प्राचीन संहिता, पुराणकथा आणि त्यामध्ये गुंफलेल्या काही संकल्पना या मूर्त रुपाला जन्म देत असतात. रुद्र या संकल्पनाचा विस्तार रुद्राय नमः या मागच्या लेखामध्ये आपण बघितला आहे. हाच रुद्र हातामध्ये धनुष्य धारण करून रथात आरूढ होणारा त्रिपुरान्तक शिव या संहारक रूपातून व्यक्त होताना दिसतो. तैत्तिरीय संहिता आणि शतपथ ब्राह्मणासारखे काही प्राचीन ग्रंथ आणि महाभारत, लिंगपुराण आणि शिवपुराणांतून आलेल्या रोचक कथा शिल्पकारांना ही तितीक्याच आव्हानात्मक ठरलेल्या दिसतात. या पुराणांमध्ये त्रिपुरान्तक आख्यानाचे अतिशय सुंदर आणि मनोरंजक वर्णन प्रस्तुत केलेले आहे.
शिवपुत्र कार्त्तिकेय, दैत्यासुर तारकाचा वध करतो आणि सुरु होते कथा त्रिपुर निर्माणाची. तारकासुराचे तीन पुत्र विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष हे तीन अनोख्या पुरांचा निर्माण करतात. मय असुराच्या मदतीने सुवर्णाचे पूर स्वर्गात बनवून तारकाक्ष त्या दुर्गाचा स्वामी होतो. कमलाक्षचे चांदीचे पूर अंतरिक्षात प्रस्थापित होते. विद्युन्मालीचे पूर भूमीवर निर्माण होते जे लोहाचे असते. या तीनही पुरांवर अधिपत्य करणारे हे दैत्य, देव आणि ऋषीच्या त्रासाचे कारण बनतात. तेव्हा ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून सर्व देवता महादेवाला शरण जातात. शिव सर्व देवतांच्या शक्तीच्या मदतीने त्या तीनही पुरांना भस्मिसात करण्यास सज्ज होतो.
विश्वकर्मा या कार्यात शिवासाठी महादिव्य सुवर्णाच्या रथाचा निर्माण करतात. या रथाचे उजवे चाक हे सूर्य बनतो. ज्याचे बारा आरे म्हणजे बारा आदित्य असतात. डावे चाक चंद्रमा बनतो. ज्याला सोळा आरे म्हणजे चंद्राच्या सोळा कला असतात. सत्तावीस नक्षत्र या दोनही चाकांची शोभा वाढवत असतात. संवत्सर रथाचा वेग बनतो. कला त्या रथाचे खिळे बनतात. द्युलोक त्या रथाचे छत बनते. स्वर्ग आणि मोक्ष त्याचा ध्वज बनतो. वेदांग, पुराण, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र त्या रथाचे अलंकार होतात. पुष्कर सारखी तीर्थे रत्नजडित सुवर्णमयी पताका बनतात. चार समुद्र रथाचे आच्छादन वस्त्र बनते. सप्तवायू सुवर्णमयी उत्तम सोपान बनतात.
साक्षात सृष्टीकरता ब्रह्मदेव या रथाचे सारथी होतात आणि प्रणवाकार ओम चाबूक बनतो. चार वेद रथाचे चार घोडे होतात. शैलराज हिमालय धनुष्य बनून रुद्राच्या हातामध्ये स्थिरावते. शेषनाग त्या धनुष्याची प्रत्येंचा बनतात. श्रुतीरूपिणी सरस्वती देवी त्या धनुष्याची घंटा बनते. जगत्पालक विष्णू त्या दिव्य शक्तिशाली धनुष्याचा महातेजस्वी बाण बनतात. त्या बाणाचे अग्र अग्नी आणि यम त्याची पिसे बनतो. हा सज्ज झालेला दिव्य रथ साक्षात रुद्राच्या स्पर्शाने डगमगतो तेव्हा नंदी त्याच्या बळाचे सहाय्य त्या रथाला देतो. ब्रह्मदेव रथाचा लगाम सावरून रथ त्रिपुरांवर चाल करण्यास सज्ज करतात. ही तीन दिव्य पुरे अनेक वर्षांनी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा रुद्र त्याच्या दिव्य तेजस्वी बाणाने त्यांच्या भेद घेतो. त्या पुरांचा त्या तीनही दैत्यांसकट सर्वनाश होतो.
