आंगिकम् भुवनम यस्य
वाचिकं सर्व वाङ्ग्मयम्
आहार्यं चन्द्र ताराधि
तं नुमः (वन्दे) सात्विकं शिवम् ||
अर्थात हे संपूर्ण विश्व म्हणजे ज्याचा आंगिक अभिनय आहे, या समस्त विश्वातील वाङ्मय हेच ज्याचा वाचिक अभिनय आहे, हे चंद्र, ग्रह-गोल, तारा आदि ज्याचे आहार्य म्हणजे अलंकार आहेत, त्या सात्विक शिवाला माझे नमन.
अश्या या आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विकं अभिनयाचा उद्गाता म्हणजेच ‘महानट शिव’ याच्या नटराज स्वरूपातील प्रतिमांचा मागोवा घेतला, तर प्राचीनतम प्रतिमा ही मध्यप्रदेशातील नचना इथे सापडली आहे, असे दिसते. भारतीय शिल्पकलेतील, शिवाच्या नटराज स्वरूपातील प्राचीनतम अभिव्यक्ती म्हणून ही प्रतिमा अत्यंत महत्त्वाची आहे. नटेश्वराच्या ताण्डव नर्तनाचा शिल्पातील पहिला उपलब्ध पुरावा म्हणजे ही प्रतिमा असल्याचे मत प्रो. डॉ. वासुदेव शरण अगरवाल आणि डॉ.सि.शिवराममूर्ती यांनी मांडलेले आहे. डॉ.वासुदेव शरण अगरवाल या प्रतिमेला ‘महानट शिव’ असे म्हणतात.
दिल्ली राष्ट्रीय संग्रहालात नटराजाची ही विलक्षण प्रतिमा माझ्या पाहण्यात प्रथम आली, तेव्हा या प्रतिमेची तशी फार माहिती नव्हती. एक शिल्प म्हणून ओझरती नजर गेली असेल, परंतु नटराज विषयावर समग्र अभ्यास सुरु केल्यावर या प्रतिमेचे महत्त्व अधिक लक्षात आले. मध्यप्रदेशातील नचना- कुठारा इथे सापडलेली प्रतिमा ही श्रीमती पुपुल जयकर यांच्या कडे होती. कालांतरानी त्यांनी ही आणि अश्या काही प्रतिमा संग्रहालयाला भेट स्वरुपात दिल्या, त्यापैकी ही एक प्रतिमा. इ.स 5 शतकातील ही प्रतिमा असून गुप्त- वाकाटक शैलीचा प्रभाव यावर दिसतो आहे.
नटराज प्रतिमेची उंची सुमारे 13 इंच आणि रुंदी सुमारे 18 ½ इंच इतकी, आकाराने भव्य अशी ही प्रतिमा असली तरी दुर्दैवाने आज भग्नावस्थेत आहे. मागच्या दोन हातापैकी डाव्या हाताची अलपल्लव मुद्रा आणि पुढचा उजवा हात करीहस्त मुद्रेत आहे. डोक्यावरील जटाभार हा सुंदर अश्या रत्नपट्टामध्ये बांधलेल्या आहे. नृत्याच्या लयीमध्ये हलणाऱ्या काही जटा या शिवाच्या दोन्ही खांद्यांवर रुळत आहेत. कानामध्ये वृत्तकुंडल आहेत, हातांमध्ये कंकण आहेत. तर दंडामध्ये त्रिवलयांकृत केयूर आहे. चर्येवर सौम्य भाव आहे.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- राष्ट्रीय संग्रहालय – नवी दिल्ली
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल षष्ठी शके १९४४.)