भगवान शिव म्हणजे परमतत्त्व. या परमशिवाचे तत्त्वरूप अत्यंत व्यापक आणि कल्याणकारी आहे. शिवस्वरूप म्हणजे खरतरं निष्कलं निष्क्रियं शान्तं निरवद्यं निरञ्जनम् असे आहे. शिव तत्त्वाचा अर्थबोध शब्दांच्या परीघा पलीकडे जाऊन चित्ताला तुष्टी देणारा आहे.
भगवान शिवाला शिवो गुरुः शिवो वेदः शिवो देयः शिवः प्रभुः म्हणताना, प्रथम गुरु म्हणून संबोधले आहे. सर्व शास्त्र, विज्ञान, विद्या आणि कला यांचा विस्तार हा शिवाने केला आहे. त्यामुळे योगीजन, आचार्य आणि कलासाधक या सर्वांनाच शिवाचे हे गुरुस्वरूप परम वंदनीय आहे. याच आदिगुरु भगवान शिवाचे साकार स्वरूप म्हणजेच महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती.
आज गुरुपौर्णिमा, गुरुस्वरूप दक्षिणामूर्तीचे मूर्तीशास्त्रामधून उलगडणारे प्रतिमा स्वरूप आणि चिंतन परंपरेतील महानन्दस्वरूप तत्त्वरूप, मी यथाशक्ती यथामती शब्दबद्ध करीत आहे. आजच्या स्वाध्याय सुधाचे हे दहावे सूत्र महानन्दस्वरूप दक्षिणामूर्ती मी माझ्या गुरूंना सविनय अर्पण करीत आहे.
मूर्तीस्वरूप दक्षिणामूर्ती
गुरुरूप हे या दक्षिणामूर्ती स्वरूपाचे सत्वरूप आहे, असे मला वाटते. सर्व शास्त्र, कला, तत्त्व यांचे ज्ञान प्रदान करणारा हा विग्रह आहे. दक्षिणामूर्तीच्या साकार स्वरूपातील विविध प्रतिमा, या अनेक देवालयांमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
वास्तूशास्त्र, शिल्पशास्त्र आदि ग्रंथ, आगमशास्त्र हे दक्षिणामूर्ती स्वरूप जाणून घेण्यास सहाय्यक ठरतात. मूर्तिशास्त्रामध्ये सामान्यतः व्याख्यान, ज्ञान, वीणाधार आणि योग दक्षिणामूर्ती अश्या चार दिव्य रूपांमधील विग्रह अभिव्यक्त होताना दिसतात.
दक्षिणामूर्ती प्रतिमा या मुख्यत्वे आसनस्थ स्थितीत दक्षिणाभिमुख स्वरुपाच्या असतात. क्वचित समपाद स्थानक म्हणजे उभ्या स्थितीतील दक्षिणामूर्तीही मंदिरांच्या गोपुरांवर दिसतात. वटवृक्षाखाली आसनस्थ दक्षिणामूर्ती ही सुखासनामध्ये किंवा विरासनामध्ये आसनस्थ अशी असते. शिवाचा एक पाय अपस्मार पुरुषाच्या पाठीवर स्थिरावलेला असतो.
दक्षिणामूर्तीचा शिरोभाग हा जटामुकुट, जटाभार किंवा जटामंडलयुक्त असतो. हा जटाभार सर्प, धोत्र्याचे फुल आणि द्वितीयेची चंद्रकला यांनी सुशोभित असतो. त्रिनेत्र दक्षिणामूर्ती चतुर्भुज असून तिच्या विग्रहानुसार हातांमधील लांछने बदलतात. हातामधील लांछनांचा क्रम आणि प्रकार हा अनेकदा शैलीवरही अवलंबून असतो. प्रतिमांप्रमाणेच वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये हा फरक दिसतो.
दक्षिणामूर्ती शिवाची कांती स्फटिकाप्रमाणे नितळ आणि तेजस्वी असते. त्याच्या चर्येवर सौम्य, आनंदयुक्त आणि सात्विक भाव असतो.
