आज वसंतपंचमी, मकर संक्रमणानंतर माघ महिन्यात येणारी शुक्ल पंचमी. वसंतपंचमीला वसन्त ऋतूचे पहिले पाऊल पडते आणि निसर्ग आपली कूस बदलतो. निसर्गाच्या बदलत्या रूपात वसन्त ऋतू वेगवेगळे रंग भरायला सुरुवात करतो.
प्राचीन भारतीय परंपरेत या निसर्गोत्सवा सोबतच मदनोत्सव, श्रीपंचमी आणि ज्ञानपंचमी म्हणून हा दिवस साजरा केला जात असे. आजही उत्तर-पूर्व भारतात वसंतपंचमीला सरस्वती पूजन करून विद्यारंभ केला जातो. या वसंत पर्वाची सुरुवात आपण देवी सरस्वतीच्या प्रतिमा लक्षणांमधून करून घेऊया.
ऋग्वेदामध्ये सरस्वतीची दोन रूपे अभिव्यक्त होतात, एक तिचे नदी स्वरूप आणि दुसरे तिचे वाक् स्वरूप. वैदिक परंपरेत सरस्वतीचा अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति म्हणजे मातांमधील श्रेष्ठ माता, नदीमधील श्रेष्ठ नदी आणि देविंमधील श्रेष्ठ देवी म्हणून उल्लेख येतो. उपनिषदांमध्ये तिचे वाक् स्वरूप अधोरेखित करून तिचे ब्रह्मैक्य सांगितले आहे. महाभारतामध्ये सरस्वती ही एका पवित्र नदीच्या रुपात अवतरते. पुराणांमध्ये सरस्वतीच्या जन्माच्या विविध कथा येतात. मत्स्य, मार्कंडेय यांसारख्या पुराणांमधून तिचे मानवी स्वरूप आकार घ्यायाला सुरुवात होते. आगम आणि लक्षण ग्रंथांमध्ये तिच्या मूर्तीस्वरूपाचा उल्लेख येतो. जैन परंपरेत तिला श्रुतदेवी म्हणजे विद्यादेवी म्हणूनच पूजन केले जाते. याशिवाय प्रज्ञप्ती, मानसी, महामानसी ही सरस्वतीची विविध स्वरूपे प्रचलित आहेत. बौद्ध परंपरेतील वज्रयानात वज्रसरस्वती, वज्रशारदा, वज्रवीणा सरस्वती ही स्वरूपे येतात. बौद्ध साधनमाला या ग्रंथात तिच्या अनेक साधना वर्णिलेल्या आहेत. मंजुश्री या ज्ञानदेवाबरोबर त्याची शक्ती किंवा सहचारिणी म्हणून ती शिल्पात दर्शवितात. बौद्ध परंपरेत सरस्वती, ज्ञानदेवता म्हणून प्रज्ञापारमिता स्वरूपातही स्विकारली आहे.
नदीतमे सरस्वति
मानवासाठी नद्या या जीवनदायिनी आहेत. या नद्यांच्या काठावर मानवाने आपल्या वसाहती केल्या, तसे सांस्कृतिक पुरावे आपल्याला पुरातत्त्वीय उत्खननात मिळतात. भारताचा विचार केला तर भारतातील सर्वात प्रथम वसाहत ही सप्तसिंधू प्रदेशात झाली. हा सप्तसिंधू प्रदेश म्हणजे पंजाब व त्याच्या आसपासचा प्रदेश असून वितस्ता (झेलम), असिक्नी (चिनाब), परूष्णी (रावी), विपाशा (बिआस), शुतुद्री (सतलज), सिंधू आणि सरस्वती या सात नदया आहेत. त्यापैकी सरस्वती ही नदी, वैदिक कालखंडामधील सिंधू प्रमाणेच मोठी आणि महत्त्वाची नदी होती.
