हर्ष, उल्हास, आनंद यांचे दुसरे नावं म्हणजे वसंतोत्सव. भारतीय उत्सव म्हणजे आपल्या संस्कृतीच्या लौकिक अंगाचे उत्स्फूर्त दर्शन घडवणारे क्षण. निसर्गाच्या विलोभनीय सौंदर्याची उधळण करत ऋतुराज वसंत येतो. या वसंताचे पहिले पाऊल पडते ते वसंतपंचमीला. मकर संक्रमणानंतर माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला वसंत ऋतूचे शुभागमन होते. या वसंतपंचमीचे वेगवेगळे पैलू आपल्या जीवनात चैतन्य आणि उल्हासाचे रंग भरतात. सृष्टी सौंदर्याने मोहित होऊन, विधात्याच्या सौंदर्यशक्तीच्या कल्पनेत रमणारी ही आपली संस्कृती आहे. निसर्गाच्या नव्या रूपातून मिळणारा हा आनंद मनुष्याच्या सुखाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे स्वाभाविकच, अश्या उत्सवांना एक लौकिक महत्त्व प्राप्त होते. आजच्या युगामध्ये आपण ही नवचैतन्याची दोर मागे टाकत आहोत.
ऋतुचक्रातील वसंत म्हणजे ऋतूंचा राजा. ऋग्वेदामध्ये वसंत, ग्रीष्म आणि शरद हे तीन ऋतू येतात. पुढे वसंत, ग्रीष्म, शरद आणि हेमंत, शिशिर किंवा वर्षा अशी पाच ऋतूंची संकल्पना विकसित झालेली दिसते. शतपथ ब्राह्मण, यजुर्वेद यांसारख्या वाङ्मयातून ऋतू वर्णने येतात. वाल्मिकी रामायणात वसंत ऋतूची सुंदर वर्णने येतात. निसर्गाशी माणसाचे असलेले अतूट नाते या ऋतूंच्या वर्णानातून अनेकदा अभिव्यक्त होताना दिसते.
वसंतोत्सव तीन सूत्रांमध्ये गुंफल्यासारखा आहे. वसंतपंचमीला ‘श्रीपंचमी’ म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा जन्मदिवस म्हणून श्रीपंचमीचे महत्त्व आहे. याच दिवशी ज्ञान आणि कलेची देवता, सरस्वतीचेही पूजन केले जाते. लहान मुलांचा विद्यारंभ या तिथीपासून केला जातो. ऋतूबदलांमुळे निर्माण होणाऱ्या भावभावनांचे प्रतिबिंब या उत्सवामधून डोकावते. त्यामुळे पारिवारिक समृद्ध जीवनासाठी लोकं मदन-रतीचे पूजन करतात. माघ-फाल्गुन हे शेतकऱ्यांच्या दुसऱ्या सुगीचे दिवस असतात. मातीची ऊर्जा टपोऱ्या कणसातून दिसायला लागते. आंब्याचा मोहर, त्याचा उग्र मादक वास दरवळायला सुरु होतो. शेत शिवारांमधून समृद्धीच्या लाटा वाहत राहतात आणि आपण सर्वही त्या आनंदाच्या डोहात तरंगतो. एकूणच नवचैतन्याची चाहूल लागते ती वसंतपंचीमीपासून, आणि सुरु होतो तो वसंतोत्सव.
फाल्गुन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या वसंतोत्सवाचे अनेक उल्लेख आपल्याला प्राचीन साहित्यांतून आणि शिल्पांतून दिसतात. सुवसंतक उत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, दोला, नाटक असे अनेक उत्सव आणि क्रीडा या वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून साजरे होत असत. निसर्ग काया परिवर्तनाची अनुभूती देणारा हा वसंतोत्सव, कवी मनालाच नाही तर चित्रकार, शिल्पकार, नृत्य-संगीत-नाट्य कलाकारांना भुरळ घालणारा विषय ठरला. त्यामुळे अनेक कलाकृतींमधून या उत्सवाचे दुवे सापडतात. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ जनसामान्य, सुवसंतक उत्सव साजरा करतात, असा उल्लेख वात्सायन कामसुत्रामध्ये येतो. या सुवसंतक उत्सवात लोकं नृत्य-संगीतात तल्लीन असतात. भास रचित चारुदत्त नाटकामध्येही कामदेव पूजन पर्वाचा उल्लेख येतो.
