नमस्ते शारदे देवी, सरस्वती मतिप्रदे |
वसत्वम् मम जिव्हाग्रे, सर्वविद्याप्रदाभव ।
देवी शारदेला माझा नमस्कार असो, ही देवी म्हणजे बुद्धीदात्री सरस्वती. जी माझ्या जिव्हाग्रावर वास करून, मला सर्व विद्या अवगत करून देणारी होवो, अशी प्रार्थना देवी सरस्वतीला आपण करतो.
बुद्धी, मति, प्रज्ञा, मेधा या मनुष्याच्या ज्ञान साधनेतील दिव्य ज्योती आहेत. या ज्योतींच्या तेजाने मनुष्याच्या जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर होण्यास मदत होते. त्यामुळे लहानपणापासूनच सरस्वतीच्या पूजनाने आपण विद्यारंभ करून ज्ञानसाधना सुरु करतो. मात्र सरस्वती देवीचे तत्त्व चिंतन केल्यावर तिच्या स्वरूपातील सूक्ष्मता, गूढता आणि तिची श्रेष्ठता अधिकाधिक स्पष्ट होत जाते.
देवी सरस्वतीचे स्वरूप जाणणे म्हणजे खरंतर अत्यंत कठीण आहे, आणि मुळात हे कठीण आहे, हे लक्षात येणेही तिच्याच कृपेची अनुभूती देणारे आहे. तरीही यथाशक्ती, यथामति सरस्वतीचे स्वरूप जाणण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न तिच्याच चरणी अर्पण करते.
देवी सरस्वती म्हटलं की शुभ्र वस्त्र परिधान केलेली, श्वेत पद्मासनाधिष्टीत, हातामध्ये वीणा, अक्षमाला, पुस्तकं, कमंडलू घेतलेली ज्ञानदात्री देवी सरस्वती, आपल्यासमोर साक्षात प्रकट होते. परंतु भारतीय परंपरेमध्ये, सरस्वती देवी विविध रुपामध्ये अभिव्यक्त होत आली आहे.
देवी सरस्वतीच्या विविध रूपातील तिच्या अभिव्यक्तीतून तिने मानवाची तृष्णा कायमच भागवली आहे. कधी नदी बनून ती वाहती झाली, आणि तिच्या कुशीत एक संस्कृती जन्मली. याच संस्कृतीला आज आपण सरस्वती संस्कृती म्हणून ओळखतो. हीच सरस्वती कधी वाणी बनून ऋषींची ऋतंभरा झाली आणि वेद, उपनिषदे मनुष्याची ज्ञानतृष्णा तोषवति झाली. कवीच्या कंठाची शोभा बनून प्रतिभा शक्तीची तिने प्रचिती दिली. कवींच्या या रचनांमधून आपल्या भाव-भावनांची तृष्णा देवी सरस्वतीने भागवली. शिल्पकला, हस्तकला, संगीत अश्या कलांमधील प्रेरणा होऊन कलात्मक सृजानाने रसिकांच्या हृदयातील आस्वादन तृष्णाही तिने शमवली. तपस्वी, आचार्य, साधक, संत यांच्या वाणीवर विराजमान होऊन सरस्वतीने सिद्धांचे ज्ञानमार्ग खुले केले, जे या तपस्वींच्या मोक्षाचे राजमार्ग झाले.
म्हणूनच देवी सरस्वतीला अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति म्हणजेच मातांमधील श्रेष्ठ माता, नदींमधील श्रेष्ठ नदी, देविंमधील श्रेष्ठ देवी म्हणजे सरस्वती, असे तिचे महत्त्व या ऋचेमधून व्यक्त होत आहे. देवी सरस्वतीचे प्रत्यक्ष स्वरूप आणि तिची विविध मूर्त रूपे शिल्पकलेतून अभिव्यक्त झालेली आपल्याला ज्ञातच आहेत. परंतु सरस्वतीचे तत्त्वरूपाचा, स्वाध्याय सुधाच्या या सूत्रात परामर्श घेण्याचा हा प्रयास आहे.
