वातापी चालुक्य यांच्या काळात निर्माण झालेल्या बदामी येथील लेणी समूहातील लेणी क्र. 1 च्या प्रवेशद्वारावरच ही पूर्वाभिमुख अशी भव्य नटराज प्रतिमा आहे. ही लेणी भगवान शिवाला समर्पित आहे. शिवाचे विविध विग्रह इथे बघायला मिळतात. परंतु प्रवेश करतानाच ही नटराजाची चतुर ताण्डव मूर्ती लक्ष वेधून घेते.
जवळपास 5 फुट उंचीची ही प्रतिमा नृत्यमग्न शिवाचे दर्शन घडवते. ही अठरा हातांची नटराजाची प्रतिमा एका स्वतंत्र पद्म पीठावर नृत्य करताना शिल्पित केली आहे. नटराजाच्या मागे नंदी उभा आहे. डाव्या पायाशी द्विभुज गणेशही शिवाप्रमाणे नर्तन करतो आहे. गणेशाच्या डावीकडे मृदुंग वादक आहे, जो बसून मृदुंग वादन करीत आहे. या शिल्पामध्ये पद्मपीठावर शिवाचा पदन्यास मण्डल स्थानातून सुरु होतो. डावा पाय किंचित उचललेला आहे. शरीराचा भार हा डाव्या बाजूला झुकलेला आहे. याला चतुर करण असे म्हणतात. नटराजाच्या अष्टादश हातांपैकी आठ हातांमध्ये डमरू, दोन हातांमध्ये पकडलेला सर्प, त्रिशूल अशी आयुधे आहेत. तर उर्वरित हात हे करीहस्त, अभयहस्त, हंसपक्ष, अञ्चित, चतुर मुद्रा यांसारख्या विविध नऊ नृत्यमुद्रा दर्शवितात. नटराजाच्या डोक्यावर सुंदर असा जटामुकुट असून तो रत्नपट्टाने बांधलेला आहे. डोक्यामागे लंबगोलाकार प्रभावलय आहे. एका कानात वृत्तकुंडल आहे तर दुसऱ्या कानांत सर्प कुंडल आहे. गळ्यात ग्रेवेयक आहे. उदरबंध आणि खांद्यावर सुंदर असे यज्ञोपवीत रुळत आहे. दंडात केयूर आणि हातांमध्ये कंकण आहे. कटीला वस्त्र आणि त्यावर मेखला आहे. द्विभुज गणेश तुंदिलतनु असून त्याच्या मस्तकामागे ही प्रभावलय दाखविले आहे.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- बदामी,कर्नाटक.
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल अष्टमी शके १९४४.)