भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर मध्ये 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2017 दरम्यान गणेश – आशियाचे दैवत या डॉ. मधुकर केशव ढवळीकर सरांच्या पुस्तकावर आधारित चित्रप्रदर्शन सादर करण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी मला स्वयंसेवी सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अर्थात ही संधी मिळाली पेक्षा ही संधी मी घेतली म्हणणे अधिक उचित ठरेल. ढवळीकर सरांना प्रत्यक्ष भेटण्याआधीच त्यांच्या वलयाची मला कल्पना आणि जाणीव होती. जागतिक कीर्ती संपादन केलेले पुरातत्त्वज्ञ, सांस्कृतिक मंत्रालय यांच्या टागोर शिष्यवृत्तीचे मानकरी आणि पद्मश्रीने सन्मानित डॉ. मधुकर केशव ढवळीकर म्हणजे भारतीय पुरातत्त्वातील एक अधिकारी नावं होते. भारतीय पुरातत्त्व या विषयांत एम.ए. ही पदवी सुवर्णपदकासह त्यांनी प्राप्त केली होती. सरांसारखे असे मूर्तिमंत ज्ञानपीठ मला प्रत्यक्षात दर्शन देणार होते. स्वयंसेवी सहाय्यकांसाठी एक पर्वणी म्हणजे, आम्हाला आधी सर स्वतः हे प्रदर्शन समजावून सांगणार होते. एका क्षणाचाही विलंब न करता मी या कामासाठी तयार झाले. इंडोलॉजी शिकताना अगदी पहिल्या सत्रापासून ते शेवटच्या सत्रापर्येंत ढवळीकर सर मला फक्त पुस्तकातून भेटत होते. काही व्याख्यानांच्या दरम्यान त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा, ऐकण्याचा योग आला इतकंच. पण सरांच्या अधिकारापुढे त्यांच्याशी जाऊन काय बोलावे हा प्रश्न कायमच पडत होता. त्यामुळे बोलण्याची संधी अनेकदा हातातून निसटून जात असे. ढवळीकर सरांच्या परिचयाच्या काही व्यक्तींजवळ मी सरांना भेटण्याची इच्छा प्रकट केली, पण हा योग कधी जुळून आलाच नाही. ‘गणेश – आशियाचे दैवत’ या चित्रप्रदर्शनाने मला ती संधी दिली. ते सात दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहतील, हे खरे.
मी भारतीय विद्या या अभ्यासाकडे आले तेच मुळात कलेच्या प्रेमापोटी. १४ ते १७ व्या शतकापर्यंत झालेल्या कला क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ याविषयी मी स्वयं-अध्ययन करीत होते. तिथून मी फ्लॉरेन्स, युरोप येथील कला, त्यांच्या शैली अभ्यास करत थेट पोहोचले ते अजिंठापर्यंत. त्यावेळी जाणीव झाली की, अजिंठ्यासारखी कलाकृती भारतामध्ये पाश्चिमात्य रेनेसांसच्या कित्येक शतके आधी निर्माण झाली आहे. याच काळात Gladstone Solomon यांचे The Bombay Revival Of Indian Art, The Charm Of Indian Art यासारखी अनेक पुस्तके वाचनात आली. भारतीय आणि पाश्चिमात्य कलाकारांनाही भारतीय कलेनी जी मोहिनी घातली ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत होते. त्यातून भारतीय संस्कृतीतील कलेचा मागोवा घेण्याचा माझा शोधप्रवास सुरु झाला. पुढे मी इंडोलॉजीला प्रवेश घेऊन माझा अभ्यास सुरु झाला. माझ्यासाठी भारतीय कला जगतातील अजिंठा हा त्यामानाने परिचयाचा विषय होता, त्यामुळे तो माझ्या कला अभ्यासाचा आरंभ बिंदू ठरला. या दरम्यान लाईफ इन द डेक्कन अज डेपिक्टेड इन द पेन्टिंग्ज ऑफ अजंठा हा ढवळीकर सरांच्या PhD चा प्रबंध हातात पडला. डॉ. ह.धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी हा प्रबंध पूर्ण केला होता. आजपर्येंत कलेचा आस्वाद घेण्यासाठी कलेकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार झाला होता, त्याला छेद देत आपली सांस्कृतिक ओळख शोधण्यासाठी कलेकडे बघायला मी शिकले, ते सरांमुळे. वस्त्रालंकार, केशभूषा, फर्निचर यासारख्या भौतिक साधनांच्या आधारे तत्कालीन सामाजिक जीवनाचा परामर्श सरांनी या प्रबंधामध्ये घेतला आहे.