सरस्वतीचे श्रुती हे स्वरूप हिंदू आणि जैन परंपरेतही मान्य आहे. इ.स. चौथ्या शतकामध्ये अमरसिंह यांचा अमरकोशामध्ये, सरस्वतीला वाणीची देवता मानले आहे.
ब्राह्मी तु भारती भाषा गीर्वाग्वाणी सरस्वती ।। अमरकोश 1.9.312
वाणीपासूनच शब्दनिर्मिती होते, त्यामुळे अमरकोशामध्ये शब्दादिवर्गाचा आरंभ हा ‘वचन’ या शब्दाच्या प्रतिशब्दांनी होतो. यामध्ये सरस्वती हा शब्दही वचन या अर्थी, त्याचा प्रतिशब्द म्हणून योजला आहे. म्हणजे सरस्वती ही वाणी, वाक्, भाषा यांची अधिष्ठात्री म्हणून सर्वश्रुत आणि सर्वमान्य होती असे दिसते. परंतु सरस्वतीचे श्रुतिरूप आणि त्यापेक्षा काही वेगळे, पण याच स्वरूपाला सलग्न आणि पूरक असे दृष्टीरूप चिंतनीय आहे.
श्रुती आणि दृष्टी या सरस्वतीच्या दोन स्वतंत्र अभिव्यक्ती आहेत. श्रुती आणि दृष्टी या ऋषींच्या दोन शक्ती मानल्या जातात. आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, महर्षी अरविंद घोष यांनी सरस्वती आणि इला यांनाच अनुक्रमे श्रुती आणि दृष्टी म्हटले आहे, हे कुठेतरी समर्पक वाटते. ऋग्वेदाच्या आप्रीसूक्तांमध्ये तिस्रो देव्यः सरस्वतीळाभारत्यः म्हणजेच देवी सरस्वती, इळा आणि भारती (मही) या तीन देवींचा उल्लेख येतो.
या देवी सरस्वती, इला आणि भारती (मही) स्वतंत्र देवता म्हणून उल्लेखलेल्या असल्या, तरी त्या एकाच तत्त्वाच्या तीन अभिव्यक्ती आहेत, असे मला वाटते. देवी सरस्वती आणि इला या स्वतंत्र असल्या तरी त्यांचे एकमेकींशी सूक्ष्म साधर्म्य असल्याचे दिसते. हे सूक्ष्मतर बंधच त्यांच्यातील वेगळेपणा साकार करतात.
देवी सरस्वती
सरस्वती म्हणजे वाग् वै सरस्वती याचा अर्थ सरस्वती वाक् आहे. सरस्वतीला वाणी म्हटले आहे. परंतु या वाणीचे स्वरूपही कसे आहे, तर या वाणीमध्ये सत्याचे तेज आहे, अशी ती वाक् म्हणजे सरस्वती. ही सत् वाणी शब्दांना तेज देते, अर्थाना बळ देणारी अशी आहे. त्यामुळे या वाणीचा शब्द हा रिता राहत नाही. त्यामुळे हिलाच वेदवाणी असेही म्हटले आहे. इथे देवी सरस्वतीचे श्रुती स्वरूप समजते. परंपरेने श्रुतींचा निर्देश हा वेदांसाठीही केला आहे.
श्रुती म्हणजे काय?
भारतीय परंपरेत वेद हे प्राचीनतम वाङ्मय असून त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अपार आहे.
वेद, वेदांचे स्वरूप कसे असते हे जाणून घेण्यासाठी वेदोऽखिलो धर्ममूलम् हा लेख अवश्य वाचा.
