दिव्यश्चानन्दजश्चैव द्विधा ख्यातोऽद्भुतो रसः |
रससिद्धांतामधील शृंगार, हास्य, करूण, रौद्र, वीर, भयानक आणि बीभत्स यानंतर येतो तो रस म्हणजे अद्भुत रस. भरतमुनींचे नाट्यशास्त्र अद्भुत रसाचे दोन भेद स्पष्ट करते. अद्भुत रसाचा पहिला भेद म्हणजे दिव्यअद्भुत, ज्यामध्ये दिव्यत्त्वाची प्रचीती येते. अद्भुत रसाचा दुसरा भेद म्हणजे आनन्दज अद्भुत, ज्यामध्ये या प्रकारच्या रस निष्पत्तीने आनंदाची अनुभूती येते. अमरकोशात अद्भुत रसाची व्याख्या विस्मयोद्भुतमाश्चर्य चित्रम् अश्या प्रकारे आली आहे. अमरकोशातील उल्लेखाप्रमाणेच विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायीभव आहे.
विस्मयस्य सम्यक् समृद्धिः अद्भुतः|
सर्वेन्द्रियाणां ताटस्थ्यं वा |
– रसतरंगिणी
म्हणजेच विस्मयाची चांगल्या प्रकारे समृद्धी किंवा सगळ्या इंद्रियांना तटस्थता किंवा स्तंभ प्राप्त होणे याला अद्भुत रस म्हणतात. अद्भुत रसामध्ये सर्व इंद्रिये अभिभावित होतात आणि काही काळ निचेष्ट बनतात. जिज्ञासेतून अद्भुत रसाची प्रवृत्ति दाखवली जाते. रूप परिवर्तन सारख्या कला म्हणजे साक्षात माया. असंभवची संभवात झालेली अभिव्यक्ती विस्मय निर्माण करते आणि त्यातूनच अद्भुत रस निष्पत्ती होते.
देवी शिल्पामधील असाच विस्मय निर्माण करून दिव्य अद्भुत रसाचे दर्शन घडवणारा विग्रह म्हणजे पार्वती परमेश्वर यांचे अर्धनारीश्वर स्वरूप.
अर्धनारीश्वर
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये । जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ।
कवीकुलगुरू कालीदास रचित रघुवंश या महाकाव्याच्या प्रारंभीच अर्धनारीश्वर रूपाला नमस्कार केला आहे. वरील श्लोकामध्ये कालिदास असे म्हणतात की, शब्द व त्याचा अर्थ यांचे सम्यक ज्ञान व्हावे अश्या पद्धतीने एकमेकांशी निगडीत झालेल्या वाणी आणि अर्थ यांच्याप्रमाणे एकमेकांत मिळून गेलेल्या जगताचे मायबाप अश्या पार्वती-परमेश्वरांना मी वंदन करतो.
अर्धनारीश्वर हे स्वरूप विस्मय निर्माण करणारे आहे. पुरुष-प्रकृती तत्त्वातील सामरस्य या शिल्पामधून समजून घेता येते. शिवशक्तीची नित्य समरसता म्हणजे अद्वैत असे मानले आहे. या दोनही तत्त्वांच्या सामरस्याची सुरुवात दिसते ती उमा महेश्वर आलिंगन मूर्तीमध्ये. पार्वती परमेश्वर या दम्पतींच्या शृंगार रसाचे दर्शन आलिंगन शिल्पातून अभिव्यक्त होते. या दिव्य, मुग्ध प्रेमातून शिव स्वरूपाला झालेला स्वयं साक्षात्कारामुळे हे ऐक्य साध्य होते. प्रकृती स्वरूप पार्वतीच्या दिव्यत्त्वाची प्रचीती येऊन शिव-पार्वती, अर्धनारीश्वर रूपाने संपूर्ण सृष्टीला दिव्य अद्भुत रसाचा साक्षात्कार घडवतात. शिव पार्वतीच्या शृंगार रसाचा परमोच्च बिंदू म्हणजे अद्भुत रसाच्या रूपात साकार होणारे हे अर्धनारीश्वर स्वरूप. शिवागामातील अद्वैतांत शक्तीचा म्हणजे मायेचा त्याग केलेला नसून ब्रह्मशक्ती म्हणजे तिचा संग्रहच केला आहे. माया ही प्रकृतीस्वरूपा असून महेश्वर तिचा धरणकर्ता आहे. स्वात्मपरिचयातून निर्माण होणारी जिज्ञासा विस्मय निर्माण करते जी या शिल्पांमधून शिल्पकारांनी साकारली आहे.
