नटराज शिल्पांमध्ये भुजंगत्रसितम् करण हे अत्यंत लोकप्रिय आणि महत्वाचे करण आहे. या करणात पदन्यास करणारी शिवाची असंख्य सुंदर शिल्पे किंवा धातु प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात. ‘भुजंगत्रसित’ या करणामध्ये पायाजवळ भुजंग आल्याच्या कल्पनेने लगबगीने पाय कुञ्चित अवस्थेत उचला जातो. चोल शैलीमधील नृत्यरत शिव हा भुजंगत्रसित करण करताना शिल्पित केला आहे. परंतु आगम काळामध्ये याच करणाला आनंद ताण्डव ही संज्ञा रूढ झाली. आगम शास्त्रामध्ये नृत्यमूर्ती करताना भुजंगत्रसितम् करणावर अधिक भर दिला गेला आहे.
गंगैकोंडचोलपूरम् येथील चोल राजवंशाचा राजेंद्र चोल याच्या काळात निर्मित झालेले बृहदिश्वर मंदिरमध्ये नृत्यरत शिवाच्या अनेक प्रतिमा बघायला मिळतात. इ.स.11 शतकातील हे द्राविड शैलीतील मंदिराच्या जंघाभागावर अपस्मार पुरुषावर नर्तन करणाऱ्या नटराजाची सुंदर अशी प्रतिमा आहे. अत्यंत सुबक आणि प्रसन्न चर्या, अर्धोन्मेलीत डोळे, स्मित हास्य असलेले हे नटराज शिल्प आहे. देवकोष्टामध्ये असलेल्या या नटेशासोबत डावीकडे ऊर्ध्वकेशी अष्टभुजा भद्रकाली देवीही नृत्य करताना शिल्पित केली आहे. उजव्या पायाशी भृंगी ऋषी असावेत. या शिल्पाच्या खाली चामुण्डा, शिवगण आणि वाद्यवृंद दाखवले आहेत.
चतुर्भुज नटराजाच्या हातामध्ये भक्तांना अभय प्रदान करणारी अभय मुद्रा, शब्दब्रह्माचे प्रतिक म्हणून डमरू, लय कार्यान्विन करण्यासाठी अग्नी आहे आणि डावा पुढचा हात करीहस्त मुद्रेत म्हणजेच तिरोधन क्रियेत आहे. शिवाने त्याच्या संपूर्ण शरीराचा भार हा उजव्या पायावर घेत डावा पाय कुञ्चित अवस्थेत उचलेला आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवून तो अपस्मार पुरुषावर ठेवला आहे. अपस्मार पुरुषाच्या हातामध्ये भुजंग आहे. हा अपस्मार पुरुष किंवा मूलयक म्हणजे खरतर अपस्मृतीचे प्रतिक मानले आहे. अपस्मृती ही मनुष्याच्या मोहावस्थेशी निगडीत आहे. थोडक्यात अज्ञानरूपी अपस्माराला भगवान नटराज आपल्या पायाखाली दाबून जिज्ञासु भक्तांच्या जीवनमार्ग प्रशस्त करीत आहेत.
त्रिनेत्र शिवाची चर्या प्रसन्न भावाने तेजाळली आहे. त्याचे मस्तकावरील जटामुकुट अतिशय बारकाव्याने शिल्पकाराने सुशोभित केला आहे. शिवाच्या शीर्ष पट्टाने जटा या सर्पवेष्टानाने मंडित करून त्यावर कवटी आहे. ही कवटी म्हणजे ब्रह्मकपालाचे निदर्शक आहे. सुंदर अशी कोरीव चंद्रकोर या जटामुकुटामध्ये आहे. नृत्याच्या संवेगामध्ये एका सर्पाचे वेष्टन सैल झाले आहे आणि यापैकी काही जटा या मुक्त होऊन दोन्ही बाजूला पसलेल्या आहेत. शिवाच्या एका कामानाध्ये सिंहकुंडल असून दुसऱ्या कानामध्ये पत्रकुंडल आहे. गळ्यात ग्रेवेयक आहे. उदारबंध आणि डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत आहे. दंडावर वलयांकृत नक्षीयुक्त केयूर आहे, हातांमध्ये कंकण असून बोटांमध्ये अंगुलिका आहेत. मांडीपर्येंत तलम कटीवस्त्र नेसलेले असून त्यावर तलम शेला आणि अलंकृत मेखला आहे. पायामध्ये पादवलय आणि सुंदर अशी नुपूरे आहेत. या नटराज प्रतिमेतून धर्म, कला आणि तत्त्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो.
छायाचित्र – साभार अंतरजाल
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल चतुर्दशी शके १९४४.)