श्री क्षेत्र औंढा नागनाथ

Home \ बोधसूत्र \ श्री क्षेत्र औंढा नागनाथ
Aundha Nagnath Temple

श्री क्षेत्र औंढा नागनाथ (GPS 19°32’13.5″N, 77°02’29″E) म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शैव क्षेत्र.  गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्हात, श्री क्षेत्र औंढा येथे भव्य आणि मंत्रमुग्ध करणारे शिल्पसमृद्ध नागनाथ शिवालय आपल्याला बघायला मिळते. समुद्रसपाटीपासून साधारण 464 मीटर उंचीवर नागनाथाचे हे मंदिर आहे. औंढा हे गावं मराठवाड्यातील परभणीच्या नैऋत्येस 36 कि.मी. अंतरावर कळमनुरी या तालुक्यात स्थित आहे. परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीची उपनदी, कैदू नदीच्या काठावर औंढा हे गावं आहे जिथे हे भव्य शिवालय स्थापन केलेले आहे. 

आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाच्या निमित्ताने, श्री क्षेत्र औंढा नागनाथाचे वैभव मी बोधसूत्राच्या माध्यमातून संकलित करीत आहे. भारतात बारा ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी औंढा नागनाथ हे देखील एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराणात शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख असणारा एक श्लोक येतो. 

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥

सौराष्ट्रातील सोमनाथ, श्रीशैले पर्वतावर मल्लिकार्जुन, उज्जयिनी येथील महाकालेश्वर, नर्मदेच्या तीरावरील ओंकार अमलेश्वर, परळी येथील वैजयनाथ, पुण्याजवळील भीमाशंकर, दक्षिणेत सेतुबंधाजवळ रामेश्वर, हिंगोली जिल्हातील औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, नासिकमधील त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारनाथ आणि औरंगाबाद वेरूळ येथील घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांचे वर्णन उपरोक्त श्लोकात आले आहे, परंतु पाठभेदांमुळे यातील काही स्थळांची निश्चिती करताना अडचणी उद्भवतात.

दारूकावन की द्वारकावन

ज्योतिर्लिंगांच्या वर्णनामध्ये भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेता पाठभेद झालेले दिसतात. औंढा नागनाथ मंदिराबाबत सांगायचे झाले तर गुजरात येथील पाठानुसार नागेशं द्वारकावने असा उल्लेख येतो. त्यामुळे गुजरातमधील द्वारका येथील नागेश्वर शिवालय हे ज्योतिर्लिंग मानतात. द्वारका आणि दारूका यांमध्ये जरी पाठभेद निर्माण झाला असला, तरी सामान्यतः द्वारका ही श्रीकृष्णाची नगरी म्हणून सर्वश्रुत आहे. पुराणकथांच्या आधारे हे निश्चित करता येते की, दारूका हे एका राक्षसीचे नावं होते, जिला पार्वतीच्या कृपाशीर्वादाने या वनाचे राज्ञीपद प्राप्त झाले होते. दारूका राक्षसीमुळे या वनाला दारूकावन हे नावं प्राप्त झाले. शिव पुराणातील कथेनुसार दारूका आणि तिचा पती दारूक, हे या वनात तपस्येसाठी येणाऱ्या ऋषीजनांना नेहमी त्रास देत असत. भक्तांच्या रक्षणासाठी शिव आणि शिवा म्हणजे पार्वती या स्थानी विराजमान झाले, ते हे नागेश्वर स्थान. अभ्यासकांच्या मते हे औंढा या क्षेत्री आहे.

नागनाथ शिवालय

पश्चिमाभिमुख शिवालय 7200 sq.feet अश्या एका विस्तीर्ण आवारात असून त्याभोवती एक मोठा कोट आहे. या तटबंदीला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ही शिल्पसमृद्ध वास्तू माझ्यासमोर तत्कालीन संस्कृतीचे प्रतिबिंब आणि सोबत अनेक प्रश्न घेऊन उभी राहिली. भौतिक पुरावाच्या रूपाने आपल्या गत संस्कृतीचा एक धागा मला मिळाला. या घडामोडींना पुन्हा एकत्रित गुंफण्याचा माझा प्रयास सुरु आहे.

