पट्टदकल येथील मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे द्रविड शैलीतील उत्तम स्थापत्याचा अविष्कार. या मंदिराचा निर्माण हा चालुक्य राजा विक्रमादित्य द्वितीय (इ.स. 733-44 ) याची पत्नी लोकमहादेवी हीची बहिण त्रिलोकमहादेवी हिच्याकडून झाला आहे. या मंदिराच्या जंघा भागावर नटराज प्रतिमा बघायला मिळते. अतिशय रेखीव अशी प्रसन्न चर्या असलेली नटराज प्रतिमा आपल्याला मंदिराच्या बाह्यभिंतीवर एका कोनाड्यात शिल्पित केलेली दिसते. शिव त्याचा उजवा पाय उचलून उर्ध्वजानू पद्धतीने पदन्यास करीत आहे, त्याचा उजवा पाय हा अपस्मार पुरुषावर रोवलेला आहे. चतुर्भुज शिवाचे पुढचे दोन हात भग्न पावलेले आहेत. तरी शिवाचा पुढचा उजवा हात सिंहकर्ण किंवा कटकमुख मुद्रेत असावा तर डावा हात करीहस्त मुद्रेत आहे. मागच्या हातामध्ये डमरू आणि वृषभध्वज दिसतो आहे. शीर्ष जटामुकुटाने मंडित असून, त्यावर कवटीचे अलंकरण म्हणून वापर केला आहे. नर्तनातील संवेगाप्रमाणे रुळणाऱ्या जटाही शिल्पकाराने सुंदर कोरल्या आहेत. कानामध्ये सुंदर कोरीव कुंडले आहेत. गळ्यात ग्रेवेयक आहे. डाव्या खांद्यावरील यज्ञोपवीत ही नर्तन क्रियेमध्ये हलले आहे. कोरीव उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर आणि हातामध्ये कंकण आहे. कटीला सुंदर असे तलम वस्त्र असून त्यावर मेखला आहे. पायामध्ये नुपूर आहेत. नटराजाच्या उजव्या पायाशी ताल वाद्य म्हणून घट आणि डाव्या पायाशी सुशीर वाद्य म्हणून बासरी वाजवणारे दोन गण आहेत. या शिल्पपटाच्या वर आकाशातून नटेशाला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी येणारे दोन आकाशगामी आहेत. त्यांच्या वर दोन गन्धर्व युगल ही आकाशमार्गाने गमन करताना या शिवाच्या दिव्य नृत्याच्या अनुग्रहासाठी काही क्षण थांबले आहेत, असे हे अत्यंत सुबक आणि विलोभनीय असे शिल्प आपल्याला बघायला मिळते.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- मल्लिकार्जुन मंदिर, पट्टदकल.
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल एकादशी शके १९४४.)