समुद्रोद्भव शंख

Home \ sugama \ समुद्रोद्भव शंख

शंख म्हणजे समुद्रामध्ये निवास करणारा एक जलचर. भारतीय संस्कृतीमध्ये शंखाचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जाणतोच. आपल्या धार्मिक विधी, पूजा – अनुष्ठानामध्ये शंख पावित्र्याचे प्रतिक मानला जातो. भारतीय परंपरेत जितके धार्मिकदृष्टीने शंखाचे महत्त्व आहे तितकेच त्याचे सामजिक अस्तित्वही अगदी प्राचीन काळापासून आपल्याला बघायला मिळते. सिंधूसंस्कृतीचा मागोवा घेतला तर जवळपास इ.स.पूर्व  3,000 वर्षांपूर्वी शंखापासून बनवलेल्या वस्तूंचा पुरावा उत्खननातून मिळत आहे. भारतातील कच्छ खाडी, लोथल, काठीयावाड आणि नर्मदा खोरे यांसारख्या अनेक स्थळांवर शंखाचे अलंकार विशेषतः बांगड्या, अंगठ्या, मणी आणि गळ्यातील हारासाठी लटकन यांचे प्राचीन अवशेष या उत्खननातून सापडले आहेत. याशिवाय भारतीय आयुर्वेद शास्त्रातही शंखभस्म किंवा शंखवटीचा वापर होत आला आहे.

श्रीमद्भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच कुरुक्षेत्रामध्ये उतरलेल्या महारथींच्या शंखध्वनीने रणभूमी दुमदुमून उठल्याचे वर्णन आहे. यांत श्रीकृष्ण आणि पांडवांच्या दिव्य शंखांची नावे येतात. श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव पाञ्चजन्य तर अर्जुनाकडे देवदत्त नामक आणि भीमाकडे पौण्ड्र नामक महाशंख आहे. युधिष्ठिराकडे अनन्तविजय नामक तर नकुल सहदेव यांच्याकडे सुघोष आणि मणिपुष्पक नामक शंख आहेत, असे वर्णन येते. पाञ्चजन्य नामक शंख श्रीकृष्णाकडे कसा आला याची कथा भागवत पुराणातून येते. संदीपनी यांच्या गुरुकुलामध्ये कृष्ण आणि बलराम यांचे विद्यार्जन सुरु होते. एकदा संदीपनी प्रभास तीर्थामध्ये स्नानादिक कर्मे करीत असताना पाञ्चजन्य नावाचा असुराने त्यांच्या पुत्राचे अपहरण केले. गुरुदक्षिणा म्हणून संदीपनींनी कृष्ण आणि बलरामाला आपल्या मुलाला सुखरूप परत आणण्याची मागणी केली. समुद्रात या पाञ्चजन्य असुरचे निवासस्थान असल्याने वरुण देवांच्या मदतीने बलराम आणि श्रीकृष्ण, त्या असुराचे मर्दन करतात. या असुराच्या हाडांच्या चुऱ्यापासून जो शंख तयार  होतो तो हा पाञ्चजन्य शंख. पाञ्चजन्य प्रमाणेच शंखचूड नामक भगवान शिवाकडे असलेल्या शंखाची कथा ब्रह्मवैवर्त पुराणात येते. शंखचूड नामक असुराचा वध करून त्याच्या अस्थीचूर्णापासून या शंखाची निर्मिती केली. या शंखाचा ध्वनी वाईट शक्तींचा नाश करून प्रसन्नता प्रदान करतो असे वर्णन आले आहे.

शंख म्हणजेच आकाश तत्त्व असल्याने, हे नादब्रम्हाचे प्रतिक आपल्यासाठी पूजनीय आहे. अतिशय पवित्र आणि सर्वमुक्तीदाता असा हा पाञ्चजन्य शंख, विष्णु आणि विष्णूच्या विविध अवतारांमध्ये तसेच वैष्णवी या देवतांकडे आयुधं स्वरूपात येतो. देवी दुर्गेकडे असलेला शंख हा परम विजयाचे प्रतिक असून तो वरुण देवाने दिलेली भेट आहे. शंख समुद्रातून उद्भवलेले एक रत्न असल्याने नवनिधींपैकी एक अश्या या मौल्यवान निधीचा अधिपती कुबेर आहे. या निधीचा संरक्षक म्हणून शंखनिधी नामक कुबेराचा एक यक्ष अनेक प्राचीन लेण्या आणि मंदिरांच्या प्रवेशद्वारावर अंकित केलेला दिसतो.

Dhanalaxmi
ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

2 thoughts on “समुद्रोद्भव शंख

  1. शंखावरील आपली माहिती अत्यंत उपयुक्त वाटली.धन्यवाद मेडम.

    1. धन्यवाद वासुदेव पेंडसे जी, धन्यवाद. आपले बोधसूत्र ब्लॉगवर स्वागत आहे. आपले अभिप्राय अवश्य कळवत रहा. यासाठी आपण माझ्या Facebook Page शी जोडले जाऊ शकता.
      Facebook Page ची लिंक जोडते आहे, अवश्य भेट द्या आणि Page Like करा.
      https://www.facebook.com/bodhsutra

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.