नवरस आणि देवी शिल्पे या लेखमालिकेत आत्तापर्यंत शृंगार रस, हास्य रस, करूण रस, रौद्र रस, वीर रस आणि भयानक रस यांची देवीच्या विविध शिल्पांमधील अभिव्यक्ती बघितली. या भागात बीभत्स रसाची देवीच्या शिल्पामधील स्वरूप बघणार आहोत.
देवी विग्रहातून व्यक्त होणाऱ्या नवरसांमधील आणखीन एक रस म्हणजे बीभत्स रस. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये बीभत्स या रसाचे दोन भेद सांगितले आहेत. बीभत्स रस हा क्षोभण म्हणजे शुद्ध आणि उद्वेगी म्हणजे अशुद्ध या दोनही स्वरूपात अभिव्यक्त होतो. बीभत्स रसाचा स्थायीभाव जुगुप्सा आहे. अप्रिय, अनिष्ट पदार्थाचे किंवा अवस्थेचे अवलोकन होणे किंवा करणे यात बीभत्स रस निष्पत्ती होते.
बीभत्स रसासाठी चित्रसूत्रही अश्याच प्रकारची व्याख्या देते –
श्मशान गर्हिता घात करणं स्थानदारूणम् |
यच्चित्रं चित्तविक्षेप्तृ तद्वीभत्सरसोद्भवम् ||
स्मशान, घृणित, घात करणारे किंवा विकट अश्या पद्धतीच्या चित्रणातून बीभत्स रस उत्पन्न होतो.
देवी शिल्पांमध्ये बीभत्स रस दर्शवणारी काही शिल्पे येतात. त्यात अलक्ष्मी, चामुण्डा आणि तिचे विविध विग्रह, योगिनी अश्या शिल्पांमधून बीभत्स रसाचे दर्शन होते.
चामुण्डा
देवी शिल्पांमधील अत्यंत महत्त्वाचा विग्रह; शाक्त पंथातील अतिशय उग्र, संहारक आणि भयानक स्वरूपाची देवता म्हणजे चामुण्डा. देवी-माहात्म्यातील काली देवी, शत्रू सैन्यावर त्वेषाने तुटून पडते, तेव्हा तिचे स्वरूप अधिकच विक्राळ बनते. देवी काली चण्ड आणि मुण्ड या दोन महादैत्यांचा संहार करून चामुण्डा हे नावं धारण करते. चामुण्डेला मातांमधील श्रेष्ठ माता म्हणून मातृकांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. चामुण्डेचा प्रथम उल्लेख हा मत्स्य पुराणामध्ये अंधकासूर वध या प्रकरणामध्ये येतो. जेथे अंधाकासुराचे रक्त प्राशन करण्यसाठी स्वतः शिव काही मातृकांची निर्मिती करतो त्यापैकी एक म्हणजे चामुण्डा. पुढे अग्नीपुराण, मार्कंडेय पुराणातील देवी-माहात्म्यातून चामुण्डेच्या उद्भव, स्वरूप आणि तिच्या पराक्रमाचे वर्णन येते.
विचित्रखट्वाङ्गधरा नरमालाविभूषणा ।।
द्वीपिचर्मपरीधाना शुष्कमांसातिभैरवा ।
अतिविस्तारवदना जिह्वाललनभीषणा ।।
निमग्नारक्तनयना नादापूरितदिङ्मुखा ।
चामुण्डा म्हणजे भयानक, अक्राळ कृष्ण मुख असलेली, जी हातामध्ये तलवार आणि पाश घेऊनच ती शत्रुंसमोर येते. विचित्र खट्वांगं धारण करणारी, जिच्या गळ्यात नरमुण्डमाला आहे. वाघ किंवा चित्याचे चर्म कमरेला गुंडलेले आहे. शरीरावरील मांस सुकलेले, केवळ हाडांचा सापळ्याप्रमाणे तिचे रूप दिसत आहे. प्रचंड मोठे मुख आणि त्यातून बाहेर आलेली जीभ यांमुळे तिची भयावहता, उग्रता अजूनच वाढली आहे. तिचे डोळे आत गेलेले आणि क्रोधाने लाल झालेले आहेत.
चामुण्डेच्या स्वरूपाची कल्पना विष्णूधर्मोत्तर पुराणातील पुढील श्लोकातून होते.
