भारतीय चलन आणि वारसा - रानी की वाव

Home \ sugama \ भारतीय चलन आणि वारसा – रानी की वाव

अगदी प्राचीन काळापासून ते आतापर्यंत पाणी हेच जीवन हे समीकरण आपल्या अगदी परिचयाचे आहे. त्यामुळे पाण्याला केंद्रस्थानी ठेऊन सर्वत्र मानवी जीवन विकसित झाले. दैनंदिन कामांपासून ते शेती आणि इतर व्यवसायासाठी पाणी ही आपली मुलभूत गरज आहे. त्यामुळे जल हा मानवी संस्कृतीत सर्वांत महत्त्वाचा घटक बनला. केवळ आपल्या भारतीय संस्कृतीतीच नव्हे तर बॅबिलोनियन, बल्लुचिस्तान, पर्शियन, ग्रीक, रोमन अश्या जगभरात नांदणाऱ्या सर्वच संस्कृतींमध्ये जलाचे महत्त्व मोठे आहे. मानवासाठी पाणी हे अमृत तेव्हाच होते, जेव्हा ते आपल्याला शुद्ध स्वरूपात प्राप्त होते. त्यामुळे शुध्द स्वरूपातील पाणी साठवण्याच्या अनुषंगाने मानवाने विहिरींची रचना करण्यास सुरुवात केली. याच विहिरींचे विस्तृत स्वरूप आपल्याला बारव स्थापत्य म्हणजे ‘पायविहीर’ या स्वरूपामधून स्पष्ट होताना दिसते. अशीच एक पायविहीर (Step-well) म्हणजे पाटण, गुजरात येथील रानी की वाव

सरस्वती नदीच्या काठावर असलेली ही पायविहीर जागतिक वारसा म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी ठरली. वाव, बारव, बावडी असे प्रतिशब्द पायविहीरीसाठी प्रचलित आहेत. इ.स. ११ शतकात ही बारव राणी उदयमती हीने राजाच्या स्मरणार्थ बांधली होती. रानी की वाव या बारव स्थापत्यामध्ये मारू-गुर्जर स्थापत्यशैली बघायला मिळते. या स्थापत्यातील तांत्रिकबाजू आणि वास्तूचे सौंदर्य या दोनही गोष्टी कलाकारांना साध्य करता आल्या आहेत. त्यामुळेच केवळ गुजरातसाठीच नव्हे तर रानी की वाव हे भारताचे गौरवस्थान बनले आहे. भारतातील सर्वांत स्वच्छ वारसास्थळ म्हणून ही बारव पुरस्कृत करण्यात आली आहे. ही पायविहीर सात स्तरीय असून स्थापत्यकलेतील उत्कृष्ट नमुना आहे. पाण्याच्या साठ्यासाठी तांत्रिक संरचना, स्थापत्य या सर्व गोष्टी या बारवेचे महत्त्व अधिकच वाढवतात, पण इथे असलेले शिल्पांकन आणि त्यांची कलात्मक मांडणी यांनी त्या बारवेचे सौंदर्य विलोभनीय झाले आहे. इथे धार्मिक, पौराणिक अश्या प्रतिमांची शिल्पांकने आहेत. जल हा घटक संपत्तीप्रमाणे मौल्यवान असल्याने पाण्याची उपयुक्तता आणि व्यवस्थापन सोबतच स्थापत्य आणि कला यांचा सुरेख संगम रानी की वाव येथे आपल्याला बघायला मिळतो. म्हणूनच भारतीय रिझर्व बँकने १०० रुपयाच्या नवीन नोटेवर रानी की वाव संपादित केली आहे. या नोटेमुळे जागतिक वारसा ठरलेली ही बारव जनसामान्यांमध्ये पोहचेल. चलनातील नोटेवर संपादित बारव आपला वारसा, त्याबद्दलची आत्मीयता, अभिमान आणि आदर याचे प्रतिक ठरेल. 

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.