मागच्या भागात उमा महेश्वर यांच्या आलिंगन मूर्तीमधून आपण शृंगार रसाची अभिव्यक्ती जाणून घेतली, या भागामध्ये देवी शिल्पातील हास्य रसयुक्त अभिव्यक्ती बघूया.
रससिद्धांतामध्ये, हास हा स्थायीभाव असेलला दुसरा रस म्हणजे हास्य रस. यामध्ये वेशभूषा , केशरचना, अलंकार यांच्यामधील विकृती म्हणजे जे असायला हवे त्याच्या विपरीत असेल तर त्यातून हास्य निर्मिती होते. त्यामुळे हास्य रसाचे विभाव हे साधारण मानले आहेत. आचार्य श्रीशंकुक यांच्या मते हास्य रसाची दोन प्रकारामध्ये विभागणी करता येते. एक म्हणजे स्वतः हसणे ज्याला आत्मस्थ किंवा स्वसमुत्थ हास्य असे म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे काही कृतींच्या आधारे दुसऱ्यांना हसवणे ज्याला परस्थ किंवा परसमुत्थ हास्य असे म्हणतात. देवी शिल्पांमध्ये हास्य रसाची अभिव्यक्ती परस्थ हास्य स्वरूपात आपण बघणार आहोत. नाट्यशास्त्रानुसार हास्य रसाचे विश्लेषण पुढील श्लोकातून केले आहे-
विपरीतालङ्गरैर्विकृताचाराभिधानवेषैश्च |
विकृतैङ्गविकारैर्हसतीति रसः स्मृतो हास्यः||
अपेक्षित अलंकारांना सोडून वेगळेच अलंकार, वेगळ्याच पद्धतीने धारण करणे, विकृत वागणे, अंगविक्षेप यांमुळे हास्य रस उत्पन्न होतो.
शिल्पशास्त्रातही हास्य रसाची अभिव्यक्ती अतिशय समर्पक केली आहे. चित्रसूत्रानुसार हास्य रस पुढील श्लोकातून सांगितला आहे –
यत्कुब्जवामनप्रायमीषद्विकटदर्शनम् |
वृथा हि हस्तसंकोचं तस्याध्दास्यकरं रसे ||
हास्य रस निर्मितीसाठी कुबड असलेल्या, बुटक्या किंवा काही अंशी विचित्र दिसणारे व्यक्तिचित्रण करावे. कारण नसताना हाताच्या मुठी वळणे हे देखील हास्य रसाचे कारण ठरते असा या श्लोकाचा अर्थ आहे.
भारतीय शिल्पांमध्ये, अनेक मंदिरांत आणि त्यांच्या बाह्यभिंतींवर शिवाचे ठेगण्या स्वरूपाचे, बुटके आणि विचित्र चेहऱ्याचे गण शिल्पांकित केलेले दिसतात. त्यांच्या चेष्टा, अंगविक्षेप हे शिल्प बघणाऱ्या रसिकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतात. देवी शिल्पांचा विचार केला तर हास्य रस निर्मिती क्वचित म्हणावी लागेल, परंतु शिल्पकारांची कल्पकता आणि त्यातून निर्माण होणारा हास्य रस दुर्लभ आहे. कांची येथील कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका शिल्पपट या कल्पकतेची साक्ष देतो.
सप्तमातृका, कैलासनाथ मंदिर
कांची येथील कैलासनाथ मंदिर, नरसिंह वर्मन 2 म्हणजेच राजसिंह पल्लव या राजाने बांधले आहे. इ.स.7-8 व्या शतकातील या मंदिरावर सप्तमातृकांचा एक शिल्पपट आहे. इ.स. पहिल्या शतकापासून सप्तमातृका शिल्पांचा आढळ भारतभर आहे. मध्यायुगामध्ये या सप्तमातृकांचा आढळ अधिक होण्यास सुरुवात झाली असे दिसते. त्यांचा उद्भव आणि त्यांच्या निर्मितीच्या कथा अनेक स्मृतीग्रंथ, मत्स्यपुराण, देवीपुराण, स्कंदपुराण, मार्कंडेयपुराण आणि वराहपुराण आदि पुराणांतून तसेच सुप्रभेदागम, अंशुमतभेदागम, पूर्वकारणागम या आगम तर प्रपंचसार, योगिनीहृदय, स्वच्छंदतंत्र यासारख्या तंत्र साहित्यातून येतात. मत्स्यपुराणानुसार या मातृकांचा उद्भव अंधाकासुर वधाच्या वेळी शिवापासून झाला, असा उल्लेख आहे. परंतु वामन पुराणानुसार चंडिकेच्या शरीरातून या मातृकांचा उद्भव झाला आणि तिच्यातच त्या पुन्हा विलीन झाल्याचा उल्लेख येतो.
सप्तमातृकांचे मूळ स्वरूप आणि शिल्पकाराने दाखवलेले स्वरूप त्यात निर्माण झालेल्या फरकामुळे या शिल्पपटामधून हास्य रस निर्मिती होते. या मातृकांचे मूळ स्वरूप बघितले तर या असुरांचे निर्दालन करणाऱ्या युद्ध भूमीवर उद्भवलेल्या शक्ती आहेत. ब्रह्मदेवाची ब्राह्मी, महेश्वराची माहेश्वरी, कार्त्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, इंद्राची इंद्राणी आणि कात्यायनी देवीच्या भृकुटीतून चामुंडा देवी यांचा उद्भव झाला आहे. ईशानाशिव गुरुदेव पद्धत्तीमध्ये सप्तमातृकांना योगरूपा म्हणजेच अक्षमाला घेतलेल्या, योग साधनेत बसलेले दाखवण्याचे निर्देश आहेत.
कैलासनाथ मंदिरातील सप्तमातृका पटामध्ये ब्राम्ही, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा या मातृका शिल्पांकित केल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर छत्र आहे. या पटाकडे डावीकडून बघायला सुरुवात केली तर सर्वप्रथम ब्राम्हीचे अंकन केले आहे. ब्राम्ही देवी चक्क तिचा एक पाय माहेश्वरी देवीच्या मांडीवर टाकून निवांत बसलेली शिल्पकाराने दाखवली आहे. माहेश्वरी आणि कौमारी देवी, वैष्णवी कडे बघत आहेत. वाराही आणि इंद्राणी यादेखील वैष्णवीकडे बघत आहेत. कौमारी आणि वाराही एक पाय निवांत दुसऱ्या पायावर ठेऊन बसल्या आहेत. मध्यस्थानी बसलेल्या वैष्णवी देवीच्या मागे असलेले प्रयोग चक्र आणि शंख बघण्यासारखे आहेत. मातृकांच्या बसण्याच्या पद्धतीतील विक्षेप, शिल्प बघणाऱ्याचे सहज लक्ष वेधून घेतो. त्यामुळे एकूणच हा शिल्पपट सप्तमातृकांमधील त्यांच्या मूळ स्वभाव धर्माच्या विपरीत, भावदर्शन देत असल्याने येथे परस्थ हास्य रस निर्माण झाला आहे.
पुढील भागात देवी शिल्पातील करुण रसाचा परामर्श घेऊया.
9 thoughts on “हास्य रस – सप्तमातृका : नवरस आणि देवी शिल्पे”