नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक , बीभत्स आणि अद्भुत रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखमालेत केले. नवरसातील शेवटचा पण महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस. भारतीय परंपरेत मोक्षप्राप्तीचा राजमार्ग या रसाद्वारा शिल्पांमधून अभिव्यक्त होत आला आहे. भरतमुनींच्या मते सर्व रसांची परिणीती अखेर शांत रसातच होते. त्यामुळेच आचार्य अभिनवगुप्तही शांत रसाला सर्वश्रेष्ठ मानतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुःसुत्रीतील अंतिम चरण म्हणजे मोक्ष साधन. त्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजेच मोक्षप्राप्ती, तेच शांत रसाचे लक्ष्य आहे. त्यामुळे शांत रसाचे महत्त्व अधिक वाढते.
न यत्र दुःखं न सुखं न चिन्ता न द्वेषरोगौ न च काचिदिच्छा|
रसः स शान्तः कथितो मुनीन्द्रैः सर्वेषु भावेषु समप्रमाणः||
ज्या ठिकाणी सर्व भाव-भावनांचे समत्व साध्य झाले आहे, म्हणजेच ज्या ठिकाणी सुख, दुःख, चिंता, राग, द्वेष, इच्छा असे काहीही शिल्लक राहिले नाही त्याला शांत रस म्हणतात.
शमस्थायिभावात्मको मोक्षप्रवर्तकः|
भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात शम हा शांत रसाचा स्थायीभाव म्हटले आहे. त्यामुळे स्वाभाविकच शांत रसाची उत्पत्ती तप आणि योगीसंपर्क, वैराग्य, चित्तशुद्धी यांसारख्या विभवातून होते.
मोक्षाध्यात्मसमुत्थस्तत्त्वज्ञानार्थहेतुसंयुक्तः |
नैःश्रेयसोपदिष्टः शान्तरसो नाम सम्भवति ||
मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक असते ते अध्यात्मिक ज्ञान. या अध्यात्मिक ज्ञानातून शांत रस उत्पन्न होतो. तत्त्वज्ञानामध्ये असलेला सहेतूक अर्थ म्हणजेच निर्वेद आणि मोक्षज्ञानासाठी सांगितलेली वचने या सर्वांमध्ये शांत रसाचा अंतर्भाव असतो. त्यामुळे इतर आचार्यांच्या मते निर्वेद, शांत रसाचा स्थायीभाव मानला आहे. तर काही आचार्यांनी जुगुप्सा, उत्साह, धृती यांना शांत रसाचा स्थायीभाव मानले आहे.
विष्णूधर्मोत्तर पुराणातील चित्रसूत्र, शांत रसाची व्याख्या पुढीलप्रमाणे करते –
यद्दत्सौम्याकृतिध्यानधारणासनबन्धनम् |
तपस्विजनभूयिष्ठं तत्तु शान्तरसे भवेत् ||
कृतींमधून सौम्यता, ध्यान धारण करण्याची योगिक स्थिती, तपस्वी लोकांप्रमाणे चेहऱ्यावरील शांत आणि सौम्य भाव, शांत रस अभिव्यक्त करतात.
भारतीय परंपरेतील अनेक शिल्पे, शांत रसानुभूत देणारी आहेत. बुद्ध, जैन तीर्थंकर, विष्णू-शिव यांसारख्या हिंदू देवतांचे योग साधनेतील अनेक विग्रह या शांत रसाचे परिचारक आहेत. देवी शिल्पांमध्येही सरस्वती, ब्राह्मी, ललिता यांसारख्या अनेक देवी विग्रहातून शांत रसाचे ग्रहण करता येते. पण आपण बघणार आहोत ते देवीचे सर्वमंगला हे स्वरूप.
सर्वमंगला
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ||
सर्वांचे मंगल करणारी मांगल्या, जी स्वतः मंगलमयी आहे, जी तिच्या भक्तांचे साध्य सफल करते, अश्या त्या नारायणीला माझा नमस्कार असो. दुर्गा सप्तशतीतील हा श्लोक, देवीच्या मंगलकारी स्वरूपाचे स्मरण करणारा आहे.
देवीचे सर्वमंगला हे स्वरूप अत्यंत सौम्य आणि मंगलकारी आहे. सर्वमंगला देवीचा उल्लेख विष्णुधर्मोत्तरपुराण आणि शरभ तंत्रामध्ये येतो. तिची कांती सुवर्णमयी असावी असा उल्लेख आहे. दिव्य आणि उज्ज्वल अलंकारांनी देवीला सजवलेले असावे. चतुर्भुज देवीच्या उजव्या हातामध्ये अक्षमाला असावी तर डाव्या हातामध्ये शक्ती किंवा पाण्याचा कलश असावा, असे वर्णन येते. शरभ तंत्रानुसार सर्वमंगला देवी तिच्या भक्तांना धन-संपत्ती प्रदान करणारी आहे. इथे मात्र तिच्या दोन हातांपैकी एका हाताची अभय किंवा वरद मुद्रा असावी आणि दुसऱ्या हातामध्ये मातुलिंग असावे असा उल्लेख येतो. ती सिंहावर बसलेली दाखवतात. क्वचित सुंदर अश्या कमळावर ती बसलेली दाखवतात. वास्तूविद्या दीपार्णव या ग्रंथामध्ये सर्वमंगला देवीला, सरस्वती देवीच्या स्वरूपापैकी एक मानले आहे. त्यामुळे सरस्वती देवीप्रमाणे तिचे वर्णन येते.
वस्त्रालंकार संयुक्ता सुरूपा म्हणजेच वस्त्र आणि अलंकारांनी जिचे स्वरूप अतिशय सुंदर दिसत आहे. सुप्रसन्न्ना म्हणजेच जी स्वतः प्रसन्न वदना आहे. सुतेजाक्षा म्हणजे जी स्वतः तेजाने परिपूर्ण आहे ,अशी ती देवी म्हणजे सर्वमंगला.
ओडिशा मध्ये इ.स. 12 शतकातील या देवी शिल्पामध्ये सर्वमंगला देवी ललितासनात म्हणजे एक पाय खाली सोडून आणि दुसरा दुमडून, कमळावर बसलेली आहे. तिच्या पीठाखाली सिंह शिल्पांकित केला आहे. देवीच्या मागच्या हातामध्ये अक्षमाला आणि कमळ आहे. पुढचा एक हात भक्तांना अभय प्रदान करणारा आहे, तर दुसऱ्या हातामध्ये छोटा पाण्याचा गडू किंवा कमंडलू आहे. तलम, अशी रेशमीवस्त्रे तिने धारण केली आहेत. सर्व उज्ज्वल असे अलंकार तिने धारण केले आहेत. डोक्यावर जटामुकुट आहे. मस्तकावर त्रिनेत्र आहे. सर्वमंगला देवीच्या या शिल्पात तिचा मुखावर हलके स्मित आहे, त्यामुळे चेहऱ्यावरील सौम्य भाव सहज दिसतोय. तिचे अर्धोन्मीलित म्हणजे अर्धे झाकलेले डोळे शांत रसाची अनुभूती देत आहेत. सर्वमंगला देवीच्या शिल्पातील शांत रसाच्या अभिव्यक्तीने मोक्षप्राप्तीचा राजमार्ग समृद्ध केला आहे, गरज आहे ती फक्त योग्य दृष्टीची, जी ही अभिव्यक्ती समजावून देऊ शकेल.
One thought on “शांत रस – सर्वमंगला : नवरस आणि देवी शिल्पे”