सध्याच्या पाकिस्तान प्रांतामध्ये असलेले मुलतान हे प्राचीन सूर्य उपासनेचे प्रमुख केंद्र होते. मुलतान येथील आदित्य मंदिर हे जगातील सर्वच लोकांचा आकर्षणाचे केंद्र बनले होते. श्रीकृष्णाचा मुलगा सांब याने या सूर्य मंदिराची स्थापना केली, असा पुराणांमध्ये उल्लेख येतो. सांब म्हणजे श्रीकृष्ण आणि जांबवंती यांचा मुलगा. रूपगर्वित सांब याच्या गैरवर्तनाने वडील श्रीकृष्ण त्याला शाप देतात की, त्याच्या शरीरावर कोड येईल. या शापापासून मुक्त होण्यासाठी मूलस्थान म्हणजेच मुलतान येथे सांबाने सूर्योपासना केल्याचे उल्लेख आहेत. ह्यूएनत्संग या चीनी प्रवाश्याने या सूर्य मंदिराला भेट दिली त्या वेळचे वर्णन करून ठेवले आहे. त्यावरून या मंदिराची कल्पना आपल्याला येते. ह्यूएनत्संग याने मु-लो-सान-पु-ल म्हणजे मूलस्थानपूर असा उल्लेख केला आहे. त्याने नमूद केले आहे ते असे –
येथे सूर्याचे प्रचंड आणि भव्य असे मंदिर आहे. या मंदिरातील सूर्य प्रतिमा सुवर्णाची असून ती रत्नजडीत अलंकारांनी सुशोभित केली आहे. देवाच्या सेवेसाठी स्त्रिया देवापुढे गायन करतात, सदैव नंदादीप प्रज्वलित ठेवतात, सुवासिक अत्तरे वापरतात. सर्व राजे, उच्च पदस्थ लोकं या मंदिराला भेट देऊन मौल्यवान रत्न भेट करतात. या लोकांच्या दानामधून गरीब लोकांच्या अन्नवस्त्राची आणि औषधपाण्याची सोय होईल अश्या धर्मशाळा येथे बांधल्या आहेत. मंदिराच्या बाजूने पाण्याच्या तळी आहेत आणि फुलांच्या बागा आहेत.
मंदिराचे वैभव, तिथल्या परंपरा या लोकांच्या नजरेतून सुटल्या नाही. त्यामुळे अनेक प्राचीन यात्री, प्रवासी यांच्या प्रवास वर्णनांमध्ये मूलस्थान येथील सूर्य मंदिराचा उल्लेख येतो. इ.स. ११ व्या शतकात अल बिरूनी याने देखील मुलतानला भेट दिली होती, त्यानेही या मंदिराच्या वैभवाचे वर्णन केले आहे. इथल्या मूर्तीला माणिक या मौल्यवान रत्नांचे डोळे बसवले आहेत, असं उल्लेख तो करतो. काळाच्या ओघात तत्कालीन राजवटींमध्ये या मंदिराचे अस्तित्व जीर्ण होत गेले. आणि आज काही पडक्या विटा एकमेकांना धरून उभ्या आहेत इतकचं.