या कथेतील बारकावे शिल्पांत उतरवताना त्या प्रतिमेमागच्या आव्हानांची कल्पना आपल्याला येते. एखादे कथानक शिल्पबद्ध करताना अतिशय मर्यादित जागेत शिल्पांतील बारकावे दाखवावे लागतात. त्यामुळे अश्या मूर्तीमध्ये शिल्पकार त्याचे विशेष कौशल्य, त्याच्या कल्पकतेने मांडत असतो. अनेक शिल्पग्रंथांमध्ये अश्या मूर्तींच्या निर्माण विधीचाही उल्लेख येतो. वेरूळ येथील दशावतार लेणीतील त्रिपुरान्तक मूर्तीत सारथी साक्षात ब्रह्मदेव आणि घोडे रथ ओढताना शिल्पांकित केले आहेत. कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिरात शिव गुडघ्यावर बसून वरच्या दिशेने त्याच्या धनुष्याची प्रत्येंचा ताणलेला शिल्पित केला आहे. याशिवाय मध्य भारतामधील एका शिल्पांत शिवाचा पाय एका वाकलेल्या पुरुषावर स्थित आहे. म्हैसूर येथील त्रिपुरान्तक शिव पंचमुखी, गंगा डोक्यावर धारण केलेला दाखवलेला आहे. तीन दुर्ग आणि त्यातले दैत्य स्पष्ट दिसतायेत. बाणावर विष्णूचे अंकन आहे. चंद्र-सूर्य चाके असलेल्या रथाला चार घोडे आहेत ज्यांचा लगाम ब्रह्मदेवाच्या हातात आहे. शिवाय विनायक म्हणून गणेशही आहे असे दिसते. नंदी रथाला आधार देतो आहे. शेषनागरूपी प्रत्येंचा ताणून धरली आहे. एकूणच संपूर्ण सृष्टी आणि सर्व देवता या त्रिपुरांचा विनाश करण्याच्या कार्यात रुद्र शिवाला सहाय्य करताना अंकित केले आहेत.
रुद्र आणि दैत्य यांच्यातील युद्धाचा साक्षात्कार या शिल्पातून अनुभवता येतो. दुर्गांचा विनाश करण्यासाठी बाण सोडण्यपूर्वीचा तो एक क्षण त्या शिल्पांमध्ये गोठवला आहे. शिवाचे रुद्र रूप, त्याची पुरांवर स्थिरावलेली एकाग्र नजर आणि त्यातून त्या शिल्पांत निर्माण झालेल्या एका प्रचंड नाट्याची कल्पना आपल्याला येते. एकूणच त्या त्रिपुरारीच्या अद्भुत शक्तीची अनुभूती या शिल्पातून साकार होते आणि स्वाभाविक भक्ताच्या मनात त्रिपुरान्तकाय नमः च्या लहरी उत्पन्न होतात.
खूपच सुंदर लेख
विजयजी मनापासून आभार. आपण लेखाबद्दल दिलेल्या आपल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद..!!
वा! सुंदर लेख. एखाद्या शिल्पनिर्मितीमागे संकल्पनेचा किती खोलवर विचार केला जातो हे सहज समजावून सांगितलेत.
धन्यवाद कांचनजी. हो शिल्पाकृतींचा अभ्यास करताना काही माझी स्वतःची निरीक्षणे तयार झाली. अर्थात शिल्पनिर्मितीचे टप्पे समजावून घेताना संकल्पनांचा आधार किती सहाय्यक ठरतो हे दिसते. ते मांडण्याचा माझा एक प्रयत्न होता. आपल्या प्रतिसादामुळे त्या प्रयत्नांमध्ये मला थोडे यश प्राप्त झाले आहे असे दिसते. धन्यवाद 🙂
खूप छान लेख आणि माहिती . लेख आवडला . तसे तुमचे सर्वच लेख छान विवेचनात्मक असतात.
अरुणा जी, धन्यवाद आणि आपले बोधसूत्र ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत 🙂 _/\_
कलेच सौंदर्य खुप छान प्रकारे कळल भारतीय कला किती समृद्ध आहे हे या लिखाणातून प्रतीत होत