Aundha Nagnath Temple

मंदिराची संरचना गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि तीन द्वारे अशी आहे. मंदिराच्या भोवतीने आसलेल्या तटबंदीच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश करताना मुख्य मंदिराच्या सुमारे 60 फूट उंच भव्य वास्तूचे दर्शन प्रथम होते. मंदिराच्या समोर नदीमंडप आहे, परंतु त्याचे बांधकाम नंतरच्या काळातील असावे. मंदिरात जातानाच बाह्य भिंतीवरील शिल्पवैभव आपल्या नजर खिळवून ठेवते. मंदिरात प्रवेश केल्यावर आपण मुखमंडप, सभामंडप, अंतराळ ओलांडून गर्भगृहात प्रवेश करतो, परंतु येथील गर्भगृहाची संरचना वेगळी आहे. प्रत्यक्ष वरील गर्भगृहात विष्णूच्या केशव रूपातील मूर्तीचे दर्शन होते. नागनाथ मंदिराच्या गर्भगृहाला खाली म्हणजे तळाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून तळ-गाभाऱ्यात नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. याला पातळलिंग असे म्हणतात. या गाभाऱ्याची उंची अतिशय कमी आहे म्हणजे सरळ उभे राहणे अशक्य आहे. नागनाथाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात आपण येतो. असे म्हणतात मंदिराचे शिखर पूर्णतः उध्वस्त झाले होते, जे अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधून या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराचे शिखर नंतरच्या काळातील आहे. मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात एक मठ बांधलेला आहे, जिथे काही संन्यास्यांचे वास्तव्य असते. हा मठ एका उंच चौथरावर पश्चिमबाजूपासून आग्नेय कोपऱ्यातील नागतीर्थापर्येंत बांधला आहे. आवारातच एक पायविहीर आहे त्यास ऋणमोचन तीर्थ किंवा सासू-सुनेची बारव किंवा नागतीर्थ असेही म्हणतात. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव असल्याने त्यांची समाधी या परिसरातच आहे. या मंदिराच्या पूर्वेला तटबंदीबाहेर एक पाण्याचे विस्तृत तळे आहे. या तळ्याला हरिहरतीर्थ या नावाने ओळखतात, कदाचित या तळ्यात विष्णूची मूर्ती सापडल्यापासून त्याला असे नामकरण झाले असावे.

याशिवाय नागनाथ शिवालयाचे शिल्पवैभव हे खरोखरीच एक अद्वितीय सौंदर्याची साक्ष देणारे आहे. भैरव, तांडवनृत्य करणारा शिव, पार्वती आणि शिव यांचे कल्याणसुंदर शिल्प, महिषासुरमर्दिनी, अंधकासुरवध, गजासुरवध, रावणानुग्रह, पंचमुखी शिव, चामुंडा, अष्टदिक्पाल, गणेश यांशिवाय साधक, योगी यांचीही सुरेख शिल्पांकने इथे बघायला मिळतात.  या मंदिरात शिलालेख उपलब्ध न झाल्याने या मंदिराचा निश्चित काळ, दानकर्ता किंवा मंदिराच्या इतर तपशिलांचा अभाव असला तरी मंदिराची संरचना आणि याचे शिल्पवैभव या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. जगन्नाथपुरी येथे ज्याप्रमाणे देवाची रथयात्रा असते, त्याप्रमाणे औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीला नागनाथाची यात्रा असते. सुशोभित रथातून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. ही रथयात्रा भाविकांसाठी आजही खास आकर्षण आहे, त्यामुळे महाशिवरात्रीच्या पावन पर्वात भाविकांची अलोट गर्दी येथे अनुभवता येते. 

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

2 thoughts on “श्री क्षेत्र औंढा नागनाथ

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.