मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंडपातून गर्भगृहात जाताना मध्ये अंतराळाची रचना केलेली असते. या अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या वर ‘मकरतोरण’ हा मंदिर स्थापत्यातील एक घटक आपल्याला बघायला मिळतो. प्रवेशाच्या दोन कमानी या तोरणाला तोलून धरतात. दोन मकरमुखातून नानाविध लता-वेलींनी हे तोरण बनते त्यामुळे त्याला मकर तोरण असे म्हणतात. या तोरणाच्या मध्यभागी विविध देवतांचे शिल्पांकन केलेले असते, त्यापैकी मकर तोरणावरील नृत्यरत शिव अवलोकन आज करायचे आहे.
चालुक्य शैलीतील मकर तोरण (प्रतिमा क्र. 1) – उमरगा येथील शिवमंदिर हे त्रिदल म्हणजे तीन गर्भगृहयुक्त आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यप्रवेशद्वार आणि तीनही गर्भगृहांची प्रवेशद्वार यांवर तीन अशी एकूण चार मकर तोरणे आहेत. यांपैकी एका मकर तोरणावर चतुर्भुज शिव नृत्यमग्न असल्याचे शिल्पित केले आहे. सर्व हस्त मुद्रा या नृत्यमुद्रा आहेत. दक्षिणाधक्रमाने अलपल्लव, लताहस्त, हंसपक्ष आणि एका हाताची करीहस्त मुद्रा करून आशीर्वचनाप्रमाणे एका उद्दकी वाजविणाऱ्या गणाच्या मस्तकावर हात ठेवला आहे. त्रिभंग अवस्थेतील शिव ऊर्ध्वजानु पदन्यास करीत आहे. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे. शिवाच्या उजव्या बाजूला वेणुवादक आहे. वेणुवादकाच्या मागे किन्नर युगुल शिल्पांकित केले आहेत. शिवाच्या डाव्या बाजूला एक मृदुंग वादक असून त्याच्याही बाजूला किन्नर युगुल शिल्पित केले आहेत. या तोरणावर काही आकाशगमी गन्धर्व पुष्पमाला घेऊन येताना दाखवले आहेत.
काकतीय शैलीतील मकर तोरण (प्रतिमा क्र. 2) – सध्या हे मकरतोरण दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे. या मकर तोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी नृत्यरत शिव आहेच पण सोबतच ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूही शिवासोबत नृत्य करीत आहेत. दोन मकरांच्या मुखातून निघालेल्या लता दाखवल्या आहेत. दशभुज शिवाच्या उजव्या हातांमध्ये अक्षमाला, डमरू, खट्वांग, बाण आणि खड्ग आहे तर डाव्या हातांमध्ये खेटक, धनुष्य, त्रिशूल, सर्प आणि बिजपुरक ही आयुधे आहेत. शिवाच्या पायाशी वृषभ बसलेला आहे. उजव्या बाजूला असलेले ब्रह्मदेव त्रिमुखी चतुर्भुज शिल्प्त केलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये अक्षमाला, स्रुक, पाश आणि कमंडलू आहे. ब्रह्मदेवाच्या पायाशी त्यांचे वाहन हंस दाखवलेला आहे. भगवान विष्णू चतुर्भुज असून त्यांच्या हातांमध्ये गदा, पद्म, शंख आणि चक्र आहे. विष्णूच्या पायाशी हात जोडून बसलेला गरुड शिल्पित केला आहे. त्रिदेव हे सर्वाभरणभूषितम् म्हणजे सर्व अलंकारांनी युक्त असे आहेत. दोन्ही बाजूला असलेले वादकांनी त्यांच्या तालवाद्यांनी ठेका धरलेला आहे.
या मकर तोरणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तोरणावर दोन्ही बाजूंना अष्टदिक्पाल त्यांच्या वाहनावर आरूढ होऊन हा या नर्तन सोहळ्यास उपस्थित झाले आहेत. यामध्ये उजवीकडे इंद्र, अग्नी, यम आणि निरुत्ती तर डावीकडे वरूण, पवन, कुबेर आणि ईशान हे शिल्पित केले आहेत.
याशिवाय भारतभर अनेक मंदिरामध्ये अशी विलक्षण सुंदर आणि लक्षवेधी कोरीव मकरतोरणे आपल्याला बघायला मिळतात.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- प्रतिमा क्र. 1 – उमरगा येथील शिवमंदिर, प्रतिमा क्र. 2 – दिल्ली राष्ट्रीय संग्रहालय
(पूर्वप्रकाशित – श्रावण कृष्णपक्ष षष्ठी शके १९४४.)