वेद या शब्दाच्या व्युत्पत्तीवरून वेदाचे स्वरूप ज्ञान आणि विद्या प्रदान करणारे असल्याचे स्पष्ट होते. वेद या शब्दासाठी श्रुती, आम्नाय, त्रयी, छन्दस्, स्वाध्याय असे अनेक शब्द प्रतिशब्द म्हणून येतात. त्यानुसार श्रुती या संज्ञेचा वेदांशी असलेला सबंध इथे पाहण्यायोग्य आहे. श्रुती हा शब्द ‘श्रु’ या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ होतो श्रवण म्हणजेच ऐकणे. वाचस्पति मिश्र यांनी गुरुमुखादनुश्रूयते इत्यनुश्रवो वेदः म्हणताना वापरलेला ‘अनुश्रूयते‘ शब्दही श्रुतीमूलक असल्याचे दिसते. सर्व ज्ञान-विज्ञान ग्रहण करण्यासाठी प्राचीन काळापासून श्रवणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
वैदिक ज्ञान हे गुरूकडून शिष्याकडे मौखिक स्वरूपात देण्यात आले आहे. गुरुमुखातून साकार झालेले हे वेदज्ञान श्रवण करून शिष्य आत्मसात करतो म्हणून त्यांना श्रुती म्हटले आहे. या श्रुतींचे अलौकिक स्वरूप आपल्याला वेद पठण परंपरेचा वारसा रुपात अनुभवता येते. भारतात जवळपास साडे तीन हजार वर्षांपासून अखंडित सुरु असलेली ही वेद पठण परंपरा तिच्या या कौशल्यपूर्ण शैलीमुळे युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये समाविष्ट झाली आहे.
वेद पठण परंपरा नेमकी कशी आहे, आणि ती युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये कशी समाविष्ट झाली हे वेद पठण परंपरा या लेखामध्ये अवश्य वाचा.
या वेदांमधून मिळणारे ज्ञान हे या नित्या वाक् च्या सहाय्याने अनंत काळ, इथपर्येंत प्रवाहित होत आलेले आहे. यावरून देवी सरस्वतीचे श्रुती स्वरूप लक्षात येते.
देवी इला
इला, इळा किंवा इडा म्हणजे ईढ्यते स्तूयते अनेन इति सा वाणी. महर्षी दयानंद सरस्वती यांनी ऋग्वेद भाष्यामध्ये इला म्हणजे प्रशस्ती किंवा स्तुती करणारी वाणी, असे तिचे स्वरूप सांगितले आहे. महर्षी अरविंद घोष यांनी इला म्हणजे दृष्टी असे म्हटले आहे. ही दृष्टी कशी आहे? तर ही सत्य दृष्टी आहे. जी मनुष्याच्या चित्तामध्ये विवेकाची जाणीव निर्माण करते.
देवी सरस्वती आणि इला या दोनही चेतना जागृत करणाऱ्या अश्या स्वरूपाच्या आहेत. त्यांचे हे चेतना स्वरूप, श्रेयस्कर विचारांच्या सृजनासाठी पोषक असे आहे. चित्ताची योग्य स्थिती सरस्वती देवीकडून प्राप्त होते, तर इला देवतेमुळे ज्ञानाची जाणीव होते.
मग इला या देवतेचा आणि दृष्टीचा कसा संबंध लागेल? मुळात त्यासाठी आधी दृष्टी म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागले.
दृष्टी म्हणजे काय?
दृष्टी या संज्ञेचा अर्थ जाणला तर इला या देवतेचे दृष्टी स्वरूप समजण्यास सोयीस्कर जाईल. दृष्टी या शब्दामध्ये ‘दृश‘ किंवा ‘पश्य‘ धातु आहे ज्याचा अर्थ होतो दिसणे किंवा पाहणे. मग हे कश्या प्रकारचे पाहणे आहे?
डोळा या इंद्रियाने दिसते आणि आपण एखाद्या पदार्थाचे ज्ञान ग्रहण करतो, परंतु हे ज्ञान सत्य म्हणावे का? सत्य ज्ञान हे अन्तःचक्षुंनी ग्रहण करता येते. अन्तःचक्षुंच्या सहाय्याने ग्रहण केलेल्या ज्ञानामध्ये कोणत्याही अज्ञानाचा अंश उरत नाही किंवा कोणतेही असत्याचे आवरण त्यावर राहत नाही. ही अन्तःचक्षुंनी प्राप्त दृष्टी म्हणजे मर्मदृष्टी (Insight).
