छत्तीसगढ राज्याची जीवनधारा इथे महानदीच्या रूपाने वाहते. या महानदीच्या काठावर सिरपुर येथील गन्धेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवाची ही अष्टभुज नटराज प्रतिमा आहे. गन्धेश्वर महादेव मंदिरात शिवाचे विविध विग्रह, महिषासुरमर्दिनी आणि काही जैन, बौद्ध प्रतिमांचे अवशेष आहेत. या मंदिराचा काळ साधारण 5 वे शतक मानला जातो. या मंदिरामध्ये नृत्य करणाऱ्या अष्टभुज नटराजाची अत्यंत विशेष अशी ही प्रतिमा आहे. यामध्ये शिवाचे शीर्ष हे जटामुकुटाने मंडित असून त्यावर सुंदर अशी चंद्रकोर आहे. दोन्ही कानांमध्ये कुंडले आहेत. गळ्यात मोत्याची एकावली आहे. डाव्या खांद्यावरून रुळणारे यज्ञोपवीत आहे. कमरेला मेखला आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात नृत्यरत शिव ऊर्ध्वरेतस स्वरूप शिल्पित केला आहे. शिवाच्या दोन पायांमध्ये त्याच्याप्रमाणे नृत्य करणाऱ्या एका व्यक्तीचे शिल्प आहे. डॉ.सि.शिवराममूर्ती यांच्या मते ते तण्डू मुनी किंवा भरत मुनी असावेत. नृत्यरत नटेशाच्या उजवीकडे गणेश असून डावीकडे मयुरावर आरूढ कार्तिकेय आहे. डावीकडे पार्वती बसलेली दाखवली आहे, जी शिवाच्या या नृत्य लीलेचे अवलोकन करीत आहे. नटेशाचा उजवा पुढचा करीहस्त असून, उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, डमरू, सर्प, कपाल आणि एका हाताने शिवाने पार्वतीच्या हनुवटीला स्पर्श केला आहे. डावीकडील पुढचा हात भग्न झाला आहे. पदन्यासाचा विचार केला तर एका पद्म पीठावर शिव मंडल स्थानात आहे. शिवाचा उजवा पाय त्याने उचललेला असून निकुट्टकम् करणात आहे. या पद्म पीठाखाली शिवाचे वाहन वृषभ या नृत्याचे अवलोकन करण्यासाठी मान वर करून बघताना शिल्पित केला आहे.
महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये शिवाच्या सहस्र नावांचा उल्लेख येतो. त्यामध्ये शिवाला ऊर्ध्वरेता म्हटले आहे. मुळात ऊर्ध्वरेता या स्वरूपातील शिव भारतीय परंपरेमध्ये पूजनीय आहे. याचे कारण, ऊर्ध्वरेतस ही उच्चतम योगिक स्थिती मानलेली आहे. शिव पशुपती, लकुलीश, क्वचित अर्धनारीश्वर अश्या विविध विग्रहांमध्ये शिवाचे ऊर्ध्वरेता योगी स्वरूप शिल्पांमधून अभिव्यक्त केले आहे, तसेच या नृत्यरत शिवाच्या शिल्पातही बघायला मिळते.
छायाचित्र – साभार अंतरजाल
(पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष तृतीय शके १९४४.)