळाच्या ओघात नष्ट झाली असल्याची शक्यता आहे. म्हणूनच कलावशेष उपलब्ध होतात ते या काळातले. त्या अनेक कला अवशेषांची सविस्तर माहिती आपण भविष्यात बघूच.
पण आजच्या दृष्टीने महत्त्वाचा कलावशेष जो आज स्वतंत्र भारताचे राजचिन्ह आहे आणि ते म्हणजे सारनाथ येथील सिंह स्तंभशीर्ष.
सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना अशोकस्तंभ म्हणतात. ते स्तंभ त्याच्या साम्राज्यभर विखुरलेले होते. यूआन च्वांग हा सातव्या शतकातील चिनी प्रवाश्याने अशा पंधरा अशोकस्तंभांचा उल्लेख केला आहे. त्यांपैकी आज तेरा स्तंभ प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत. आणखीही काही स्तंभ असणे शक्य आहे. पण अजून ते उपलब्ध झालेले नाहीत. हे स्तंभ आज मूळ रूपात अस्तित्वात नाहीत, काहींची फक्त शीर्ष दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे सारनाथचे स्तंभशीर्ष.
सारनाथ, भारतातील एक प्रसिद्ध प्राचीन स्थळ आहे. गौतमबुद्धाने ज्ञानप्राप्ती नंतर पहिले प्रवचन दिले होते, त्या स्मरणार्थ अशोकाने इथे स्तूप आणि स्तंभ उभारले होते. या स्तंभावरती ब्राह्मी लिपीत एक लेखही कोरला होता. 1905 मध्ये झालेल्या पुरातत्वीय उत्खननात हे सिंहशीर्ष सुस्थितीत सापडले.
स्तंभशीर्षाचे कलात्मक आणि सांस्कृतिक महत्व
एकपाषाणी वालुकाश्म दगडातून निर्माण केलेली हि कलाकृती आजही नजरा खिळवून ठेवते. ह्या स्तंभशीर्षाला घासून चकचकीतपणा आणला आहे. याची उंची साधारण 2.15 मीटर म्हणजे 7 फुट आहे. सध्या हे सिंहशीर्ष उत्तर प्रदेशातील सारनाथ म्युझियममध्ये ठेवले आहे.
या स्तंभशीर्षावर घंटाकृती किंवा पालथ्या कमळाच्याआकाराचे शीर्ष, त्यावर एक गोलाकार पट्टी, त्यावर पाठीला पाठ लावून उभे असलेले चार सिंह आणि त्यांच्या मस्तकावर उभे धर्मचक्र, असे या मूर्तीचे मूळ स्वरूप होते. आता हे धर्मचक्र पडून गेले आहे, पण उरलेला भाग चांगल्या अवस्थेत आहे.
अतिशय रेखीव घंटाकृती शीर्षाच्या वरच्या गोलाकार पट्टीवर चार धर्मचक्रे आहेत. एका धर्मचक्राच्या आड एक प्राणी म्हणजे सिंह, घोडा, हत्ती आणि बैल यांची शिल्पे कोरली आहेत हे सर्व प्राणी अतिशय सुबक, प्रमाणबद्ध आणि डौलदार दिसतात.
पाठीला पाठ लावून असलेले 4 सिहं, दाट आयाळ आणि वळवलेल्या झुपकेदार मिशांमुळे अतिशय रुबाबदार आणि राजेशाही दिसतात. ह्या सिहांच्या एकूणच हावभावावरून हे राजसत्तेचे सामर्थ्य दर्शवणारे दिसतात. त्याच्या पायाचे स्नायू, पंजे, नख हे सर्व खूपच यथातथ्य दाखवले आहेत.
कलात्मक दृष्टीकोनातून ह्या स्तंभावरील चार प्राणी म्हणजे चातुर्माहाराजिक ही बौद्ध सिद्धांतावर आधारित चार जगांची संकल्पना अंकित केली आहे. चार दिशांचे चार संरक्षक राजे आणि त्यांची वाहने त्या प्राण्यांच्या रूपात अंकित केली आहेत. उत्तर दिशेला वैश्रवण ज्याचे वाहन सिंह आहे. पूर्व दिशेला धृतराष्ट्र ज्याचे वाहन हत्ती आहे. दक्षिण दिशेला विरुधक ज्याचे वाहन घोडा आहे. पश्चिम दिशेला विरुपाक्ष ज्याचे वाहन बैल आहे.
भारताच्या राजचिन्हात मात्र पालथ्या कमळाचा आकार वगळण्यात आला आहे. मुण्डकोपनिषद मधील सत्यमेव जयते हे वचन देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे.
भारतातील राष्ट्रीय संस्थांनी (Government Agencies) देखील सारनाथचे प्रतिक त्यांचे प्रतिकात्मक चिन्ह म्हणून स्वीकारले आहे.
याशिवाय आसाम, गुजरात, कर्नाटक, केरळा, मेघालय, मिझोरम, ओडीसा, पंजाब, तामिळनाडू, त्रिपुरा आणि तेलंगना ह्यांच्याही प्रांतिक चिन्हात या सिंहशीर्षाचा समावेश केला आहे.
म्हणूनच भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतिक असलेले हे अशोकाचे स्तंभशीर्ष चिन्हाची अभिव्यक्ती, राजकीय आणि कलात्मकदृष्टीनेही तितकीच महत्त्वाची आहे.
Photo Credits : Internet and Wikipedia