अर्धनारीश्वरचे स्वरूप हे शिल्पकारांसाठीही आकर्षक विषय ठरला असणार हे भारतभर आढळणाऱ्या वेगवेगळ्या शिल्पांमधून स्वाभाविकच दिसते.
अंशुमदभेदागम, कामिकागम, सुप्रभेदागम, कारणागम या आगम ग्रंथात तसेच शिल्परत्न, बृहत्संहिता, विष्णुधर्मोत्तर पुराण आदि ग्रंथांमधून अर्धनारीश्वर विग्रहाचे स्वरुप-वर्णन बघायला मिळते. अर्धे शरीर पुरुषाचे आणि अर्धे नारीचे म्हटल्यावर दोनही शरीरांची ठेवण, त्यांचा बांधा, लवचिकता, नाजूकता या सर्वच गोष्टींचा प्रतेक्ष मूर्ती साकारताना अतिशय बाराकाईने विचार केला गेला आहे. उजवे अर्धे शरीर हे पुरुषाचे म्हणजे शिवाचे आणि वामंग म्हणजे डावे अर्धे शरीर हे स्त्रीचे म्हणजेच पार्वतीचे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट आणि त्यावर चंद्रकोर असते. तर पार्वतीची, धम्मिल्ल प्रकारची केशसज्ज असते. शिवाच्या मस्तकावर अर्धा त्रिनेत्र असतो तर पार्वतीच्या मस्तकावर उभा अर्धा तिलक असतो. दोघांच्या शरीरावर असलेली आभूषणे आणि वस्त्रेही वेगवेगळी दाखवली जातात. शिवाच्या कानांमध्ये नक्रकुंडले, सर्पकुंडले असतात तर पार्वतीच्या डाव्या कानांमध्ये कुंडले असतात. दंडावरील केयूर , हातामधील कंकणे आणि पायामधील वलये यांमध्ये फरक असतो. पार्वतीची आभूषणे नाजूक आणि अधिक कोरीव दाखवतात. शिवाच्या कमरेपासून गुडघ्यापर्येंत नेसलेले व्याघ्र वस्त्र असते तर पार्वतीच्या कमरेपासून ते पायापर्येंत सुंदर असे नक्षीयुक्त मुलायम, तलम रेशमी वस्त्र दाखवले जाते. अर्धनारीश्वर मूर्तीमध्ये दोन, तीन किंवा चार हात दाखवतात. चतुर्भुज मूर्ती असेल तर शिवाकडे त्रिशूळ, परशु, अंकुश, अक्षमाला, टंक, अभय किंवा कराव अश्या मुद्रा शिल्पांकित करतात. पार्वतीच्या डाव्या हातामध्ये नीलोत्पल, दर्पण, पोपट किंवा कधी कधी तिच्या हात कट्यावलंबित अवस्थेमध्ये तिच्या मांडीवर स्थिरावलेला दाखवतात. शिव नंदीच्या डोक्यावर हात ठेऊन शरीराचा भार किंचितसा झुकवल्याने पार्वतीच्या शरीराला आपोआपच सुडौल अशी अवस्था प्राप्त होते.
इ.स 6- 7 व्या शतकातील घारापुरी या लेणीमध्ये शिव-पार्वतीचे भव्य असे अर्धानिश्वर हे स्वरूप बघण्यासाठी देव-देवता, ऋषिगण, ब्रह्मा, विष्णू, इंद्र, समस्त दिशापाल, संपूर्ण देवलोकच या शिल्पपटामध्ये अवतरीत झाला आहे. हा दिव्य अद्भुत रसाने व्याप्त सोहळा शिल्पकारांनी साक्षात शिल्पामधून साकार करून या अद्भुत रसाची अनुभूती अनंत काळापर्यंत डोळ्यात साठवून घेण्यासाठी ठेऊन गेले आहेत.
पुढील भागात देवी शिल्पातील शांत रसाचा परामर्श घेऊन नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालेला पूर्णविराम देऊ.
2 thoughts on “अद्भुत रस – अर्धनारीश्वर : नवरस आणि देवी शिल्पे”