मानवासाठी चित्रकला हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्राथमिक साधन होते. हे आपल्याला प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास बघताना समजते. अगदी प्राचीन काळापासून मानव जेव्हा गुहांमध्ये राहत होता त्यावेळी चित्र या माध्यमाचा त्याने यथायोग्य वापर केलेला दिसतो. भारतीय उपखंडाबद्दल विचार केला तर प्राचीन भारतीय चित्रकलेचा प्रवास हा आपल्याला भीमबेटका येथील मानवनिर्मित शैलाश्रयांमध्ये झालेला दिसतो.
परंतु ज्याप्रमाणे काळाच्या ओघात वास्तूशास्त्र, शिल्पशास्त्र ही शास्त्र रुपात जशी विकसित झाली तशीच चित्रशास्त्र हे सूत्र रुपात आणून त्याला एक शास्त्रीय बैठक लाभली. विष्णूधर्मोत्तर पुराणातील ‘चित्रसूत्र’ हे त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय मानसोल्लास, तंत्रसम्मुचय, शिल्परत्न यांसारखे ग्रंथ ही चित्रकर्मासाठी अधिक उपयुक्त होते, कारण देवता स्वरूपाच्या ध्यानश्लोकानुसार त्यांच्या प्रतिमांचे आरेखन केले जात.
नटराजाचे उदात्त स्वरूप आणि त्यातील धर्म, कला आणि तत्त्वज्ञान यांचा समन्वय हा सर्वांसाठीच आकर्षणाचा विषय होता. त्यामुळे शिवाच्या नटराज स्वरूपातील चित्ररूपातील अभिव्यक्तीही आपल्याला बघायला मिळते. वेरूळ येथील कैलास मंदिरातील मंडपाच्या वितानावर अत्यंत सुरेख असे नटराज चित्र आहे. इ.स. 8 शतकातील हे चित्र आहे. दशभुज नटराजाचे हे चित्र असून केवळ लाल, पांढरा, पिवळा आणि काळा या रंगांचा वापर या चित्रामध्ये केला आहे.
केरळची भित्तीचित्र शैली (Murals) विकसित झाली. त्या शैलीतील इ.स. 17 शतकातील नटराज चित्रही विलक्षण सुंदर आहे. षोडशभुज नटराज या भित्तीचित्रामध्ये चित्रित केला आहे. हे चित्र महादेव मंदिर,एत्तुमनुर येथील आहे.
सध्या ब्रिटीश म्युझियम मध्ये असलेले चिदंबरम शैलीतील नटराज चित्र आहे. यासाठी कागद या माध्यमाचा वापर केला आहे. मूलयकावर आनंद ताण्डव करणाऱ्या नटराजाचे हे चित्र आहे. चतुर्भुज नटराजाच्या भोवती प्रभामंडल आहे. नृत्यरत शिवाच्या डावीकडे शिवकामसुन्दरी देवीचे चित्रण केले आहे. तर उजवीकडे पतंजली आणि व्याघ्रपाद हे अंजली मुद्रेत नटेश्वराला नमस्कार करताना चित्रित केले आहेत. आकाशगामी गन्धर्व सुवर्ण कलशातून नटराजावर अभिषेक करताना या चित्रामध्ये दिसत आहेत.
छायाचित्र – प्रतिमा क्र.1- © धनलक्ष्मी म. टिळे, प्रतिमा क्र.2 – साभार अंतरजाल, प्रतिमा क्र.3 – ब्रिटीश म्युझियम | प्रतिमा क्र. 1 – वेरूळ येथील कैलास मंदिर, प्रतिमा क्र. 2 – केरळ येथील भित्तीचित्र, प्रतिमा क्र.3 – ब्रिटीश म्युझियममध्ये असलेले चिदंबरम शैलीतील नटराज
(पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष सप्तमी शके १९४४.)