आज सोमवार, श्रावणमास आरंभ होतोय. बोधसूत्र वाचकांसाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतील हा पहिला लेख घेऊन आले आहे.
देवांचा देव महादेव म्हणून शिव आपल्याला सर्वज्ञात आहे. या महादेवाच्या प्रारंभिक अवस्थेचे मूळ आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडते. पिनाकपाणी रुद्र या देवतेसाठी ऋग्वेदामध्ये तीन ऋचा संकलित केल्या आहेत. हा रुद्र भयानक, उग्र आणि विनाशकारी आहे. पण सोबतच तो मांगल्याचेही प्रतिनिधित्व करणारा म्हणून ओळखला गेला आहे. अनेक वेगवेगळ्या उल्लेखातून रुद्राच्या व्यक्तित्वाची संकल्पना स्पष्ट होताना दिसते. हा गौरवर्णाचा तेजस्वी युवक आहे ज्याची कांती सुवर्णालंकारांनी तेजोमयी झाली आहे. ज्याच्या हातामध्ये पिनाक नावाचे धनुष्य आहे आणि सोबत तीक्ष्ण आणि तीव्र वेगाचा असा बाण आहे. या रुद्राचा देह पुष्ठ आहे आणि त्याचे हात शीतलता देणारे, जीवनदायी आहेत असा उल्लेख येतो. कारण रुद्र वैद्य असून तो जलाष नावाच्या दिव्य औषधीने उपचारही करतो. मूजवान पर्वतामध्ये याचे निवासस्थान आहे. मरुत गणांचे पितृत्व हे रुद्राकडे आहे पण पुढे अथर्ववेदात हे मरुत रुद्राचे सहचारी म्हणून येतात.
यजुर्वेदातील शतरुद्रीय, रुद्राच्या शभंर विविध रूपाची ग्वाही देतो. तैत्तिरीय संहितेमध्ये रुद्राच्या नावाचा संबंधित अतिशय रोचक असा कथाभाग आहे. देव-दानव ह्यांच्या युद्धामध्ये देव त्यांची संपत्ती अग्नीकडे ठेवतात. युद्धानंतर ती संपत्ती परत घेण्यासाठी देव येतात तेव्हा अग्नी रडतो. अग्नी रडला म्हणून त्याला रुद्र म्हटले आहे. इथे अग्नी आणि रुद्र यांचा संबंध आपल्याला दिसतो. शतपथ ब्राह्मणामध्ये मात्र रुद्रचा अर्थ होतो रडवणारा. उपनिषदांमध्ये रुद्राचे महेश्वर असे वर्णन येते. महाभारतातील अनुशासन पर्वात रुद्र हे शिवाचे रौद्र तर शिव हे शांत स्वरूप म्हणून सांगितले आहे. याच महाभारतामधील शांती पर्वामध्ये दक्ष, शिवाची स्तुती करतानाचा उल्लेख रुद्राच्या दृष्टीने महत्वाचा आहे. रु म्हणजे संकट आणि द्र म्हणजे द्रावण करणारा म्हणजेच तो संकटे दूर करणारा रुद्र असा उल्लेख दक्ष करतो. अठरा महापुराणांपैकी मत्स्य, वायू, लिंग, शिव पुराणातही या रुद्राचे उल्लेख सापडतात. पुराणांमध्ये शिव कल्याणमय आणि भक्तवत्सल रूपात साकार होतो. इथे मात्र हा भीषण रुद्र त्याचे आधिपत्य ईशान हे मंगलमयी रूप दर्शवतो.
रुद्र देवतेचे स्वरूप बहुतांशी शिव स्वरूपाच्या जवळ जाणारे आहे. रुद्र हाच त्र्यंबक आहे. त्रि + अंबक म्हणजे तीन नेत्र धारण करणारा असा अर्थ होतो. अग्नीशी संबधित असल्याने या रुद्राचा तिसरा नेत्र म्हणजे अग्नी आहे. रुद्र हा जटाधारी आहे. अनेक ठिकाणी रुद्राचा उल्लेख कपर्दिन असा येतो. कपर्द म्हणजे जटा. रुदाला नवनिर्मितीचा कारक मानला आहे. त्याला वृषभ हे विशेषण येते. त्यामागेही हेच कारण आहे कि रुद्राकडे अपरिमित शक्तीचा संचार आहे. तो पुनरोत्पत्तीचा देव मानला गेला आहे.
भव आणि शर्व अश्या दोन नावांचा उल्लेख या रुद्राच्या संदर्भात येतो. अथर्ववेदाच्या सुरुवातीला भव आणि शर्व या दोनही देवतांचे एकत्रित स्तवन केले आहे. येथे त्यांना श्रेष्ठ धनुर्धर या उपाधीने गौरविण्यात आले आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये अग्नीच्या अशांत रूपाला भारताच्या पूर्वेकडे म्हणजे बिहार भागात शर्व म्हणत तर पश्चिमेला भागात भव या नावाने पूजले जात, असा उल्लेख येतो. या दोघांना भूपती आणि पशुपती असे संबोधनही आलेले दिसते. भव आणि शर्व ह्या दोन स्वतंत्र देवता असल्या तरी त्यांचा अग्नीशी असलेला संबंध रुद्र स्वरूपाच्या जवळ जाणारा आहे. श्वेताश्वर उपनिषधात रुद्राचा उत्कर्ष साकार होतो आणि तो योगेश्वरत्व प्राप्त करतो.
प्राचीन ग्रंथातून उमटणाऱ्या भयानक रुद्राच्या संकल्पना पुराणकाळापर्येंत येताना शिव या सौम्य स्वरूपात विलीन होतात दिसतात. पुराणांनी शिवाचे मांगल्य उचलून धरले आणि आपल्यासमोर उभा राहिला तो सर्वमंगलकारी शिव. रुद्र रूपाने झंझावातासारखा येणारा हा महोदेव उन्नत होऊन चराचरात संचार करणारा महादेव होतो. हा पिनाकपाणी रुद्र म्हणजे शिवाचे अलौकिक रूप आहे जो विनाश आणि सृजन ह्याचे एकत्व दाखवतो.
या रुद्र रूपात अनेक भाव, रंग आणि तत्त्वज्ञान लपलेले आहे. त्यांचे एक एक पदर उलगडणे आवश्यक आहे. शिवाय नमः या लेख मालिकेच्या रूपात त्याची सुरुवात मी केली आहे. शिवाच्या ह्या रुद्र रूपाला रुद्राय नमः म्हणून अत्तासाठी इथेच पूर्णविराम देते. पुढच्या सोमवारी शिवाय नमः या लेख मालिकेतून रुद्र शिवाच्या दुसऱ्या स्वरूपाची भेट घेऊ.
रूद्र या देवतेला पुराण काळापासून शिव म्हटले जावू लागले असे आहे का?
अविनाश जी, शिव या देवतेचा विचार केला तर रुद्र ही प्राचीन संकल्पना या देवतेला जोडलेले आहे. पुराण काळामध्ये अनेक कथांमधून याच रुद्राचे सौम्य स्वरूप शिव म्हणून येते. पण शिव ही संकल्पनाही काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये बदलताना दिसते. याशिवाय शिवाचे सांप्रदायिक स्थान या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकते. यावरही भविष्यात विस्तृत विवेचन बोधसूत्र ब्लॉग लिहीन.