या मर्मदृष्टीच्या सर्व छटा म्हणजे पूर्वानुभव किंवा पश्चात् दृष्टी (Hindsight) आणि वर्तमानापलीकडे पहाणारी कल्पनात्मक दृष्टी किंवा दूरदृष्टी (Foresight) यांचाही अंतर्भाव या मर्मदृष्टी या संज्ञेमध्ये अभिप्रेत आहे.
या मर्मदृष्टीच्या सहाय्याने एखाद्या विशिष्ट पदार्थाचे सर्वार्थाने आणि मूलग्राही आकलन होणे संभव असते. वैदिक वाङ्मया संदर्भात सांगायचे झाले तर, वेद हे अपौरुषीय आहेत, हे आपण जाणतोच.
ऋषिरतीन्द्रियार्थद्रष्टा मन्त्रकृत् म्हणजे ऋषी हे अतीन्द्रिय अर्थांना बघणारे मंत्रकार आहेत, असे म्हटले आहे. ऋषींना वेदांचे द्रष्टृत्व दिले आहे, त्यामुळे त्यांना ऋचांचे द्रष्टा म्हणतात. वैदिक साहित्यामध्ये या ऋषींना वेदातील ऋचांचे रचनाकार म्हणत नाहीत, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. ही दृष्टी म्हणजे अतीन्द्रिय दृष्टी जीला आपण दिव्यदृष्टी किंवा अलौकिक दृष्टी असे म्हणतो. ही दृष्टी ज्ञानाची खरी जाणीव करून देणारी आहे.
त्यामुळे श्रुती आणि दृष्टी यांना ऋषींच्या दोन शक्ती मानल्या असाव्यात, असे मला वाटते. श्रुती रुपी सरस्वती आणि दृष्टी रुपी इला या प्राचीन काळी स्वतंत्रपणे अभिव्यक्त झालेल्या देवता असल्या, तरीही काळाच्या प्रवाहात या दोन्हीही वाग्विलासिनी सरस्वतीच्या रुपात एकरूप झालेल्या दिसतात. ज्ञानसाधनेमध्ये श्रुती आणि दृष्टी या दोन्हींचे स्वतंत्र महत्त्व आहे. या दोन्हीपैकी एकीचा अभाव अज्ञानाच्या मार्गाकडे भरकटत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे विवेक निर्माण करणारी देवी सरस्वती आणि या विवेकाची जाणीव निर्माण करणारी इला, श्रुती आणि दृष्टी स्वरूपा आहेत असे वाटते.
– वैशाख कृ.10 शके 1943, शुक्रवार (4 जून 2021).
स्तुत्य उपक्रम आहे माहिती खुप छान मिळते नाव तर खुपच छान आहे स्वाध्याय सुधा हे वाङ्मय अमृता ची अनुभूती देत अस वाटत
नमस्कार स्मिता ताई,
आपले बोधसूत्र ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत आहे. बोधसूत्र ब्लॉगवर नव्याने सुरु असलेले लेखन पर्व म्हणजे ‘स्वाध्याय सुधा’. मी बोधसूत्र ब्लॉगवर आणि सुगम या सदराखाली संकलित केलेल्या लेखांची धाटणी ही स्वाध्याय सुधा पेक्षा पूर्णतः निराळी आहे. बोध झालेल्या गोष्टींचे सूत्र रूपातील संकलन म्हणजे बोधसूत्र. सुगम हे अगदी त्याच्या नावाप्रमाणे हलके-फुलके विषय यामध्ये संकलित केले आहेत. स्वाध्याय सुधा मात्र याहून निराळे आहे. माझ्या स्वाध्यायाच्या चिंतन शृंखलेतून वेचलेला ज्ञानमकरंद आहे हा. यातील विषयांची खोली आपल्यासारख्या वाचकांना जाणवते आहे आणि आपण तश्या व्यक्तही होत आहात, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.
आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपले ब्लॉगवर सदैव स्वागत आहे. अवश्य भेट देत रहा आणि आपला अभिप्राय कळवत रहा.
धन्यवाद.!
– धनलक्ष्मी