वेरूळ मधील लेणी क्र.15 म्हणजे दशावतार लेणी. पहिला मजल्यावर चढून गेलो की शिल्पांनी संपन्न असा एक भव्य सभामंडप दृष्टीस पडतो. या लेणीमध्ये दक्षिण दिशेला ओळीने विष्णूच्या विविध अवतार शिल्पित केले आहेत. याच सभामंडपाच्या उत्तर दिशेला शिवाचे विविध विग्रह दिसतात. त्यापैकी दुसरा शिल्पपट हा नृत्यरत शिवाचे नर्तन दाखवणारा आहे.
नटराजाचे शिल्प काही अंशी हे क्षतिग्रस्त आहे. अष्टभुज शिवाच्या दक्षिणक्रमाने संदर्शन मुद्रा, त्रिशूल, डमरू असून डाव्या हातांमध्ये हंसपक्ष हस्त, सर्प, एका हातातील आयुध भग्न असावे, आणि पुढचा हात करीहस्त मुद्रेत आहे. शिवाचा जटामुकुट असून तो ब्रह्मकपालाने सुशोभित केला आहे. खांद्यावरून वैकक्षक रुळत आहे तर पोटाला उदरबंध आहे. हातामध्ये कंकण आणि दंडामध्ये त्रिवलययुक्त केयूर आहेत. याशिवाय शिवाच्या डाव्या पायातील अत्यंत सुरेख असे पैंजण आपल्याला दिसते. सुंदर अश्या पद्मपीठावर मध्यभागी त्रिभंगावस्थेत नटेश्वर नर्तन करतानाचे हे शिल्प आहे. शिवाच्या पायाजवळ शिवाप्रमाणे नर्तन करणारे तण्डू मुनी असावेत. उजवीकडे तालवाद्य तर डावीकडे सुशीर वाद्य वाजवणारे वाद्यवृंद आहेत.
वेरूळ मधील दशावतार लेणी ही विशेष आहे. पर्यटकांचा ओघ या लेणीकडे काहीसा कमी असल्याने कदाचित इथे शिल्प-संवाद अधिक प्रखर उमटतो. ही लेणी बघताना आपण भारावून जातो. हा माझा स्वानुभव आहे, अत्यंतिक शांतता या लेणीतील शिल्पांना जिवंत करते. प्रत्येक शिल्प, त्यांच्या कथा, त्या कथांतील भाव साकार होत राहते. हा सोहळा केवळ अनुभवावा असाच आहे. एक एक शिल्पातून नाद उमटायला लागतात आणि आपण स्तब्ध आणि निशब्द होऊन केवळ ही अनुभूती आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. इथला नटराज बघताना या दिव्य नृत्याचा अनुग्रह आपल्यावरही होत आहे, या भावनेने साश्रु या शिल्पांना न्याहाळत राहतो आणि तृप्त मनाने या लेणीमधून बाहेर येतो.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे
(पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष अष्टमी शके १९४४.)