कोणतेही नियतकालीक असो, पुस्तक असो, शोधपत्रिका असो त्यात ढवळीकर सरांचा एकतरी लेख असेच. भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विषयाला स्पर्शून त्यांनी केलेलं लेखन बघून मी थक्क झाले. ताम्रपाषणयुगीन संस्कृती असो, पर्यावरण आणि संस्कृती असो, गणेश या देवतेची वाटचाल असो, महाराष्ट्राची प्राचीनता असो अगदी भारतीय नाणकशास्त्र असो सरांनी त्याच अधिकाराने ते विषय हाताळलेले आहेत. अफाट वाचन आणि तितकेच, किंबहुना थोडे अधिकच लेखन या दोन्हीच्या सहाय्याने समृद्ध जीवनाचे एक उदाहरण सरांनी माझ्यासारख्या भावी संशोधकांसमोर ठेवले आहे. नियमित वाचन, चिंतन आणि लेखनाने त्यांच्या संशोधनातील वाटा अधिक प्रगल्भ होत गेल्या, हाच ठेवा ते आज सुपूर्त करून गेले आहेत असं मला वाटतं.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशे, जळगाव जिल्ह्यातील बहाळ आणि टेकवडे, संगमनेर जवळील दायमाबाद येथे झालेल्या उत्खननात त्यांचा सहभाग होता. याशिवाय महाराष्ट्रातील पवनार, पंढरपूर , वाळकी, कंधार , आपेगावं यासारख्या स्थानांबरोबर गुजरात, प्रभास-पाटण, मध्य प्रदेशामधील कायथा, आसाममधील गुवाहाटी येथे त्यांनी उत्खनन केले. ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचा शोध घेताना इनामगावं येथील उत्खनन हे अतिशय महत्वपूर्ण ठरले. गार्डन चाईल्ड व अन्य पाश्चात्य विद्वानांनी मांडलेल्या सिद्धांताचा भारतीय संस्कृतीच्या अंगाने पडताळा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रातील पहिला शेतकरी व त्याची वसाहत, प्रागैतिहासिक खेडे आणि त्यांचे आकृतीबंध, तेथील वसाहत आणि त्यांची संरचना, ग्रामप्रमुख व इतरांचे जीवन, दैवत विषयक संकल्पना यासारख्या अनेक बाबी त्यांनी बारकाव्यानिशी नोंदवल्या आहेत.
पर्यावरण आणि संस्कृतीचे नाते सांगणारा विषय त्यांनी हाताळला. जागतिक पर्यावरणाचा मानवी संस्कृतीवर होणारा परिणाम व निसर्गाबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न म्हणजे संस्कृती असे समीकरण मांडले. अनुकूल पर्यावरण असेल तर मानवी संस्कृतीच्या विकासाला चालना मिळते ही बाब अधोरेखित करताना भारतीय संस्कृतीच्या संदर्भात त्यांनी त्यांची मते व्यक्त केली. आर्यप्रश्न हा त्यांच्या दृष्टीने भारतीय इतिहासातील एक न सुटणारे कोडे वाटत होते. आर्यांनी विशेषतः इंद्राने सिंधू संस्कृतीच्या विध्वंस केला नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आर्य हे भारतीय होते व इथून ते बाहेर गेले यासारख्या मतांचे प्रतिपादन करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. अलीकडील बऱ्याच उत्खननांतून आणि संशोधनातून तसे सिद्धही झाले आहे. अश्या संस्कृतीच्या अनेक विषयांना स्पर्श करून त्यांनी समाजाला त्यांचे बहुमुल्य योगदान दिले आहे.
27 मार्च 2018 ला ढवळीकर सरांचे देहावसन झाले. त्यांची शेवटची भेट घ्यायला त्यांच्या ‘श्रीवत्स’ या निवासस्थानी जाऊन आले. त्यावेळी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नव्हते. पण आज 16 मे सरांचा जन्मदिवस असतो, त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळाही मिळाला. सरांचे संशोधन कार्य, त्यांची जिद्द, चिकाटी आणि त्यांच्या शिस्तीला माझा प्रणाम.
खरंच, डॉ ढवळीकर सर म्हणजे पुरातत्व आणि इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होय.
very informative and excellent.