नवरस आणि देवी शिल्पे

Home \ देवीसूत्र \ नवरस आणि देवी शिल्पे

महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः |
महामोहा च भवती महादेवी महासुरी ||

देवी स्वरूपा म्हणजे तिच्यातील विविध तत्त्वांचे साक्षात दर्शन आपल्याला घडते. कधी ती निसर्ग रूपात अवतरणारी प्रकृतीरूपा असते तर कधी ती असुरांचे निर्दालन करणारी दुर्गा असते. महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृति, महामोहा अश्या विविध रूपांमध्ये तिची कल्पना केली आहे. भारतीय शिल्पकलेमध्ये देवीच्या सौम्य, रौद्र, उग्र, भयानक अश्या सर्वच स्वरूपात अभिव्यक्ती झाली आहे. नवरस आणि देवी शिल्पे ही लेखमाला म्हणजे याच नवरसयुक्त नऊ देवी स्वरूपांचा जागर आहे.

भारतीय संस्कृति ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुःसूत्रीने गुंफलेली आहे. प्राचीन काळापासून भारतीय समाजाने तात्त्विक, अध्यात्मिक, कलात्मक मूल्यांचा समृद्ध वारसा जपला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही बिंदुना स्पर्श करणारे सौंदर्यमूलक सूत्र म्हणजे प्राचीन भारतीय कला. कला ही एक अशी अभिव्यक्ती आहे जिच्या माध्यमातून कलाकार त्याचे आत्मज्ञान, चिंतन आणि कौशल्य यांच्या आधारे संकल्पनांना यथार्थ रूपामध्ये साकार करत असतो. ही कलाकृती म्हणजे कलाकाराची भावप्रेरीत सृजनात्मक कल्पना असते.

तत्कालीन समाजाची रूपकात्मक अभिव्यक्ती म्हणजे कला. भारतीय कलेमध्ये केवळ व्यक्तीच्या देहाची नव्हे तर त्याच्या जीवनमूल्यांची रूपके अंकित झाली आहेत. अमूर्त संकल्पनांना कलेच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात साकार करताना कलाकाराने त्याच्या कलाकृतीमागे तात्विक चिंतन, सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक अभिव्यक्ती या तीनही अंगांचा समतोल साधण्याच्या प्रयत्न केला आहे, जो आज उपलब्ध असलेल्या कलावशेषांच्या रूपात आपल्या समोर आहे.

आनंद कुमारस्वामी यांच्या मते भारतीय परंपरेत तत्त्वज्ञ कलेपेक्षा, सौंदर्य सिद्धांतांवर अधिक विस्तृत आदानप्रदान करतात. त्यांच्या मते सौंदर्य किंवा रस ही एक अवस्था आहे. कला समीक्षक म्हणजेच रसिक हे ठरवू शकतात की कोणत्या प्रकारची कलाकृती ही सुंदर किंवा रसवंत आहे. या सौंदर्याची अनुभूती कलाकार प्रत्यक्ष कलाविष्कार साकारताना अनुभवत असतो. ती कलाकृती पूर्णत्वाला गेली की रसिक त्या कलेतील सौंदर्याला पुन्हा एकदा अनुभवतो.
वात्स्यायन विरचित ‘कामसूत्र’ या ग्रंथाच्या टीकेत यशोधारने, आलेख्य म्हणजेच चित्रकर्म याची सहा अंगे सांगितली आहेत.

रूपभेदः प्रमाणानि भावलावण्ययोजनम।
सादृश्यं वर्णिकाभंग इति चित्रं षडंगकम्।।

रूपभेद म्हणजे आकार, प्रमाण म्हणजे अनुपातिक माप, लावण्य म्हणजे सौंदर्य, भावयोजना अर्थात रसाभिव्यक्ती, सदृश्य म्हणजे मूळ विषयाशी साम्य आणि वर्णिकाभंग म्हणजे रंग योजना. त्यामुळे लावण्य निर्मितीसाठी सौंदर्य आणि रसनिर्मितीसाठी भाव या दोनही गोष्टी चित्रकला, शिल्पकला यामध्ये कलाकृती साकारताना महत्त्वाच्या ठरतात.

याशिवाय कलादृष्टीने महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे इ.स. 7 व्या शतकात संकलित झालेले विष्णुधर्मोत्तरपुराण. यातील अधिकांश भाग हा कला विषयातील शास्त्रोक्त मांडणीला समर्पित केला आहे. छन्दशास्त्र, काव्यशास्त्र, नृत्य-संगीत, वास्तु, शिल्प आणि चित्रकला यांचे विस्तृत विवेचन विष्णुधर्मोत्तरपुराणातून संकलित झाले आहे. रस आणि भाव यांचे वर्णन आणि ते निर्माण करण्याच्या निर्देश श्लोकबद्ध केले आहेत.

शृङ्गारहास्यकरुणवीररौद्रभयानकाः |
वीभत्साद्भूतशान्ताश्च नव चित्र रसाः स्मृताः ||
– चित्रसूत्र 43.1

या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने भारतीय शिल्पकारांनी देवी स्वरूपात शिल्पबद्ध केलेल्या या नवरसांचा आढावा या लेखमालिकेतून मी प्रस्तुत करीत आहे. पुढील भागात उमा महेश्वर शिल्पातील शृंगार रसाचा परामर्श घेऊया.

ABOUT THE AUTHOR: Dhanalaxmi 'भारतीय विद्या' या विषयात मी पारंगत (Masters of Arts, in Indology) ही पदवी प्राप्त करून सध्या या विषयात लेखन आणि संशोधन करीत आहे. प्राज्ञपाठशालामंडळ वाई प्रकाशित 'नवभारत' तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तत्त्वज्ञान विभाग प्रकाशित 'परामर्श' अश्या नियतकालिकांसाठी लेखन करते आहे.

RELATED POSTS

8 thoughts on “नवरस आणि देवी शिल्पे

LEAVE YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.