ही नटराज प्रतिमा कैलास मंदिराच्या मार्गिकेवर आहे. हातामध्ये सर्प धरलेल्या अपस्मार पुरुषाच्या अंगावर दोन्ही पाय ठेऊन मण्डल स्थानात नृत्यरत शिवाचे हे शिल्प आहे. अष्टभुज नटेशाच्या हातामध्ये करीहस्त मुद्रा, कट्यावलंबित हस्त, डमरू, सर्प आणि कटकमुद्रा आहे. डोक्यावर मुकुट आहे. त्रिनेत्र शिवाची चर्या रौद्र भाव दर्शवणारी असली तरी चेहऱ्यावर स्मित आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. पोटाला उदरबंध आहे. दंडामध्ये केयूर तर हातांमध्ये केयूर आहे. कटीला वस्त्र आहे. नटराजाच्या पायाखाली दाबल्या गेलेला कुरूप, बेढब शरीरयष्टी असलेला मूलयकही लक्षवेधी आहे.
वेरूळ मध्ये अनेक नटराज प्रतिमा आहेत. कैलास मंदिराच्या मार्गीकेवरील हे दुसरे नटराज शिल्प काहीसे भिन्न आहे. कैलास मंदिराच्या मार्गिकेवर कोरीव देवकोष्टामध्ये असलेल्या दक्षिणाभिमुख अश्या नटराजाचे दर्शन होते. अपस्मार पुरुषाच्या अंगावर डावा पाय रोवून आवेशपूर्ण नर्तन करणाऱ्या चतुर्भुज नटेश या शिल्पामधून दिसतो. या चार भूजांपैकी काही भग्न झालेल्या आहेत. मात्र उजव्या मागच्या हातामध्ये डमरू आहे तर मागचा डावा हात शिवाने कमरेवर ठेवला आहे. भुजंगत्रसित पदन्यासात शिवाने त्याचाउजवा पाय उचललेला असून डावा पाय अपस्मार पुरुषावर रोवलेला आहे. या शिल्पामध्ये आ-वासलेला भुजंग शिवाच्या उजव्या बाजूला दाखवलेला आहे. शिवाच्या डोक्यावरील जटा या रत्नपट्टाने बांधलेल्या आहेत. त्रिनेत्र शिवाची चर्या रुद्र भाव दर्शवणारी आहे. गळ्यात ग्रेवैयक आहे, डाव्या खांद्यावर रुळणारे यज्ञोपवीत आहे. नटराजाच्या पायाखाली दाबल्या गेलेला जाड-जुड शरीरयष्टी असलेला मूलयकही लक्षवेधी आहे. त्याच्या गळ्यात एक माळा आहे. त्याच्या केसांच्या कुरळ्या बटाही शिल्पकाराने बारकाईने कोरल्या आहेत. त्यामुळेच हे शिल्प लक्षवेधी झाले आहे.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे
(पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष पंचमी शके १९४४.)