पंचमुद्रा समोपेता म्हणजे पाच अलंकारयुक्त असावा. या पाच मुद्रा म्हणजे मस्तकावर शिखामणी, गळ्यात रुद्राक्षाची कंठामाळ, कानामध्ये कुंडले, हातामध्ये आणि दंडामध्ये रूचक आणि ह्रन्माला किंवा मेखला. दक्षिणामूर्ती व्याघ्रचर्म परिधान केलेली असते याशिवाय सितवस्त्रोत्तरीयं च सितयज्ञोपवीतिनम् म्हणजे शुक्ल उत्तरीय आणि शुक्ल यज्ञोपवीत धारण केलेली असते.
दक्षिणामूर्ती ही ज्ञानदक्षिणा देणारे स्वरूप असल्याने, शिवाच्या पायाशी वेदवेदांग पारंगत महर्षी, मुनी हे शिष्य बनून ज्ञान ग्रहण करण्यासाठी बसलेले दर्शवतात. शिवाचे वाहन नंदी, हाही हे ज्ञान ग्रहण करण्यास बसलेला दाखवतात.
हे दिव्यज्ञान समस्त विश्वातील चराचरांना मुक्तीप्रदान करणारे असल्याने पशु – पक्षी, वनचर हे दक्षिणामूर्तीला शरण आलेले दाखवतात. याशिवाय दक्षिणामूर्तीच्या विविध मूर्ती विग्रहामध्ये काही सूक्ष्म भेदही आहेत, ते क्रमशः पाहू.
शिवाच्या या मूर्तींना दक्षिणामूर्ती म्हणण्याचे प्रयोजन काय ? अश्या विग्रहांमधून व्यक्त होणारा सूक्ष्म अर्थ काय ? अश्या विविध बिंदूंचे विश्लेषण दक्षिणामूर्तीचे तत्त्वरूप पाहताना होईलच. तत्त्पुर्वी मूर्तीस्वरूपातील विविध दक्षिणामूर्ती विग्रह जाणून घेऊया.
कामिकागम ग्रथांमध्ये दक्षिणामूर्ती विग्रहाचे तीन प्रकार सांगितले आहेत, ते पुढीलप्रमाणे –
व्याख्यानगेय योगेषु निष्ठस्य त्रिविधस्य च ।
म्हणजे व्याख्यान, गेय आणि योग दक्षिणामूर्ती, या तीन प्रकारच्या दक्षिणामूर्तींचा उल्लेख इथे येतो. तरीही व्याख्यान, ज्ञान, वीणाधार आणि योग या सर्वच दक्षिणामूर्ती आजच्या सूत्रामध्ये जाणून घेणार आहोत.
व्याख्यान दक्षिणामूर्ती
अनेकविध शास्त्रांचे कर्तृत्व हे शिवाचे मानले जाते, त्यामुळे त्या शास्त्रांचे ज्ञान, व्याखानरूपाने दक्षिणामूर्ती शिव प्रदान करत असतो.
धर्मव्याखानमूर्तिः स्यादेवं सर्वशुभावहम्।
शुभता प्रदान करणारी ही व्याखान दक्षिणामूर्ती ही चतुर्भुज असते. उजव्या हाताची व्याख्यान मुद्रा असते म्हणजेच अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जुळवून हाताचा पंजा श्रोत्यांकडे केलेला असतो. याशिवाय उर्वरित हातांमध्ये अक्षमाला, दण्ड आणि वरद मुद्रा असते.
ही धर्मव्याखानदक्षिणामूर्ती म्हटली आहे, त्यामुळे अश्या व्याखान दक्षिणामूर्तींच्या हातामध्ये पोथी किंवा ग्रंथही दाखवले जातात.
ज्ञानदक्षिणामूर्ती
व्याखान दक्षिणामूर्ती प्रमाणेच ज्ञानदक्षिणामूर्ती विग्रह असतो. या विग्रहामध्ये दक्षिणामूर्तीचा एक हात हा ज्ञानमुद्रेमध्ये, हृदय स्थानाजवळ धरलेला असतो. व्याख्यान आणि ज्ञान या दोनही विग्रहातून अभिप्रेत आशय हा समत्वाने अभिव्यक्त होतो. त्यामुळे काही ग्रंथांमध्ये या दोन विग्रहांना स्वतंत्र न मानता व्याख्यान दक्षिणामूर्ती या स्वरुपातच साकार केलेले दिसते.