लम्बोदरी तू कर्तव्या रक्ताम्बरपयोधरा |
शूलहस्ता महाभागा भूजप्रहरणा तथा ||
बृहद्रथा च कर्तव्या बहुबहुस्तथैव सा |
चामुण्डा कथिता सैव सर्वसत्ववशङ्करी ||
तथैवान्त्रमुखी शुष्का शुष्का कार्या विशेषतः |
बहुबाहूयुता देवी भुजंगैःपरिवेष्टिता ||
कपालमालिनी भीमा तथा खट्वांगंधारिणी ||
मनुष्य आणि सर्व प्राणीमात्रांना जी ताब्यात करण्याची ताकद ठेवते ती म्हणजे चामुण्डा. जिचे उदर ओघळून खाली आले आहे आणि जिचे स्तन हे लाल वस्त्राने झाकलेले आहेत. हातामध्ये शूल धारण करणारी ही विज्ञाता (विख्याता) जिचे बाहूच धारधार शस्त्राप्रमाणे आहेत. ती एका मोठ्या रथात (?) बसलेली आणि अनेक हात असलेली अशी अंकित करावी. ती आतडी भक्षण करताना दाखवावी, तरी ती क्षीण किंवा शुष्क देह असलेली असावी. तिच्या गळ्यामध्ये मुण्डमाला असावी आणि तिच्या भोवती सर्प अंकित करावेत. खट्वांगं धारण करणारी आणि अतिशय भयावह अशा तिचा निर्माण करावा.
भारतच्या उत्तरेला म्हणजे बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आणि राजस्थान भागात चामुण्डेचे अंकन हे उभे केस असलेली, लम्बस्तनी, हाडांचा सापळा झालेली देहयष्टी, मुण्डमाळा धारण केलेली अंगावर साप आणि पोटावर विंचू असलेली अंकित केलेली आढळते. चामुण्डा स्थानक, त्रिभंग अवस्थेत नाचताना किंवा ललीतासनात बसलेली दाखवतात. चार, आठ, बारा किंवा सोळा भुजा असलेली तिची शिल्पे भारतभर अनेक ठिकाणी बघायला मिळतात. तिच्या हातामंध्ये त्रिशूल, ढाल, खड्ग, धनुष्य, पाश, अंकुश, बाण, कुऱ्हाड, दर्पण, घंटा, वज्र, दंड, वरद, मुण्ड, कपाल, खेटक अश्यी विविध आयुधे असतात. क्वचित मागच्या दोन हातांमध्ये तिने हत्तीचे कातडे धरलेले दिसते.
ती प्रेतावर आरूढ असलेली दाखवावी. त्रिनेत्र धारण करणारी आणि डोळे खोल आत गेलेले असावेत. तिच्या भोवती अमंगल, अप्रिय वाटणारे घुबड, जंबुक, सर्प, विंचू तसेच स्मशानवासी म्हणजे तिचे साधक किंवा सेवक यांचे अंकन असते.
देवी चामुण्डेचे शिल्प बघताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की तिचा विग्रह हा बीभत्स स्वरूपाचे दर्शन घडवणारा असला तरी, ती भक्तावर अनुग्रह करणारी ही देवी माता स्वरूपिणी आहे. तिच्या उग्र, भयानक स्वरूपाची धडकी ही अनैतिक कर्म करणाऱ्यांच्या मनात सदैव रहावी यासाठी आहे. सृष्टीच्या नियमाप्रमाणे संहारानंतर सृजन हे चक्र सुरु असते, त्याप्रमाणेच चामुण्डेचे हे रूप समजून घेणे आवश्यक आहे. तिचे हे भयावह स्वरूप वाईट शक्तीचा संपूर्ण नाश करून नवनिर्मितीसाठी पूरक असल्याने जवळपास सर्वच मध्ययुगीन मंदिरांवर देवी चामुण्डेची स्वतंत्र शिल्पे शिल्पकारांनी कोरली आहेत. हा शुद्ध बीभत्स रस अमंगळ संपवून मंगलता प्रदान करणारा मानावा. काळावर असलेले तिचे आधिपत्य स्वीकारून नतमस्तक होणाऱ्या भक्ताला चामुण्डा अभय देणारीच आहे.
पुढील भागात देवी शिल्पातील अद्भुत रसचा परामर्श घेऊ.
उत्तम लेख
धन्यवाद रमेश जी, आपले बोधसूत्रवर स्वागत आहे.
खुप छान आणि नवीन माहिती
धन्यवाद डॉ. माधवी जी, आपले बोधसूत्र वर स्वागत आहे. चामुण्डा या विषयावर माझा शोध निबंध या पूर्वी प्रकाशित झाला आहे. पण तो विषय सौंदर्यशास्त्रावर होता, या लेखामध्ये रससिद्धान्त आणि चामुण्डा देवीचे शिल्प यावर लिहिले आहे. आपल्या प्रतिक्रिया अश्याच मला देत राहा.