सौंदर्यपूर्ण शिल्पांनी वेढलेले वेरूळ येथील कैलासनाथ म्हणजे पृथ्वीवरील साक्षात कैलास. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत घडवलेले हे शिवालय डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. नृत्यरत शिवाचे विविध पैलू दाखवणारी अनेक शिल्पे इथे आहेत. त्यातील एक म्हणजे कैलास मंदिराच्या नंदिमंडपाच्या तळमजल्यावर उत्तर दिशेला असलेले नटेश्वराचे हे शिल्प. शिल्प भग्न पावलेले असले तरी या नर्तनातील लय शिल्पामधून प्रतीत होते. आपला उजवा पाय अगदी वक्षस्थळापर्यंत वर उंचावून डाव्या पायावर शरीराचा भार सहज तोलून धरलेला आहे. भरतमुनी नाट्यशास्त्रामध्ये उर्ध्वजानु करणाचे लक्षण पुढील श्लोकातून सांगतात –
कुञ्चितं पादमुत्क्षिप्य जानुस्तनसमं न्यसेत् |
प्रयोगवशगौ हस्तावूर्ध्वजानु प्रकीर्तितम् ||
कुञ्चितं पाद इतका वर उचलावा की जानु वक्षस्थळापर्यत यावा, त्यायोगे हातही उचललेले असावेत.
प्रस्तुत शिल्पामध्ये मण्डल स्थानाने डावा गुडघा वाकवलेला आहे. शिवाची मान या उचललेल्या गुडघ्याच्या दिशेने झुकल्याने शरीरामध्ये स्वाभाविकच भंग निर्माण झाला आहे. ही त्रिभंग अवस्था अधिक लयदार व्हावी यासाठी त्या पद्धतीचा हस्त विन्यास या शिल्पामध्ये शिल्पकारांनी साधला आहे. दशभुज नटराजाच्या पुढच्या दोन हातांपैकी उजवा हात सिंहकर्ण मुद्रेत असून डावा हात करीहस्त मुद्रेत गुडघ्यावर ठेवला आहे. उर्वरित हातांतील आयुधांचा विचार केला तर हातामध्ये त्रिशूल, अग्नीपात्र आणि डमरू आहे. तर मागचा डावा हात डोलाहस्त असून, त्याच्या खालच्या हातामध्ये सर्प असावा. इतर हात आणि काही आयुधे भग्न झाल्याने त्यांचा वेध घेणे कठीण आहे. शिवाच्या डोक्यावर जटामुकुट असून नृत्याच्या लयीमध्ये हलणारे त्याचे कर्णकुंडलही या शिल्पांत दिसते. दंडामध्ये त्रिवलय सर्पाकृती केयूर आहे, तर हातामध्ये कंकण आहेत. या शिल्पपटामध्ये नटेशाच्या उजव्या पायाशी तालवाद्य घेतलेला एक गण आहे. डाव्या पायाशी पार्वती या दिव्य नृत्याचे अवलोकन करीत बसलेली शिल्पित केली आहे. तिच्या बसण्याची ढब बघितली तर ती राजलीलासनात बसलेली आहे. उजवा पाय गुडघ्यातून वाकवून पाय समतल पातळीवर ठेवलेला असतो. तर दुसरा डावा पाय हा मांडी घातल्याप्रमाणे मुडपलेला असतो. पार्वतीचा हात हे दिव्य नृत्य पाहून विस्मय भावाने तिच्या चेहऱ्याजवळ आला आहे. या शिल्पपटाच्या वरच्या बाजूला आकाशगामी गंधर्व, गण हे या नृत्याला वाद्यांच्या सहाय्याचे ठेका देऊन साथ करीत आहेत. संपूर्ण शिल्प हे एका कोरीव देवकोष्टामध्ये शिल्पित केले आहे. या देवकोष्टाच्या दोन्ही बाजूंना आकाशगामी गन्धर्व युगुल नटेश्वराच्या या दिव्य नर्तनाचा सोहळा अनुभवत आहेत. या नृत्यामधील आवेग हा या उर्ध्वजानु करण आणि सम्मेलीत ताल वाद्यांच्या साथीमुळे अधोरेखित होत आहे.
छायाचित्र – © धनलक्ष्मी म. टिळे | स्थळ- वेरूळ
(पूर्वप्रकाशित – श्रावण शुक्ल पंचमी शके १९४४.)