वीणाधार दक्षिणामूर्ती
वीणावादनतत्त्वज्ञः श्रुती जातिविशारदः।
याज्ञवल्क्यस्मृती मधील शिवस्तुतीमध्ये, शिवाला वीणावादन तत्त्वज्ञ म्हटले आहे. याशिवाय संगीतामध्ये असणाऱ्या 22 श्रुती आणि 18 स्वरजाति यांमध्ये शिव विशारद असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे स्वरांचा स्वामी म्हणून वीणाधर दक्षिणामूर्तीचे स्वरूप संगीत उपासकांसाठी पूजनीय आहे.
वीणाधार दक्षिणामूर्तीलाच आगमशास्त्र गेय दक्षिणामूर्ती असे म्हणते. गेय म्हणजे संगीत. ‘संगीत’ या संज्ञेचा संगीत रत्नाकरमध्ये गीतं वाद्यं तथा नृत्तं त्रयं संगीतमुच्यते असा अर्थ प्रस्तुत होतो.
वीणाधार दक्षिणामूर्ती आसनस्थ आणि समापद स्थानक या दोनही स्थितींमध्ये दिसते. पुढील दोन हातांमध्ये वीणा किंवा एका हातामध्ये वीणा आणि दुसऱ्या हातामध्ये ज्ञानमुद्रा असते. आणि मागच्या दोन हातांमध्ये अक्षमाला आणि उत्पल असते. वीणाधार दक्षिणामूर्ती जवळ महर्षी शुक, नारद, तुंबरू आदि ऋषिगण बसलेले असतात. विद्याधर, किन्नर युगुले ही या वीणाधार मूर्तीच्या ज्ञानदक्षिणेने अनुग्रहित होत असतात.
योगदक्षिणामूर्ती
शिवपुराणामधून येणारा शिवाचा योगाचार्य अवतार सर्वश्रुत आहेच. आद्य योगगुरु म्हणून शिवाचे योगदक्षिणा स्वरूप हे योगाचार्य, मुनिजन आणि साधक या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. योगिनामुपाकाराय स्वेच्छया गृह्यते तनूम् म्हणजे योगीजनांना उद्धारासाठी शिव स्वयं इच्छेने शरीर धारण करतो, अशीच ही योगदक्षिणामूर्ती आहे.
योगदक्षिणा मूर्ती या योगपट्ट धारण केलेल्या असतात. या विग्रहामध्ये शिवाच्या आसनस्थ स्थितींमध्ये वामउत्कुटिकासन किंवा वज्रपर्यंकसान मूर्ती दिसतात. योगस्थ मूर्ती असल्याने डोळे नासिकाग्रावर स्थिरावलेले असतात. ध्यानमग्न, समाधिस्थ अशी योग दक्षिणामूर्ती साकारलेली असते. शिवाचे दोन हात त्याच्या जानुवर टेकवलेले असतात आणि मागच्या दोन हातांमध्ये सर्प आणि अग्नी धारण केलेले असते. क्वचित एका हाताची ज्ञानमुद्रही दिसते.
शिल्पांमधून अभिव्यक्त होणारे स्वरूप हे एखाद्या विग्रहाच्या केवळ बाह्यरूपाशी ओळख करून देत असते. परंतु दक्षिणामूर्ती सारख्या काही विशेष मूर्ती या तत्त्वज्ञानाच्या अमृताने परिपूर्ण असतात. या साकार स्वरूपाच्या अंतरंगातील, हा ज्ञान मकरंद हृदयामध्ये नवोन्मेष निर्माण करतो. ज्या प्रतिमेची केवळ ओळख होती, त्यापेक्षाही त्या मूर्तीचे सत्त्व हाती लागल्याचा आनंद निश्चित होतो.
अंततः महानन्दस्वरूप दक्षिणामूर्तीचे यथार्थ स्वरूप, त्याच्या तत्त्वरूपावरून लक्षात येण्यास सुरुवात होते.
तत्त्वस्वरूप दक्षिणामूर्ती
दक्षिणामूर्तीच्या तत्त्वरूपातून त्याच्या सत्य स्वरूपाचा बोध होतो. या स्वरूपातील शिवाच्या एक एक तत्त्वाचा अर्थ जोपर्यंत आपण जाणून घेत नाही, तोपर्यंत त्याचा गर्भितार्थ आपल्या मनामध्ये झिरपणार नाही. हे तत्त्वरूप अत्यंत सूक्ष्म अश्या स्वरूपामध्ये प्रकट होत जाते. ते जितके जाणून घ्यावे, तितके ते अधिक व्यापक होते.
