आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर हास्य म्हणजे आपल्या आनंदी जीवनासाठी असलेले उत्तम औषध बनले आहे. त्यामुळे कधी कुणाची चेष्टा करून, कधी शाब्दिक कोट्या करून परिहास म्हणजेच विनोद निर्मिती केली जाते. अर्थात ही आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद देणारी असावी हे जास्त महत्त्वाचे. पण अश्याच वाक् वैदिग्ध्य म्हणजे ज्याला आपण Wit म्हणतो अश्या स्वरूपाचे विनोद काही प्राचीन कलाकृतीतून आपल्याल्या निश्चितच बघायला मिळतात.
भवभूतीच्या उत्तररामचरित या नाटकाच्या कथाभागात एक चित्रप्रदर्शनाचा प्रसंग आला आहे. मिथिला येथे संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याचे हे चित्रप्रदर्शन असते. एकदा लक्ष्मण हे चित्र प्रदर्शन सीतेला दाखवीत असतात. सीता आणि भरतपत्नी मांडवी नंतर लक्ष्मण पत्नी उर्मिला हिचे चित्रे रेखाटलेले असते. परंतु लक्ष्मण ते चित्र टाळून शत्रुघ्न पत्नी श्रुतकीर्तीच्या चित्राकडे वळतात. तेव्हा सीता वत्स इयमपरा का? म्हणजे या मधल्या स्त्रीचा परिचय आपण करून दिला नाहीत, ही कोण ? असा प्रश्न करते. सीतेचे हे वाक् वैदिग्ध्य लक्ष्मणाच्या लक्षात येते. या कल्पक आणि मितरचनेतून रसिकांच्या गालावरही स्मित आणण्याची ताकद कवीच्या प्रतिभेत निश्चितच दिसते. साहित्यामध्ये असे विनोद निर्मितेचे प्रसंग कवी, नाटककार अतिशय कल्पकतेने फुलवत होते, तसेच हे प्रसंग चित्रकारांसाठीही प्रिय ठरले असावेत. अश्या पद्धतीने विनोद साधून लघुचित्र शैलीतही (Miniature) कलाकृती निर्माण झालेली दिसते.
रावी नदीच्या काठावर वसलेले बशोली किंवा बसोहली हे जम्मू आणि काश्मीर येथे बहरलेल्या पहाडी लघुचित्र शैलीसाठी प्रसिद्ध आहे. इ.स. 17 व्या शतकात अश्या प्रकारच्या विनोदाचा आशय असलेले एक चित्र आपल्याला बघायला मिळते. या चित्रामध्ये सीता आणि तिची सखी चित्रित केले आहेत. या स्वरूपाचे चित्र हे सखी परिहास म्हणूनही प्रसिद्ध आहे. सीता आणि तिची सखी या दोघी एका चित्र दालनात चित्र बघत असतात. तिथे सीतेच्या सखीला भिंतीवर दशावताराची चित्रे दिसतात आणि सखीच्या मनात सीतेची खोडी काढायची इच्छा निर्माण होते. पूर्वीच्या काळी लग्नानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याचे नावं घेत नसत. आणि अगदीच वेळ पडली तर स्त्रिया नवऱ्याच्या नावाला काही पर्यायी शब्द वापरत असत किंवा वर्णनात्मक गोष्ट सांगून नावनिर्देश करीत. हे लघुचित्र शैलीतील चित्र काहीशी अशीच कथा सांगत आहे. सीतेची सखी विष्णूचे दशावतार दाखवत हे कोण? असा प्रश्न करीत आहे. त्यातील सातव्या चित्राकडे सखी अंगुलीनिर्देश करीत सीतेला विचारत आहे की या चित्रात कोण चित्रित आहेत? अर्थात हे चित्र श्रीरामाचे असल्याने सीता काहीच उत्तर न देता गालातल्या गालात हसत आहे. सीतेला आपल्या सखीचा परिहास समजला आहे. सध्या हे लघुचित्र जम्मू येथील डोग्रा कला दालनात आहे. असे हास्य निर्मितीचे क्षण हे आपल्यासाठीही आनंद देणारे असतात, त्यामुळेच असे विनोदाचे विषय प्राचीन कलाकृतींमध्येही बघायला मिळतात.