नवरस आणि देवी शिल्पे
महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः |
महामोहा च भवती महादेवी महासुरी ||
देवी स्वरूपा म्हणजे तिच्यातील विविध तत्त्वांचे साक्षात दर्शन आपल्याला घडते. कधी ती निसर्ग रूपात अवतरणारी प्रकृतीरूपा असते तर कधी ती असुरांचे निर्दालन करणारी दुर्गा असते. महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृति, महामोहा अश्या विविध रूपांमध्ये तिची कल्पना केली आहे. भारतीय शिल्पकलेमध्ये देवीच्या सौम्य, रौद्र, उग्र, भयानक अश्या सर्वच स्वरूपात अभिव्यक्ती झाली आहे. नवरस आणि देवी शिल्पे ही लेखमाला म्हणजे याच नवरसयुक्त नऊ देवी स्वरूपांचा जागर आहे.
भारतीय संस्कृति ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुःसूत्रीने गुंफलेली आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजाने तात्त्विक, अध्यात्मिक, कलात्मक मूल्यांचा समृद्ध वारसा जपला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही बिंदुना स्पर्श करणारे सौंदर्यमूलक सूत्र म्हणजे प्राचीन भारतीय कला. कला ही एक अशी अभिव्यक्ती आहे जिच्या माध्यमातून कलाकार त्याचे आत्मज्ञान, चिंतन आणि कौशल्य यांच्या आधारे संकल्पनांना यथार्थ रूपामध्ये साकार करत असतो. ही कलाकृती म्हणजे कलाकाराची भावप्रेरीत सृजनात्मक कल्पना असते.
तत्कालीन समाजाची रूपकात्मक अभिव्यक्ती म्हणजे कला. भारतीय कलेमध्ये केवळ व्यक्तीच्या देहाची नव्हे तर त्याच्या जीवनमूल्यांची रूपके अंकित झाली आहेत. अमूर्त संकल्पनांना कलेच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात साकार करताना कलाकाराने त्याच्या कलाकृतीमागे तात्विक चिंतन, सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक अभिव्यक्ती या तीनही अंगांचा समतोल साधण्याच्या प्रयत्न केला आहे, जो आज उपलब्ध असलेल्या कलावशेषांच्या रूपात आपल्या समोर आहे.
आनंद कुमारस्वामी यांच्या मते भारतीय परंपरेत तत्त्वज्ञ कलेपेक्षा, सौंदर्य सिद्धांतांवर अधिक विस्तृत आदानप्रदान करतात. त्यांच्या मते सौंदर्य किंवा रस ही एक अवस्था आहे. कला समीक्षक म्हणजेच रसिक हे ठरवू शकतात की कोणत्या प्रकारची कलाकृती ही सुंदर किंवा रसवंत आहे. या सौंदर्याची अनुभूती कलाकार प्रत्यक्ष कलाविष्कार साकारताना अनुभवत असतो. ती कलाकृती पूर्णत्वाला गेली की रसिक त्या कलेतील सौंदर्याला पुन्हा एकदा अनुभवतो.
वात्स्यायन विरचित ‘कामसूत्र’ या ग्रंथाच्या टीकेत यशोधारने, आलेख्य म्हणजेच चित्रकर्म याची सहा अंगे सांगितली आहेत.
रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्।।
रूपभेद म्हणजे आकार, प्रमाण म्हणजे अनुपातिक माप, लावण्य म्हणजे सौंदर्य, भावयोजना अर्थात रसाभिव्यक्ती, सदृश्य म्हणजे मूळ विषयाशी साम्य आणि वर्णिकाभंग म्हणजे रंग योजना. त्यामुळे लावण्य निर्मितीसाठी सौंदर्य आणि रसनिर्मितीसाठी भाव या दोनही गोष्टी चित्रकला, शिल्पकला यामध्ये कलाकृती साकारताना महत्त्वाच्या ठरतात.
