लेखन ही माझी साधना आहे आणि या साधनेला बोधसूत्र या ब्लॉगमुळे आकार मिळाला आहे. भारत विद्या (Indology) या विषयांमध्ये अध्ययन करीत असताना, खरतरं बोधसूत्र ब्लॉगचे सृजन झाले. भारतीय संस्कृती आणि आपल्या प्राचीन परंपरा यांचे भांडार आपल्याला लाभलेले आहे. त्यातलेच काही ज्ञानाचे, कलेचे माणिक- मोती वेचून शब्दांच्या सूत्रांमध्ये गुंफावे अशी माझी मनीषा होती.
भारत विद्या पारंगत पदवीच्या (M.A.Indology) शेवटच्या वर्षात शिकत असतानाच, म्हणजे 2017 साली बोधसूत्र नावाने मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. आजही भारतीय संस्कृतीचे काही ज्ञात-अज्ञात पैलू वाचकांसमोर ठेवताना मलाही तितकाच आनंद होतो, जितका या ब्लॉगला भेट देणाऱ्या वाचकांना हा ब्लॉग वाचताना होतो.
जेव्हा लेखन करायचे ठरले तेव्हा एक मंच हवा होता, जो आपले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. सध्याच्या युगाला साजेसे माध्यम म्हणून अधिकृत संकेतस्थळ (website) आणि समाजमाध्यमातून (Social Media) खरतरं बोधसूत्रचा हा लेखन प्रवास सुरु झाला.
बोधसूत्र नावाची ही एक वेगळीच कहाणी आहे. बोधसूत्र नावाने लेखन करते म्हटल्यावर, मला वेळोवेळी अनेकांनी विचारले आहे, की हेच नावं का निवडलेस? याचे उत्तर माझ्यासाठी अतिशय सोपे होते, बोध म्हणजे ज्ञान, जाणीव, जागृती आणि सूत्र म्हणजे धागा. प्राचीन भारतीय संस्कृतीचे आघाद ज्ञान आपल्या पूर्वजांनी, पूर्वसुरींनी, अभ्यासकांनी परंपरेने आपल्याला सोपवले आहे. त्या ज्ञानाच्या वृद्धीसाठी आणि ते जतन करून पुढे प्रवाहित होण्यासाठी, हा ज्ञानयज्ञ सुरु केला.
भारतीय संस्कृती आणि प्राचीन कला पुन्हा एकदा नव्याने अभ्यासून बोधसूत्राच्या माध्यमातून एकत्रित संकलित करण्याचा माझा प्रयत्न होता. अगदी साध्या जाणीवेपासून सुरु झालेला हा प्रवास होता. अनेक वर्षाच्या मंथनाने हा प्रवाह हळूहळू जाणीवेपासून जागृतीपर्यंत येऊन पोहचला आहे.
बोधसूत्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पैलू उलगडत जाणारे सूत्र आहे. या वैभवशाली भारतीय संस्कृतीला शब्दबद्ध करताना त्यात अभ्यासात्मक दृष्टीकोन असला तरी एक आपलेपणाची ऊब असावी, असे मला वाटत होते. आणि म्हणून बोधसूत्र माझ्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतूनच लिहिण्याचे ठरवले. भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यम असल्याने सर्वच भाषा माझ्यासाठी तितीक्याच मोलाच्या आहेत.
सतत सहा वर्ष अनेक अभ्यासपूर्ण लेख, स्वाध्याय सुधा सारखी गहन-चिंतनात्मक लेखमालिका वाचकांच्या कौतुकास पात्र ठरली. भगवान शिव, नवरस आणि देवी, वारसा अश्या विषयांना समर्पित काही विशेष लेखमालाही वाचून अनेकांनी त्याबद्दल आवर्जून त्यांच्या उत्तम प्रतिक्रिया नेहमीच नोंदवल्या आहेत.
सुगम नावाने अगदी हलके-फुलके पण वाचकांना नवीन माहिती देणारे लेखही संकलित केले. भारतीय संस्कृती आणि परंपरा याच विषयाला समर्पित अतिथी सूत्र या सदरांतर्गत अनेक अतिथी लेखकांनी आनंदाने बोधसूत्र ब्लॉगसाठी लेखन केले आहे.
या प्रवासात अनेक संपादक, वाचक, लेखक अशी अनेक मंडळी बोधसूत्रशी जोडली गेली. त्या सर्वांची मी मनापासून ऋणी आहे. सर्वांचा प्रतिसाद आणि सहकार्य यांमुळे बोधसूत्र ब्लॉग हा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचतो आहे, याचे समाधान आहे.
मी स्वतः संशोधन क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक स्थळांना मी प्रत्यक्ष भेटी देते. त्यामुळे बोधसूत्र ब्लॉगवर वापरले जाणारे Photos दोन स्वरूपात आहेत. जे photos मी स्वतः स्थळांना भेटी देऊन काढले आहेत त्यावर माझा copywriter टाकण्यात आला आहे. इतर photos हे CC Zero या licenses अंतर्गत वापरले आहेत. बोधसूत्र वरील लेखांत माझी मते, अभ्यास मांडलेला असतो. शिवाय इतर अभ्यासकांची मते लेखांत स्पष्ट नमूद केलेली असतात. आवश्यक लेखांना संदर्भही जोडले जातात.
त्यामुळे बोधसूत्र आणि त्यावरील लेख, छायाचित्रे, रेखाचित्रे तसेच इतर साहित्य यांविषयीचे सर्व हक्क माझ्याकडे अर्थात संकेतस्थळ धारकाकडे राखिव असून कोणत्याही व्यक्तीला बोधसूत्र या संकेतस्थळावरील गोष्टींचा परवानगीशिवाय वापर करता येणार नाही.
परवानगीसाठी, नवीन संकल्पनांसाठी किंवा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर कौतुक करण्यसाठी आपण bodhsutra {at} gmail {dot} com किंवा sketchywish {at} gmail {dot} com वर ईमेलद्वारा संपर्क करून आपले विचार माझ्यापर्यंत पोहचवू शकता.