कुषाण काळापासून भारताचा पूर्व आणि पश्चिम देशांशी व्यापार वाढला होता. स्वाभाविकच हा काळ म्हणजे देशामध्ये आर्थिक सुब्बता नांदत होती. त्यामुळे ऐहिक जीवनाचा दर्जा उंचावून लोकांचा कल, विलास आणि कला यांमध्ये रममाण होणारा होता. त्यामुळे या काळापासून ललितकला आणि वाङ्मय यांना बहर आला. या कलाकृतीतून तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन आपल्याला घडते. कवी कुलगुरू कालिदास, श्रीहर्ष यांच्या संस्कृत नाटकांतून, काव्यांतून या उत्सवांचे वर्णन आले आहे. कालिदासकृत अभिज्ञानशाकुंतल मध्ये मदनोत्सवाचे वर्णन येते. कामदेवास आंब्याचा मोहर अर्पण करून त्याचे पूजन होत असे, असा उल्लेख येतो.
ऋतूसंहार या काव्यातून कालिदासाने ऋतूंचा सोहळा साक्षात उभा केला आहे. या ऋतू बदलाचा पशुपक्ष्यांवर आणि मानवी भावभावनांवर होणारा परिणाम या काव्याच्या रूपाने अनुभवता येतो. वसंत हा मदनाचा सखा, त्यामुळे वसंतागमन आणि मदनोत्सव यांचे स्वाभाविकच दृढ नाते स्पष्ट होते. ऋतूसंहार या काव्यामध्ये कालिदास वसंत ऋतूला योद्ध्याची उपमा देतो. वसंत ऋतूच्या निसर्गाच्या सौंदर्याचे वर्णन पुढील श्लोकातून व्यक्त होते.
द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मं स्त्रियः सकामाः पवनः सुगन्धिः ।
सुखाः प्रदोषा दिवसाश्च रम्याः सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते ।। ऋतू. (६.२)
वसंत ऋतूमधील फुलांनी लगडलेले वृक्ष, कमळपुष्पांच्या सानिध्यात मोहक दिसणारी जलाशय, वाऱ्यासोबत पसरणारा मोहराचा मादक सुगंध, प्रणयतूर ललना, सकाळचा तेजस्वी सूर्य आणि सुखकर, रमणीय संध्या असे लालित्यपूर्ण अवलोकन कालिदासाच्या काव्यातून दिसते. वसंत वायूचे विलोभनीय अस्तित्व कालिदासाच्या काव्यातून शब्दाकार घेऊन अवतरीत होते.
आकम्पयन्कुसुमिताः सहकारशाखा विस्तारयन्परभृतस्य वचांसि दिक्षु ।
वायुर्विवाति हृदयानि हरन्नराणां नीहारपातविगमात्सुभगो वसन्ते ।। ऋतू. (६.२४)
धुके नाहीसे झाल्यामुळे सुखकर वाटणारा वायू आम्रशाखा हलवीत, कोकिळांचे आलाप सर्व दिशांत पसरवित, जनांची अंतःकरणे आकर्षित करीत वाहत आहे.
अभिजात संस्कृत साहित्यामधून अशोकोत्सव संदर्भात रोचक माहिती मिळते. अशोकोत्सव हा वसंतोत्सवाचा एक भाग म्हणून साजरा होते असे. रूपवती लावण्याच्या पदस्पर्शाने अशोक वृक्ष मोहरतो, अशी लोकमानसात प्रथा प्रचलित होती. इतकेच नव्हे तर मोहरलेल्या अशोकाचे दर्शन सुद्धा शुभ मानीत असत. याची साक्ष कालिदासकृत मालविकाग्नीमित्र या नाटकामधून होते. दोला हाही वसंत उत्सवाचा भाग होता ज्यात लोकं आनंदाने सहभागी होत. दोला म्हणजेच झोका, आपण त्याला हिंदोळा म्हणतो. प्रियजनाच्या सहवासात हिंदोळा झुलणे, माणसाच्या मनामध्ये बहरलेल्या अनुरागाचे दर्शन घडवतो.
धार्मिक अनुष्ठानांपेक्षा हे उत्सव मनोरंजन आणि लोकरंजन म्हणून अधिक व्यक्त होत असत. त्यामुळे नृत्य, संगीत, नाटक, क्रीडा यांचा मनमुराद आनंद या उत्सवातून प्रतीत होत असे. वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून, रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढण्यात येते. महाराष्ट्र आणि राजस्थानात रथसप्तमी साजरी करतात. राजस्थानमध्ये रथसप्तमीला भानुसप्तमी असेही म्हणतात.
एकूणच निसर्गाच्या रुपामध्ये वसंत आगमन, मनुष्याच्या आयुष्यात नवी उर्मी, नवा उत्साह, नवी प्रेरणा घेऊन येते. सरस्वती साधकास विद्यार्जनास सुरुवात करून ज्ञानामृताचा संचय करता येतो. श्रीलक्ष्मीच्या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे ऋतुराज वसंत म्हणजे ज्ञान, समृद्धी आणि सुखाचे त्रिवेणी सूत्र आहे.
One thought on “वसंतोत्सव- निसर्गाच्या नवलाईचा सोहळा”