कूडियाट्टम् केरळ ह्या प्रांतामधील प्राचीन संस्कृत नृत्यनाट्य प्रकार आहे. ही भारतामधील सर्वात प्राचीन जिवंत नाटक परंपरा म्हणता येईल. कूडियाट्टम् हे नृत्य-नाट्य म्हणजे अभिजात संस्कृत आणि केरळमधील स्थानिक परंपरा ह्यांना जोडणारा एक धागा आहे.
साधारण 9 व्या शतकात ही नृत्यशैली केरळमधील सर्व मंदिरांमध्ये बघायला मिळते. कूडियाट्टम् ची लोकप्रियता, त्याचे नाट्यमय सादरीकरण आणि प्रसार पुढे इ.स.15 शतकापर्येंत बघायला मिळतो. कूडियाट्टम् ह्याचा शब्दशः अर्थ होतो एकत्रित अभिनय करणे. ह्या शैलीत नेत्र अभिनय आणि हस्त अभिनयाला अधिक महत्व असते.
कूडियाट्टम्, मधील पुरुषांच्या भूमिका चाक्यार जातीचे लोकं करतात. तर स्त्रियांच्या भूमिका नांगियार जातीच्या स्त्रिया करतात.
कूडियाट्टम् ह्या संयुक्त नृत्य-नाट्य प्रकारचा विषय हा हिंदू पौराणिक कथांवर आधारलेला असतो. ह्याचे सादरीकरण 6 ते 12 दिवस चालू शकते. हे मंदिराच्या नाट्यगृहात सदर केले जाते. मंदिराच्या ह्या भागास कूठ्ठबलम् किंवा कूठ्ठपलम असे म्हणतात.
ह्या सादरीकरणात मुख्य पात्र, त्याचे विचार आणि भावना ह्या केंद्रस्थानी असतात. कलाकार त्याच्या स्वतःच्या श्वासावर, शरीरावर असलेला ताबा आणि त्यासोबत चेहऱ्यावरील हावभाव ह्यांवर ते सादरीकरण होते.
सादरीकरणाच्या वेळी नाट्यगृहात पवित्र वातावरण ठेवले जाते. मोठ्या समयांचा प्रकाश ह्या सदरीकरणाची शोभा अधिक वाढवतो. ह्या शैलीमध्ये पारंगत होण्यासाठी कलाकारांना 10 ते 15 वर्ष ह्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यावे लागते.
इ.स 19 व्या शतकानंतर मात्र ह्या प्राचीन कलापरंपरेचे आश्रयदाते कमी झाल्याने कूडियाट्टम् चे अस्तित्व धोक्यात आले. परंतु 2008 साली ह्या नृत्य-नाट्य प्रकाराला युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये स्थान प्राप्त झाले. त्यामुळे आता जगभरात ह्या परंपरेला प्रसिद्धी मिळाली आहे.
भारताच्या अमूर्त वारश्याच्या पुढच्या भागात हिमाचल प्रदेशातील साजरा केला जाणारा धार्मिक सण रम्मन विषयी माहिती बघू.
(क्रमशः)
Photo Credits : UNESCO
2 thoughts on “कूडियाट्टम्, संस्कृत रंगभूमी”