विलुप्त अवस्थेत असलेल्या या नदीचा प्रवाह पुन्हा खळखळून वाहणार आहे. अनेक प्राच्यविद्या संशोधक, पुरातत्त्वज्ञ, भूवैज्ञानिक, जलस्त्रोत अभ्यासकांनी सरस्वती नदीच्या शोधासाठी अपार कष्ट आणि मेहनत घेऊन तीचे प्राचीनत्व, अस्तिव तीचा प्रवाह यांचा कासोशीने पाठपुरावा केला आहे. जनरल सर कनिंगहॅम यांच्या हिमालय पर्वतरांगेच्या सर्वेमध्ये सरसुती नदी असा उल्लेख येतो, इथून सरस्वती नदीच्या शोधाची चक्रे अधिक प्रभावी आणि गतिमान होताना दिसतात. पद्मश्री डॉ. व्ही एस वाकणकर यांनी सरस्वती नदीची शोध मोहीम अधिक संघटीत केली. अमेरिकन सॅटलाइट लॅण्डसॅट मदतीने सटलाइट मॅप्सवर सरस्वती नदीच्या शुष्क पात्राचे आकाशातून छायांकन करण्यात आले. वाकणकर यांच्या नंतरही हे शोध कार्य सुरूच राहिले. वेधन यंत्राव्दारे मिळविलेल्या पाण्याचे भाभा अणु संशोधन केंद्रात पृथक्करण करून समस्थानिके (आयसोटोप्स) वेगळी करण्यात आली. या सर्व प्रयत्नांमधून सुमारे आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी वाहणाऱ्या सरस्वती आपल्या जलस्रोताने विस्तीर्ण प्रदेशाला सुजलाम-सुफलाम करीत होती, असे दिसते.
आज पुन्हा ही सरस्वती हरियाणा मधून जवळपास १९८ किमी. पर्यंत प्रवाहित करण्याचे कार्य सुरु आहे. हा मार्ग यमुनानगर मधील आदिबद्री डॅम पासून सुरु होणार आहे. पुढे हा सरस्वतीचा प्रवाह कुरुक्षेत्र, कैथल मार्गे पंजाबमधून घग्गर नदीला जाऊन मिळणार आहे.
सरस्वतीचे प्राचीन महत्त्व हे तिच्या नदी स्वरूपावरून लक्षात येतेच, याशिवाय तिचे विविध परंपरेतील स्थान आणि तिची विविध शिल्पांमधून झालेली अभिव्यक्ती याचा परामर्श घेणे श्रेयस्कर ठरेल.
देवितमे सरस्वति
सरस्वतीला देविंमधील श्रेष्ठ देवी असे म्हणताना तिच्या स्वरूपाचे मानवाला असलेले महत्त्व सहज अधोरेखित होते. भारतीय परंपरेमध्ये देवी सरस्वती म्हणजे विद्या आणि कला यांची अधिष्ठात्री देवता मानली आहे. देवी सरस्वतीच्या स्वरूपातील सूक्ष्मता, गूढता आणि तिची श्रेष्ठता ही तिच्या तत्त्वरूपावरून अधिक स्पष्ट होते.
परंतु तिच्या विविध स्वरूपातील शिल्पांमधून तिचे बदलते स्वरूप जाणून घेता येते. हिंदू, जैन आणि बौद्ध परंपरेत विद्यादात्री हे तिचे स्वरूप अत्यंत लोकप्रिय झाले होते, हे तिच्या प्रतिमांवरून दिसते.
हिंदू परंपरेतील सरस्वती
हिंदू परंपरेत सरस्वतीची वाक्, वाणी, वाग्देवता, वागीश्वरी, शारदा, ईळा, भारती, धेनु अश्या विविध स्वरूपात पूजन केले जाते. परंतु प्रतिमाशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्यक्ष शिल्पांच्या सोबतच प्रतिमालक्षणाचा उल्लेख महत्वाचा ठरतो. अपराजितपृच्छा, विष्णुधर्मोत्तरपुराण, अंशुमद्भेदागम, पूर्णकारणागम, रूपमण्डन, शिल्परत्न या ग्रंथांच्या आधारे सरस्वतीचे प्रतिमाशास्त्र अभ्यासता येते. शिल्पांमध्ये सरस्वती ही आसनस्थ बसलेली, स्थानक म्हणजे उभी आणि क्वचित नृत्य करीत असलेली शिल्पे आढळतात. ग्रंथांमध्ये श्वेतपद्मासनावर बसलेली दाखवावी असा उल्लेख येतो. विष्णूधर्मोत्तरपुराण मात्र तिच्या वीणाधारी स्थानक प्रतिमांचा उल्लेख करते. तिची कांती श्वेत असून तिची वस्त्रेही तशीच असावी. तिच्या हातामध्ये अक्षमाला, पुस्तक, पद्म असावे. यज्ञोपवीत धारण केलेल्या सरस्वतीचे शीर्ष हे जटामुकुटमंडित असावे असे मूर्तीविधान सांगितले आहे. उपरोक्त प्रतिमांमध्ये सरस्वतीचे शीर्ष हे सुंदर अश्या मुकुटाने मंडित आहे. रूपमंडन सरस्वतीच्या महाविद्या, सरस्वती स्वरूपाचे वर्णन करते. होयसळ हळेबिड येते हातात वीणा धारण करणारी नृत्य सरस्वती ही बघायला मिळते.
