सृजनरूपा प्रकृति

Home \ sugama \ सृजनरूपा प्रकृति

प्राचीन काळापासून शक्ति उपासना हा भारतीय परंपरेचा एक भाग होता आणि आजही तो आहे. अगदी ऋग्वेद काळापासून भारतीय वाङ्मय आणि शास्त्रांमध्ये अनेक स्त्री देवतांचे संदर्भ येतात. या संदर्भांशिवाय समाजातील अनेक विधी, परंपरा, सण आणि उत्सव हे स्त्री देवतांसाठी असतात. त्यापैकी नवरात्रोत्सव हा या शक्ति उपासनेचा एक पैलू दाखवणारा घटक आहे. उत्पत्ती हे शक्तीचे साकार स्वरूप म्हणता येईल, त्यामुळे शक्तीचे प्राथमिक स्वरूप प्रकृति मानले आहे. प्रकृति हा शब्द शक्ति तत्त्वाशी जोडला जातो तेव्हा त्यामागील संकल्पनेवर थोडा विचार होणे आवश्यक आहे. मूलतः प्रकृति या शब्दामधील कृ हा धातू क्रिया दर्शवतो. त्यामुळे स्वाभाविक प्रकृति हीच निर्मिती शक्ति, कारण शक्ति अश्या स्वरूपाची असल्याचे आपल्याला दिसते. वेद वाङ्मयातून शक्तीचे उल्लेख असले तरी श्रुती, आगम, पुराण आणि तंत्रसाहित्य शक्ति स्वरूपाचे गुणगान करतात. प्रकृति तत्त्व समजून घेण्याच्या दृष्टीने पुराणांमधून येणारी विवेचने ही महत्त्वाची आहेत. त्यापैकी देवीभागवतपुराणांत पुढील उल्लेख येतो- 

प्रकृष्टवाचकः प्रश्च कृतिश्च सृष्टिवाचकः ।
सृष्टौ प्रकृष्टा या देवी प्रकृतिः सा प्रकीर्तिता ॥ ५ ॥ (देवीभागवतपुराण, स्क.९ अ.५)

प्र अक्षर प्रकृष्टवाचक आहे, याचा अर्थ असा की जी उत्कृष्ट आहे अशी ती. कृती हा शब्द सृष्टीवाचक आहे. म्हणजे प्रकृतिमधील निर्मितीशक्ति दर्शवणारा आहे. सृजनरूपा प्रकृतिच्या निर्माण शक्तीचा गौरव येथे केला आहे.
पौराणिक संदर्भांत सृष्टी ही कायम उत्पत्ती-स्थिती आणि लय या चक्रातून मार्गक्रमण करीत असते. या चक्रातील प्रत्येक टप्प्यात प्रकृतिचा संचार हा सदैव असतोच. त्वमेव सर्वजननी मूलप्रकृतिरीश्वरी| प्रकृति म्हणजेच मूलप्रकृति त्यामुळे सृजन, स्थिती आणि संहार हे या जननीच्या अधिन आहे, असे म्हटले आहे. प्रलयानंतर सर्वकाही मूलप्रकृतिमध्ये विलीन होते आणि पुन्हा सृष्टीनिर्माण सुरु होतो.
याशिवाय प्रकृतीच्या ठायी असलेल्या त्रिगुणांचेही विवेचन अनेकदा केलेले दिसते. 

गुणे सत्त्वे प्रकृष्टे च प्रशब्दो वर्तते श्रुतः ।
मध्यमे रजसि कृश्च तिशब्दस्तमसि स्मृतः ॥ ६ ॥
त्रिगुणात्मस्वरूपा या सा च शक्तिसमन्विता । (देवीभागवतपुराण, स्क.९ अ.६,७)

प्र म्हणजे सत्वगुण कृ म्हणजे राजसगुण आणि ति हे अक्षर तामसगुणाचे निदर्शक आहेत. ब्रह्मवैवर्त्य पुराण, विष्णू पुराण, देवी भागवत यांसारख्या अनेक पुराणांमधून प्रकृतिला त्रिगुणात्मिका म्हणजे तीन गुणांनी युक्त अशी म्हटले आहे. प्रकृतिचे मूळ स्वरूप कसे आहे सांगायचे झाले तर ती अव्यक्ता आहे. तिची अनेक रूपे सूक्ष्म रूपाने कार्यरत असल्याने ती सूक्ष्मा आहे. प्रकृति ही स्वयं निरंतर असल्यानी ती अक्षय्या आहे. शब्द, स्पर्श, स्वरूप यांच्या पलीकडील ही शक्ति म्हणजेच प्रकृति आहे. स्थिर अश्या या प्रकृतिचे स्वरूप अजर आहे. सृजन हा प्रकृतीचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच शक्ति उपसानेमधील अनेक परंपरा, विधी हे सृजनाशी सांगड घालणारे आहेत असे दिसते. या अव्यक्ता शक्तीचे साकार स्वरूपात प्रकटीकरण होऊन आपल्याला देवीचे मूर्त रूपात दर्शन होते. या सृजनरूपा प्रकृतिच्या व्यक्त आणि अव्यक्त शक्तीचा जागर म्हणजेच आज पासून सुरु होत असलेला नवरात्रोत्सव.
आपणा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.