दक्षिणामूर्ती म्हणजे साक्षात, विशुद्ध बोधरूपी ब्रह्मज्ञानाचा अंकुर आहे. शरण आलेल्या समर्पित साधकाच्या हृदयामध्ये हा ज्ञानांकुर प्रस्फुटित करणारे हे शिवस्वरूप आहे.
दक्षिणामुर्तीचे ज्ञेयस्वरूपच हे मुळात स्वात्मानन्द सुखाने चित्ताला विशुद्ध करून, प्रबोध शलाकेने आत्म्याला प्रकाशमान करणारे आहे.
यन्मौनव्याख्यया मौनपटलं क्षणमात्रत:।
महामौनपदं याति स हि में परमागति:।।
दक्षिणामूर्त्युपनिषत् शिवाचे गुरुस्वरूप परमतत्त्व इथे व्यक्त करते आहे. मौन व्याख्यानाने शिष्यांचे चित्त क्षणार्धामध्ये संशयरहित करून, शिव मोक्ष प्रदान करतो. दक्षिणामूर्ती हे महामौनपद प्रदान करणारे तत्त्व आहे. हा मौनाने साध्य होणारा गुरुशिष्य संवाद आहे.
मौनाची महत्ता सर्वश्रुत आहेच. पण मौनाने चित्तप्रसाधनाचा क्षय होऊन ब्रह्मतत्त्वावर चित्त अधिक दृढ होते. ब्रह्मतत्त्वाचे ग्रहण हे सूक्ष्म पातळीवर करण्यासाठी मन हे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे सर्वप्रथम योग सहाय्याने शरीराला मनाशी आणि मनाला आत्म्याशी जोडणे आवश्यक आहे. तेव्हाच ब्रह्मचैतन्याची जाणीव, साधकाला केवलत्त्व प्राप्त करून देऊ शकते.
या मौनव्याख्यानातून दक्षिणामूर्ती, शब्दब्रह्म आणि नादब्रह्माचे साक्षात स्वरूप प्रकट करीत आहे. ज्ञानदीप्तीच्या तेजाने मोहाचा अंधःकार नाहीसा करणारे हे स्वरूप आहे.
शेमुषी दक्षिणा प्रोक्ता म्हणजे तत्त्वज्ञानरुपी ब्रह्मज्ञानाची ‘दक्षिणा‘ प्रदान करणारे हे शिवस्वरूप असल्याने, अश्या प्रकारच्या विग्रहास ‘दक्षिणामूर्ती’ ही संज्ञा दिली आहे.
सूतसंहिता, दक्षिणाभिमुख शिवाच्या पंचब्रह्म स्वरूपाचा उल्लेख करते. पंचब्रह्म स्वरूपातील अघोर मुख हे दक्षिणमुखी असते. अघोर म्हणजे जो घोर नाही असा, जो या संसार भवसागरातून बाहेर काढून मुक्ती प्रदान करतो.
त्यामुळेच योगीजन, महर्षी, ऋषी यांना आत्मज्ञानाच्या साक्षात्काराने जीवनमुक्ती, विदेहमुक्ती आणि अंततः कैवल्यमुक्ती प्रदान करणारा हा विग्रह ‘महानन्दस्वरूप ‘असा वाटतो. कामिकागम अश्या प्रतिमांचे प्रयोजनही सांगते, ते असे-
व्याख्यायुक् ज्ञानदः प्रोक्तो गेययुक् भुक्तिदो मतः ।
सयोगो मुक्तिदो ज्ञेय इति ज्ञात्वा समाचरेत् ।।
म्हणजेच याचा अर्थ असा होतो, व्याख्यान दक्षिणामूर्ती ही ज्ञानप्रदान करते, गेय दक्षिणामूर्ती भोग आणि योग दक्षिणामूर्ती मोक्ष प्रदान करणारी आहे. म्हणूनच शिवाच्या दक्षिणामूर्ती या गुरुस्वरुपाला भवन्तोऽपि महादेवं महानन्दस्वरूपिणम् असे म्हटले आहे.
– आषाढ शु.14 शके 1943, गुरुपौर्णिमा (23 जुलै 2021, शुक्रवार).