जैन परंपरेतील श्रुतदेवी
Goddess Saraswati – 132AD. Kankalitila, Mathura Goddess Saraswati – 132AD. Kankalitila, Mathura Shrutdevi – 10th century AD. Pallu, Rajasthan
तिलोयपण्णत्ती या ग्रंथामध्ये सरस्वतीच्या श्रुतदेवी या स्वरूपाचा उल्लेख येतो. इ.स.2 शतकातील मथुरा येथील कंकालीटिला येथी सरस्वतीची अभिलेखीत प्रतिमा मिळाली आहे. ती सर्वात प्राचीन मानता येते. श्रुतदेवीला जीनवाणी म्हटले जाते, त्यामुळे ती जिनेन्द्र इतकीच प्रामाणिक आणि पूज्य मानली आहे. जैन प्रतिमाशास्त्राचा विचार केला तर तिचे श्रुतदेवी ही श्वेतवर्णा, श्वेतवस्त्रधारीणी, हंसवाहिनी आणि चतुर्भुजा असते. तिच्या हातामध्ये वीणा, पुस्तक, अक्षमाला आणि पद्म असते.
बौद्ध परंपरेतील सरस्वती
Vajra Vina Saraswati Vajra Sarada – 8th Century AD, Archaeological Museum Nalanda
Vajra Saraswati – (Credits) Himalayan Art Resource. Rubin Museum of Art
बौद्ध परंपरेत वज्रवीणा सरस्वती ही द्विभुजा असून ती वीणावादन करताना दाखवतात. वज्रयानाच्या काही तंत्रसाधनांमध्ये सरस्वतीच्या प्रतिमा बघायला मिळतात. वज्रसरस्वती ही त्रिमुखा, षड्भुजा आणि प्रतिलीढासनात उभी असते. तिच्या हातामध्ये पद्म, खड्ग, सुरा, चक्र, वीणा आणि मुण्ड दाखवतात.
वज्रशारदा ही भद्रासनात बसलेली द्विभुजा दाखवतात. तिच्या डोक्यावर चंद्रकोर असते. तिच्या दोन हातांमध्ये पद्म आणि पुस्तकं असते. इ.स.8 शतकातील बसाल्ट दगडातील वज्रशारदेची प्रतिमा Archaeological Museum – Nalanda मध्ये आहे.
सरस्वतीचे मूळ स्वरूप हे वैदिक वाङ्मयामधून नदी देवतेपासून उत्कांत होत होत ती वाणी देवता झाली. तिच्या तीरावर वसलेल्या मानवासाठी ती मातेप्रमाणे भरण- पोषण करणारी झाली. तिच्या प्रेरणा शक्तीने ब्रह्मतत्त्वाची साधना करण्याची ज्ञानपरंपरा आकार घ्यायला लागली. सरस्वती विविध परंपरांमधून ज्ञानदेवता, कलादेवता म्हणून अभिव्यक्त होत होती. विद्यादेवता म्हणून हिंदू, जैन आणि बौद्ध या तीनही परंपरांमध्ये अग्रस्थानी राहिली. आजही विद्यारंभ करताना आपण सरस्वती पूजनाने सुरुवात करतो. म्हणूनच सरस्वतीच्या प्रतिमांमधून असो वा ग्रंथांमधील वर्णनांच्या आधारे तिचे अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति हे स्वरूप शतकानुशतके मानवासाठी तसेच अबाधित आणि पूजनीय राहिले आहे, असे दिसते.