याशिवाय कलादृष्टीने महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे इ.स. 7 व्या शतकात संकलित झालेले विष्णुधर्मोत्तरपुराण. यातील अधिकांश भाग हा कला विषयातील शास्त्रोक्त मांडणीला समर्पित केला आहे. छन्दशास्त्र, काव्यशास्त्र, नृत्य-संगीत, वास्तु, शिल्प आणि चित्रकला यांचे विस्तृत विवेचन विष्णुधर्मोत्तरपुराणातून संकलित झाले आहे. रस आणि भाव यांचे वर्णन आणि ते निर्माण करण्याच्या निर्देश श्लोकबद्ध केले आहेत.
शृङ्गारहास्यकरुणवीररौद्रभयानकाः |
वीभत्साद्भूतशान्ताश्च नव चित्र रसाः स्मृताः ||
– चित्रसूत्र 43.1
या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने भारतीय शिल्पकारांनी देवी स्वरूपात शिल्पबद्ध केलेल्या या नवरसांचा आढावा या लेखमालिकेतून मी प्रस्तुत करीत आहे. पुढील भागात उमा महेश्वर शिल्पातील शृंगार रसाचा परामर्श घेऊया.
8 Responses
[…] नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस म्हणजे शृंगार रस. रससिद्धांतामध्ये सर्वात प्रथम स्थानी येतो. भावनांचा अधिपती संबोधल्यामुळे या शृंगार रसाला ‘रसराज’ किंवा ‘रसपती’ असे म्हटले आहे. चित्रसूत्र ग्रंथामध्ये शृंगार रसाचे वर्णन पुढील श्लोकात येते – […]
[…] नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेत आत्तापर्यंत आपण, उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून शृंगार रस आणि मागच्या लेखातून सप्तमातृका पटातील हास्य रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्प आणि करुण रस याची माहिती घेऊया. […]
[…] शिल्पांमधून अभिव्यक्त केले आहे. नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत पूर्वी प्रस्तुत […]
[…] नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेतील पहिला रस शृंगार जो उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमधून आपण अनुभवला. कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका पटामध्ये हास्य रस बघितला. देवीच्या त्रिपुरा या रूपातून करूण रसाची अनुभूती घेतली. क्रोधाने रौद्र रूप धारण केलेल्या कालीचे स्वरूप बघितले. महिषासुरमर्दिनीच्या रूपात वीर रसातील उत्साह अनुभवला. या लेखामध्ये देवीच्या काली स्वरूपातील दुसऱ्या शिल्पातून व्यक्त होणारा भयानक रस आपण बघणार आहोत. […]
[…] नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत आत्तापर्यंत शृंगार रस, हास्य रस, करूण रस, रौद्र रस, वीर रस आणि भयानक रस यांची देवीच्या विविध शिल्पांमधील अभिव्यक्ती बघितली. या भागात बीभत्स रसाची देवीच्या शिल्पामधील स्वरूप बघणार आहोत. […]
[…] शिल्पातील शांत रसाचा परामर्श घेऊन नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेला पूर्णविराम देऊ. adbhuta […]
[…] नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक , बीभत्स आणि अद्भुत रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखामालेत केले. नवरसातील शेवटचा पण महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस. भारतीय परंपरेत मोक्षप्राप्तीचा राजमार्ग या रसाद्वारा शिल्पांमधून अभिव्यक्त होत आला आहे. भरतमूनींच्या मते सर्वरसांची परिणीती अखेर शांत रसातच होते. त्यामुळेच आचार्य अभिनवगुप्तही शांत रसाला सर्वश्रेष्ठ मानतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुःसुत्रीतील अंतिम चरण म्हणजे मोक्ष साधन. त्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय आहे म्हणजेच मोक्षप्राप्ती तेच शांत रसाचे लक्ष्य आहे. त्यामुळे शांत रसाचे महत्त्व अधिक वाढते. […]
[…] नवरस आणि देवी शिल्पे […]